Skip to main content
x

पाटील, रेणुराव पांडुरंग

        रेणुराव पांडुरंग उपाख्य अण्णासाहेब पाटील यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील पोहंडुळ येथे देशपांडे घराण्यात झाला. वयाच्या आठव्या वर्षी ते सायखेडच्या पाटील घराण्यात दत्तक म्हणून गेले तेव्हापासून त्यांचे नाव रेणुराव पांडुरंग पाटील-सायखेडकर झाले. रेणुराव यांचे प्राथमिक शिक्षण पोहंडुळ येथे झाले व ५वी ते ८वीपर्यंतचे शिक्षण यवतमाळ येथील ए.व्ही. हायस्कूल झाले व ९ ते ११वीपर्यंतचे शिक्षण तेथेच सरकारी हायस्कूलमध्ये झाले. त्यांनी १९३६मध्ये ग्रामोद्धार संस्था स्थापन केली व सायखेड गावाला आदर्श खेडे म्हणून नावारूपाला आणले.

पाटील यांनी कोरडवाहू शेतीत शेणखताचा भरपूर वापर करून विद्यापीठाने संशोधन केलेल्या आणि महाराष्ट्र शासनाने प्रसारासाठी सांगितलेल्या वेगवेगळ्या  वाणांची आपल्या शेतीमध्ये लागवड केली आहे. त्यांनी ज्वारीचा नवीन संकरित वाण सीएसएच १, कपाशीच्या एच ४ तसेच पीकेव्ही २, एकेजी ०८१, डीएचवाय २८६ या जातींची लागवड करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले, तसेच तुरीचा त्या वेळचा नवीन वाण बीडीएन २ व पी ११ या जातीची निवड करून आपल्या शेतीमध्ये लागवड केली. त्या वेळचे नवीन पीक म्हणजे सूर्यफूल या पिकाची मॉर्डेन ही जात आपल्या शेतामध्ये लावून शेतकऱ्यांना अनुकरण करण्याची संधी प्राप्त करून दिली. तसेच भुईमुगामध्ये टीएजी २४ ही जात लावून शेतकर्‍यांना भुईमूगदेखील उत्तम प्रकारे घेता येऊ शकतो, हे दाखवून दिले. नवीन-नवीन वाण आपल्या शेतीमध्ये लावून त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक प्रकारचे पथदर्शक पाऊल उचलले.

चांगले बियाणे निवडून उत्तम खतपाणी घालून कोरडवाहू शेती फायद्याची होते हे त्यांनी दारव्हा परिसरातील शेतकऱ्यांना दाखवून दिले. त्यांनी कोरडवाहू शेती यावर एक छोटे पुस्तकही प्रकाशित केले. त्यांना १९२० सालापासून रोजनिशी लिहिण्याचा छंद होता. त्यामध्ये दररोजचे हवामान, पाऊसपाणी व ढगाळ वातावरण याचा उल्लेख केलेला आहे. शेतीविषयक बाबी ते लिहून ठेवत असत. त्यांनी १९५१मध्ये ‘माझा कोकणचा प्रवास’, १९३९मध्ये ‘पाटलांचे हँडबुक’, १९६३मध्ये ‘कोरडवाहू शेती’ व १९६५मध्ये ‘कोरडवाहू शेतीची सुधारित आवृत्ती’ अशी पुस्तके प्रकाशित केली. त्यांच्या धाकट्या मुलाने ‘अण्णांची चंचणी व आठवणी’ हे आपल्या वडिलांचे चरित्रात्मक पुस्तक २००८मध्ये प्रकाशित केले आहे. पाटील यांनी शेती व ग्रामसुधारणेेविषयी ‘पाणी जो कोंडी, पिकवी धान्याची खंडी!’; ‘ज्याच्या घरी गाय त्याला कमी काय?’ अशा म्हणी व बोधवाक्ये लिहिली आहेत.

- डॉ. चंद्रकांत श्यामराव संगीतराव

पाटील, रेणुराव पांडुरंग