Skip to main content
x

पिंपळखरे, गंगाधर वामन

संगीत क्षेत्रात गायक म्हणून नव्हे, तर गुरू म्हणून गाजलेली काही व्यक्तिमत्त्वे आहेत, त्यांच्यामध्ये गंगाधरबुवांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. धोतर, टोपी असा साधा वेष आणि निगर्वी स्वभावाचे गंगाधरबुवा ‘गुरुजी’ किंवा ‘सर’ या नावाने सर्वपरिचित होते.

गंगाधर वामन पिंपळखरे यांच्या मातु:श्रींचे नाव लक्ष्मीबाई होते. पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे बुवांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर कँप एज्युकेशन सोसायटीतून त्यांनी एस.टी.सी. केले. आर्थिक अडचणींमुळे त्यांना महाविद्यालयीन शिक्षण  घेता आले नाही. त्यांचे पूर्वायुष्य अतिशय कष्टाचे व खडतर असे गेले. सदाशिव पेठेमध्ये त्यांच्या भावाचा दुधाचा व्यवसाय होता. तेथे म्हशी पिळणे, गोठा साफ करणे अशी कामे करत त्यांनी शिक्षण केले. त्यांना व्यायामाची आणि मर्दानी खेळांची फार आवड होती. दांडपट्टा, लेझीम, फरी गदगा, कुस्ती अशा खेळांत ते तरबेज होते. नियमित व्यायाम व मिताहार हे त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य होते.

त्यांचा १९३८ साली विवाह निर्मलाबाई शिदोरे यांच्याशी झाला. ते १९४२ मध्ये हिंगणे स्त्री- शिक्षणसंस्थेच्या आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले. ही शाळा त्या वेळी कोथरूडला होती. ही शाळा नावारूपाला येण्यासाठी, गावच्या अशिक्षित नागरिकांना शिक्षण मिळण्यासाठी, त्यांना स्वच्छता व चांगले संस्कार देण्यासाठी बुवांनी अपार परिश्रम केले. शाळेच्या खोल्या शेणाने सारवण्यापासून, बालवाडी सुरू करण्यापासून, रात्री ९ ते १२ दरम्यान लोकांसाठी साक्षरतेचे वर्ग घेण्यापासून ते घरोघरी जाऊन लोकांच्या भेटी घेऊन त्यांना सुजाण नागरिक करण्यापर्यंत त्यांनी अफाट मेहनत केली. त्यांनी १९६१ च्या महापुरात शाळेत पूरग्रस्तांसाठी मदत केंद्रही चालवले. कोथरूडमध्ये ते आदर्श व लोकप्रिय गुरुजी होते. पुढे ही शाळा महानगरपालिकेच्या ताब्यात गेल्यावर त्यांच्या नियमांप्रमाणे त्यांना ही नोकरी सोडावी लागली.

महाविद्यालयीन शिक्षण अपुरे राहिले तरी संगीत शिक्षणाच्या बाबतीत ते सुदैवी ठरले. संगीताचे सुरुवातीचे शिक्षण त्यांनी गोपाळ गायन समाजात पं. गोविंदराव देसाईंकडे घेतले. गायनाचार्य पं. विष्णू दिगंबर पलुसकर हे गोविंदरावांचे गुरू. तीन-चार वर्षे गोपाळ गायन समाजात शिकल्यानंतर गंगाधरबुवांनी विष्णू दिगंबरांचे आणखी एक शिष्य व भारतभर कीर्ती मिळवलेले पं. विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडे पाच-सहा वर्षे शिक्षण घेतले व ते ‘संगीत विशारद’ झाले. पुण्याच्या गांधर्व महाविद्यालयात व विष्णू दिगंबर संगीत विद्यालयात त्यांनी काही काळ अध्यापनाचेही काम केले. सवाई गंधर्व तथा पं. रामभाऊ कुंदगोळकर यांचाही सहवास त्यांना पाच-सहा वर्षे लाभला. त्यांच्याबरोबर मद्रास, म्हैसूर, बंगलोर इथल्या मैफलींमध्ये त्यांनी स्वरसाथ केली.

शाळेची नोकरी जवळजवळ अठ्ठावीस वर्षे करून झाल्यावर १९६३ सालापासून त्यांनी पत्र्या मारुतीजवळील स्वत:च्या राहत्या घरातून अत्यंत व्रतस्थ वृत्तीने विद्यार्थ्यांना संगीत शिकवण्यास सुरुवात केली. पं. विनायकबुवा पटवर्धनांच्या ‘राग-विज्ञान’ पुस्तकांना प्रमाण मानून, त्यानुसारच ते शिकवीत असत. हाडाचे शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचा वकूब ओळखून ते विद्यादान करत असत. शिकवताना ते अत्यंत कठोर व काटेकोर असत; पण इतर वेळी ते विद्यार्थ्यांवर स्वत:च्या मुलाप्रमाणे माया करीत असत. बंदिशींची तालातली मांडणी अचूक व नेमकी असावी, रागाचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत यांबाबत ते आग्रही असत; पण तरीही विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला ते यथोचित वाव देत असत. विद्यालय पद्धतीने आलाप, ताना लिहून देण्याच्या किंवा घेण्याच्या ते विरोधात असत. त्यांच्या विद्यार्थ्यांकडे ‘गाण्याची वही’ नसे. गाणे डोक्यात ठेवून रियाझाने आत्मसात करण्यावर त्यांचा भर असे.

गायक म्हणून नावारूपाला आलेल्या त्यांच्या शिष्यांपैकी प्रमुख म्हणजे पद्मा तळवलकर व संजीव अभ्यंकर हे होत. डॉ. शोभा अभ्यंकर, डॉ. माधुरी जोशी, जयश्री रानडे, अनुराधा गरुड, इ. शिष्यांनीही एसएनडीटी विद्यापीठात एम.ए. करण्यात उज्ज्वल यश संपादन केले व संगीतासंबंधी वेगवेगळ्या क्षेत्रांत हे व इतर अनेक शिष्य व शिष्या कार्यरत आहेत. संगीता नेरुरकर या विद्यार्थिनीने ‘झी’टीव्हीच्या ‘सारेगमप’च्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात विजेतेपद पटकावले. युवा पिढीतील राहुल देशपांडे, पुष्कर लेले इ. अनेक कलाकारांचे पायाभूत शिक्षण पिंपळखरेबुवांकडेच झाले.

पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राच्या पहिल्या गुरूंमध्ये बुवांचा समावेश झाला. त्यांना अनेक पुरस्कार व सन्मान लाभले. पुणे नगरपालिकेचा सन्मान, पं. जसराज मित्रमंडळाकडून सत्कार, बाबासाहेब गाडगीळ मेमोरिअल फाउण्डेशनतर्फे ‘संगीतश्री’ पुरस्कार, पं. वसंतराव गाडगीळ यांच्या ‘शारदा ज्ञानपीठम्’तर्फे आयुष्यभर राष्ट्रसेवा करणार्‍या ॠषितुल्य तपस्वींपैकी एक म्हणून सत्कार, गांधर्व महाविद्यालयातर्फे ‘विष्णू दिगंबर संगीत शिक्षक गौरव’ पुरस्कार (१९९९), नाशिक जिल्हा, पुणे जिल्हा, नगर जिल्हा यांच्यातर्फे ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार, ‘सुरेल सभे’कडून गुरुबंधू भीमसेन जोशी यांच्या हस्ते सत्कार, इ. वयाच्या एक्याण्णवाव्या वर्षापर्यंत ते कार्यरत होते. ब्याण्णवाव्या वर्षी त्यांचे पुण्यात निधन झाले. त्यांच्या नावाने उभरत्या युवा शास्त्रीय गायकाला २००८ सालापासून पुरस्कार दिला जात आहे. त्यांच्या संगीताचा वारसा त्यांचे पुण्यात व इतरत्र पसरलेले अनेक शिष्य पुढे चालवीत आहेत.

            — अनुराधा गरुड

पिंपळखरे, गंगाधर वामन