Skip to main content
x

पळसुले, बाळ श्रीपती

     बाळ पळसुले मूळचे सांगलीचे. त्यांच्या घरची गरिबी  होती. त्यांच्या वडिलांचा बुरुड व्यवसाय होता. बाळ यांचे इ. चौथीपर्यंत शिक्षण झाले होते. लहानपणी त्यांना मेळ्यातून गीत-संगीत ऐकायला मिळे. तेव्हा आपणही मेळ्यात काम करावे, गाणे म्हणावे, वाजवावे असे बाळ यांना वाटे.

     त्यातून त्यांना बाजाची पेटी वाजवायची आवड निर्माण झाली आणि त्यांनी ऐकून ऐकून, अंदाजाने येईल तसे वाजवायला सुरुवात केली. त्याबरोबरच,  गीतांना चाली लावायचाही त्यांचा सराव होत गेला. पुढे त्यांना मेळ्यात काम मिळाले आणि तिथेच स्वत:च चाल लावलेली गाणी गाऊन, तर कधी दुसऱ्या कुणाचे गीत घेऊन त्याला चाल लावण्याचा छंद त्यांना जडला. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाची रंगत वाढू लागली. गीतकार म्हणून पुढे प्रसिद्ध झालेले जगदिश खेबुडकर याच मेळ्यात बासरी वाजवत. लोकप्रिय हिंदी गाण्याच्या चालावर मराठी गाणी गातानाही त्यांना आनंद वाटत असे. संगीत देता देता वाद्यांचा वापर कसा करावा याची समज त्यांना आली. कळत नकळत संगीताचा अभ्यास होऊ लागला.

      पळसुले यांनी काही काळ वसंत पेंटर यांच्या चित्रसंस्थेत शिपायाची नोकरी केली. मात्र संगीत दिग्दर्शक व्हायचे, हाच त्यांचा उद्देश होता. लवकरच, म्हणजे १९६५ साली त्यांना संगीत दिग्दर्शनासाठी ‘सुधारलेल्या बायका’ हा चित्रपट मिळाला. त्यातली ‘लाडकीचे लाड राया पुरवाल का?’ ही लावणी लोकप्रिय झाली. प्रसंगानुरूप वातावरणनिर्मिती करण्याच्या दृष्टीने परिणामकारक संगीत देण्याकडे बाळ पळसुले लक्ष देऊ लागले. पळसुले यांनी मराठीत कव्वाली ढंगाच्या चालीचा प्रथमच प्रयोग केला. ‘थापाड्या’ या त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटाची गाणी फारच गाजली. तेव्हापासून मराठी रसिक बाळ पळसुळे यांना ओळखू लागले.

     बाळ पळसुले यांनी सुमारे साठ चित्रपटांना संगीत दिले आहे. ‘अथांग’ व ‘अनोळखी’ या दूरदर्शन मालिकांनाही त्यांनी संगीत दिले आहे. त्यांनी संगीत दिलेल्या ‘पंढरीची वारी’ या चित्रपटाला शास्त्रीय संगीताचे ‘सूरसिंगार’ पारितोषिक मिळाले आहे.

      त्यांनी एकूण १५० मराठी चित्रपटांना संगीत दिले. तसेच हिंदी, गुजराती, भोजपुरी चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले. त्यांनी संगीत दिलेली ‘कुठं कुठं जायाचं हनिमुनला...’, ‘धरिला पंढरीचा चोर’, ‘अवती भवती डोंगरझाडी’ ही गाणी अतिशय लोकप्रिय ठरली. त्यांच्याकडे आशा भोसले, उषा मंगेशकर, उत्तरा केळकर, सुलोचना चव्हाण, सुमन कल्याणपूर, कृष्णा कल्ले, अनुराधा पौडवाल, अनुप जलोटा हे गायक गायले.

      बाळ पळसुळे यांना त्यांच्या सांगीतिक जीवनाच्या वाटचालीसाठी दादासाहेब फाळके अकादमीचा पुरस्कार, मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रकर्मी पुरस्कार (२००६) मिळाले आहेत. तर १९७५ मध्ये कोल्हापूर नगर परिषदेने, १९९० मध्ये सांगली नगर परिषदेने त्यांचा सन्मान केला. अशा या संगीतकाराचे वयाच्या ७८ वर्षी श्‍वसनविकारामुळे इचलकरंजी येथे आपल्या मुलीच्या घरी निधन झाले.

      - मधू पोतदार

पळसुले, बाळ श्रीपती