Skip to main content
x

प्रभू, मीना सुधाकर

    मीना सुधाकर प्रभू यांनी पुणे येथे वैद्यकीय शिक्षण (एम.बी.बी.एस.) पूर्ण केले. मुंबई व लंडन येथे पदव्युत्तर शिक्षण घेतले. लंडन येथे दीर्घकाळ वास्तव्य केले. 

     अत्यंत उत्कट, भावस्पर्शी आणि तितक्याच रोमहर्षक प्रवासानुभवाने वाचकांना मीना प्रभू आपल्यासोबत निरनिराळ्या देशांची भटकंती घडवून आणतात. त्यांनी ‘प्रवासवर्णन’ या साहित्यप्रकाराचे प्रवासानुभवात रूपांतर करीत तब्बल १२ पुस्तके लिहून मराठी साहित्यात आपला वेगळा ठसा उमटवला.

     जे प्रत्यक्ष विदेशी जाऊ शकत नाहीत, ते मीनाताईंची पुस्तके वाचून पर्यटनाचा आनंद मिळवतात आणि जे विदेशी जातात तेसुद्धा ही पुस्तके सोबत घेऊनच जातात. मीना प्रभू यांच्या ‘माझं लंडन’, ‘दक्षिणरंग’, ‘मेक्सिकोपर्व’, ‘चिनी माती’, ‘इजिप्तायन’, ‘तुर्कनामा’, ‘ग्रीकांजली’, ‘गाथा ईराणी’, ‘रोम राज्य’ या पुस्तकांतून परदेशातील प्रेक्षणीय स्थळांची अभ्यासपूर्ण व तपशीलवार वर्णने वाचायला मिळतात.

     ‘माझं लंडन’ या त्यांच्या पहिल्याच पुस्तकाला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या पुस्तकाच्या ७ आवृत्त्या निघाल्या. या पुस्तकाचे  अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिप्यांतरही झाले. भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री शरद पवार यांच्या हस्ते ‘कुकरी’ हे मानचिन्ह देऊन या पुस्तकाचा गौरव करण्यात आला. ‘मेक्सिकोपर्व’, ‘इजिप्तायन’ या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार तर ‘दक्षिणरंग’, ‘चिनीमाती’ या पुस्तकांनाही अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या लेखनाला ‘मृण्मयी पुरस्कार’ही लाभलेला आहे. 

     गोवा येथील महिला साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद भूषवणार्‍या मीना प्रभू यांची बहुतांश पुस्तके ‘नॅब’ने (National Association for Blind) ‘टॉकींग बुक्स’ म्हणून तयार केली आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, तरुण भारत, लोकमत या वृत्तपत्रांतून तसेच अनेक दिवाळी अंकांतून, मासिकांतून त्यांची विपुल लेखन केले आहे. प्रवासवर्णनाखेरीज ‘सुखनिधि तुझा माझा’ हे कवितांचे पुस्तक तसेच ‘मुखवट्याआडचे चेहेरे’ हे प्रिन्स चार्ल्स व डायना यांच्यावरील पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे. मीना प्रभू यांच्या लेखनामागची प्रेरणा श्री.ना.पेंडसे व बाबासाहेब पुरंदरे यांची आहे.

     लेखिकेने संगणक लेखनाचा प्रयोग मराठीत पहिल्यांदा (१९९० साली) केला व हे, सारे लेखन संगणकावरच केले, हे विशेष!

- सुहास बारटक्के

प्रभू, मीना सुधाकर