पठारे, रंगनाथ गबाजी
रंगनाथ गबाजी पठारे यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या जावळे या लहानशा खेडेगावी शेतकरी कुटुंबात झाला. अहमदनगरच्याच महाविद्यालयातून त्यांनी बी. एससी. पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. पुढे पुणे विद्यापीठातून त्यांनी भौतिकशास्त्र विषयात एम. एस्सी. व एम. फिल. असे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. संगमनेरच्या महाविद्यालयात ते भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आहेत.
पठारे यांच्या कथा-कादंबरी लेखनाला विसाव्या शतकातील शेवटच्या दोन दशकांत प्रारंभ झाला. सत्यकथेतून त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. ‘दिवे गेलेले दिवस’ (१९८२), ‘रथ’ (१९८४), ‘चक्रव्यूह’ (१९८९), ‘हारण’ ( १९९०), ‘टोकदार सावलीचे वर्तमान’ (१९९१), ‘ताम्रपट’ (१९९४), ‘दुःखाचे श्वापद’ (१९९५), ‘नामुष्कीचे स्वगत’ (१९९९), ‘त्रिधा’ (२००४), ‘कुंठेचा लोलक’ (२००६), ‘भर चौकातील अरण्यरुदन’ (२००८) ह्या त्यांच्या बहुपेडी आणि बहुचर्चित कादंबर्या. ‘अनुभव विकणे आहेत’ (१९८३), ‘स्पष्टवक्तेपणाचे प्रयोग’ (१९९२), ‘ईश्वर मृतात्म्यास शांती देवो’ (१९९६), ‘गाभ्यातील प्रकाश’ (१९९८), ‘चित्रमय चतकोर’ (२०००), ‘तीव्र कोमल दुःखाचे प्रकरण’ (२०००), ‘शंखातला माणूस’ (२००८) हे त्यांचे कथासंग्रह जीवनातील विविध समस्यांचा सूक्ष्म शोध घेणारे आहेत. ‘सत्त्वाची भाषा’ (१९९७), ‘आस्थेचे प्रश्न’ (२०००), ‘छत्तीसगड’, ‘नियोगींचे आंदोलन आणि सद्यःस्थिती (२००३), ‘प्रश्नांकित विशेष’ (२००८), हे त्यांचे वैचारिक आणि संशोधनात्मक समीक्षा-लेखन. ‘कवीचे अखेरचे दिवस आणि निरागस इरेंदिरा’ (२०००) हा अनुवाद; असे विविधांगी लेखन करणार्या पठारेंनी समकालीन मराठी साहित्यात सर्जनशील असे लेखन करीत आपली स्वतंत्र अस्मिता आणि लेखनशैली सिद्ध केली.
मानवी जीवनातील सनातन समस्यांच्या मुळाशी जाऊन त्या समस्यांची मांडणी पठारे स्वतंत्र लेखन शैलीने कथा- कादंबर्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रूपबंधात करतात. भारतातील आणीबाणी आणि राजकीय प्रश्न, महाराष्ट्रातील मराठा राजकारण, ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद, मराठीतील वाङ्मयीन चळवळी, विद्याक्षेत्रातील प्रश्न, वंशसातत्य आणि जैविक गुणसूत्रांचा शोध, समाजातील माणसांचे विविध पातळ्यांवरील जगणे आणि त्यांच्या अंतर्विश्वाचा शोध घेणे, पुराण मिथकांची नवीन मांडणी, ग्लोबल व्हिलेजमध्ये जगणार्या मध्यमवर्गीय जीवनातील कोलाहल आणि विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवी जीवनात आलेली सुखे आणि त्यांतूनच उद्भवणारी जीवघेणी दुःखे असा समाजाच्या अंतःस्तराचा शोध घेण्याचा पठरे यांच्या एकूण लेखनाचा स्वभाव राहिला आहे. मराठीत प्रयोग करणारे अनेक लेखक आहेत. परंतु प्रयोगातील आपले स्वाभाविकपण टिकवून ठेवण्यात जसे श्याम मनोहरांना यश आले, तसेच ते पठारे यांनाही ते प्राप्त झालेले आहे. दोघेही शैलीनिष्ठ लेखक आहेत. दोघांचीही शैली ही स्वतः कमावलेली आहे. ‘नामुष्कीचे स्वगत’ ही अशीच एक शैलीनिष्ठ, प्रयोगशील आणि वाङ्मयीन रूपासबंधीच्या बाबतीतही परिवर्तन स्वीकारणारी एक चिंतनशील लेखनकृती आहे.
पठारेंच्या लेखनात एक प्रोटॅगॉनिस्ट किंवा निवेदक असतो. त्याला एक स्वतंत्र आणि एक लेखकसापेक्ष अशी वेगळी अस्तित्वे आहेत. लेखकाच्या प्रभावी मांडणीचा साक्षीदार म्हणून पठारे यांच्यातील ‘प्रोटॅगॉनिस्ट’ लेखनकृतीत कार्य करताना दिसतो. पूर्ण लेखनस्वातंत्र्य उपभोगता यावे म्हणूनच पठारे प्रोटॅगॉनिस्टची निर्मिती करतात. त्यांच्या लेखनातील तिरकसता आणि चौकसता ह्या निवेदकाच्या माध्यमातून साहित्यकृतीत अवतरली आहे. जीवनाचा आणि साहित्याचा एकास एक संबंध मानणारा हा लेखक आहे. १९९९ मध्ये त्यांच्या ताम्रपट कादंबरीला साहित्य अकादमीचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला. त्यांच्या अन्य ग्रंथांनाही आजवर राज्य शासनाच्या उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कारासह प्रियदर्शनी अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे पुरस्कार, बी.रघुनाथ वाङ्मय पुरस्कार, पद्मश्री विखे पाटील पुरस्कार, भैरू रतन दमाणी पुरस्कार, नगर वाचन मंदिर, पुणे यांचा पुरस्कार, वि. स. खांडेकर पुरस्कार, श्री. दा. पानवलकर पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार मिळालेले आहेत.
‘तिरकसपणातील सरळता’ (१९९५) या ग्रंथातून डॉ. राजन गवस या लेखकाने पठारे यांच्या लेखनाचा साक्षेपी परामर्श घेतला आहे. त्यांच्या गाजलेल्या ‘नामुष्कीचे स्वगत’ (२००८) या कादंबरीवरील प्रातिनिधिक समीक्षाग्रंथही प्रकाशित झाला. खरे तर संवेदनशील आणि भावविवश असणार्या तसेच जगाकडे सजगपणे आणि कारुण्याने पाहणार्या प्रत्येक माणसाच्या वाट्याला आलेले एक अटळ असे सत्य पठारे यांनी आपल्या लेखनातून मांडले आहे. पठारे यांनी ते मांडले म्हणून ते ह्या जातीच्या माणसांचे एक सच्चे प्रतिनिधी ठरले आहेत.
एकविसाव्या शतकाचे जगाला वेध लागले असताना विसाव्या शतकातल्या माणसाचे एकूणच ह्या शतकाविषयीचे आकलन आणि त्याविषयीच्या त्याच्या प्रतिक्रिया काय? हा प्रश्न वर्तमानात महत्त्वाचाच होता. मनुष्य वर्तमान जगत असतो, भूतकाळाच्या रम्य आठवणीत तो रमतो. भूतकाळातले काळबदल टिपत-टिपत तो वर्तमानात बोलतो आणि भविष्याचे स्वप्न रंगवण्याचेही साधन भूतकाळातून उगम पावूनच वर्तमानात स्थिरावते. वर्तमान हा काही पिढ्यांचा साक्षीदार असतो. काळ बदलाच्या आणि मानवी बदलाच्या अखंड अशा सजीव प्रतिक्रियांचा एक मोठा आलेख पठारे यांनी आपल्या कथा-कादंबर्यांतून मांडलेला आहे. मराठी साहित्यामधला एक वैशिष्ट्यपूर्ण लेखक म्हणून त्यांचे स्थान लक्षणीय आहे.
- डॉ. किशोर सानप