Skip to main content
x

पुणतांबेकर, प्रभाकर माणिक

            प्रभाकर माणिक पुणतांबेकर यांचा जन्म शेडम-गुलबर्गा हैदराबाद येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण हैदराबाद संस्थानाच्या प्रभागामध्ये झाल्यामुळे मराठीबरोबरच त्यांनी उर्दू व हिंदी या भाषांवर प्रभुत्व मिळवले. ते १९५६मध्ये मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी सी.टी. कॉलेज ऑफ हैदराबाद येथून १९६३मध्ये बी.व्ही.एस्सी. ही पदवी द्वितीय श्रेणीमधून संपादन केली. ते पशुवैद्यक पदवीधर होताच १९६३मध्ये महाराष्ट्र राज्य पशु-संवर्धन खात्यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी या पदावर रुजू झाले. त्यांनी १९६८मध्ये महाराष्ट्र कृषी विद्यापीठाच्या इगतपुरी फार्मवर साहाय्यक मुख्याधिकारी या पदाचा कार्यभार स्वीकारला. ते १९६९ ते १९७९ या काळात म.फु.कृ.वि.मध्ये साहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत होते.

           पुणतांबेकर यांनी जनावरांचे आहारामधील पोषणमूल्ये या विषयावरील संशोधन व विस्तार या दोन्ही बाजू समर्थपणे सांभाळल्या. म.फु.कृ.वि.मध्ये कार्यरत असताना १९६८मध्ये सरदार पटेल विद्यापीठ, आणंद येथून डेअरी सायन्स या विषयांतर्गत दुग्धव्यवसायातील आहारमूल्ये या विषयावरील एम.एस्सी. (कृषी) पदवी द्वितीय श्रेणीमध्ये संपादन केली. तसेच १९७५मध्ये गुजरात कृषी विद्यापीठामधून डेअरी सायन्समधील आहारमूल्ये या विषयावर पीएच.डी. संपादन केली. नोव्हेंबर १९७९मध्ये बा.सा.को.कृ.वि.अंतर्गत मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्राध्यापक या पदावर रुजू झाले. ते निवृत्तीपर्यंत याच महाविद्यालयात सहयोगी अधिष्ठाता या पदावर कार्यरत होते.

           डॉ. पुणतांबेकर यांचे दुग्ध व्यवसायावरील ७ प्रमुख लेख अत्यंत लोकप्रिय झाले. त्यांचे शास्त्रीय लेख २५च्यावर प्रसिद्ध झाले आहेत. दुग्ध व्यवसायामधील तंत्रज्ञान आणि त्याबद्दलची जिज्ञासा या विषयावरील प्रसिद्ध झालेले १५ लेख अनेकांना कायमस्वरूपी मार्गदर्शक ठरले. दूरचित्रवाणी व आकाशवाणी या प्रसारमाध्यमांद्वारे दुग्ध व्यवसायामधील १० विविध विषयांवर मार्गदर्शन केले आहे. एम.व्ही.एस्सी. व एम.एस्सी.साठी २५ ते ३० विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले आहे. त्यांना भा.कृ.अ.प., नवी दिल्ली यांच्यातर्फे ५ महत्त्वाच्या शिष्यवृत्त्या मिळाल्या, तसेच अ‍ॅनिमल न्यूट्री.सोसा.ऑफ इंडियाचे आजीवन सदस्य आहेत. महाराष्ट्र शेती उद्योग महामंडळाचे १९९६पर्यंत सल्लागार सदस्य होते. त्यांनी जबलपूर, नवी दिल्ली येथील कृषी विद्यापीठांमध्ये व महामंडळांच्या निवड समितीवर अभ्यासक आणि परीक्षक या भूमिका बजावल्या. डॉ. पुणतांबेकर यांचे इंटरनॅशनल डेअरी काँग्रेस, नवी दिल्ली १९७४, पहिली आंतरराष्ट्रीय पशुआहारामधील पोषणमूल्ये या विषयावर बंगळुरू येथे १९९१मध्ये आयोजित केलेली परिषद, १९९०मध्ये अमेरिकेमधील अमेस विद्यापीठ येथे झालेल्या परिषद व परिसंवादांमध्ये भाग घेतला होता. तसेच ते अमेरिकेमध्ये विविध राज्यांमध्ये अभ्यासदौऱ्यासाठी गेलेल्या शास्त्रज्ञांपैकी एक होते. त्यांनी संपूर्ण सेवाकाळामध्ये अखाद्य वस्तूंचे गुणवत्तेसह खाद्यामध्ये रूपांतर करणे हा प्रकल्प भा.कृ.अ.सं.मार्फत राबवला. भारत-अमेरिका संयुक्त विद्यमाने कत्तलखान्यामधील वाया जाणाऱ्या पदार्थांपासून जनावरांसाठी खाद्यनिर्मिती करण्याचा प्रकल्प भारत देशामध्ये प्रथमच राबवला व यशस्वी केला. डॉ.पुणतांबेकर सेवानिवृत्तीनंतर सामाजिक दायित्व या उद्दात्त हेतूने रामकृष्णमठ यांचे मनोर येथील फार्मवर मानद सल्लागार या पदावर कार्यरत आहेत.

- मिलिंद कृष्णाजी देवल

 

पुणतांबेकर, प्रभाकर माणिक