Skip to main content
x

पवार, जयसिंगराव भाऊसाहेब

      डॉ. जयसिंगराव भाऊसाहेब पवार यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील तडसर या खेडेगावात झाला. सत्यशोधक चळवळीने प्रेरित झालेले गाव आणि शिक्षणाचे महत्त्व जाणलेले वडील, यांमुळे डॉ. पवारांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी कोल्हापूरला जाण्याची संधी मिळाली. शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या ‘प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंंग’मध्ये ते केवळ एक ट्रंक व वळकटी घेऊन दाखल झाले. कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयामधून इतिहास विषयातून ते बी.ए. व नंतर एम.ए. झाले. कोल्हापूरच्याच शिवाजी विद्यापीठात एम.ए.ला त्यांनी इतिहास विषयात प्रथम क्रमांक मिळवला. एम.ए. उत्तीर्ण झाल्यावर शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू व थोर इतिहास संशोधक डॉ. अप्पासाहेब पवार यांनी त्यांची मराठा इतिहास विभागात संशोधन साहाय्यक म्हणून निवड केली (१९६४). वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी इतिहास संशोधक म्हणून त्यांची जडणघडण सुरू झाली. ऐतिहासिक कागदपत्रांचे संशोधन व संपादन याचे प्राथमिक धडे डॉ. अप्पासाहेब पवार यांच्याकडून त्यांना मिळाले. शिवाजी विद्यापीठातील हा चार-पाच वर्षांचा कालखंड त्यांच्या दृष्टीने इतिहास संशोधन क्षेत्रातील प्रशिक्षण म्हणून महत्त्वाचा ठरला.

      पुढे १९६९ ते २००१ या काळात डॉ. पवारांनी महाविद्यालयीन क्षेत्रात इतिहास अध्यापनाचे कार्य केले. या तीन दशकांहून अधिक काळात इतिहास विषयाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांची २० पुस्तके त्यांनी लिहिली आणि ती सर्व महाराष्ट्रभर लोकप्रिय झाली. अनेक संदर्भग्रंथ अभ्यासून अत्यंत सोप्या शैलीत इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी या पुस्तकांमध्ये केली असल्यामुळे ती क्रमिक पुस्तके न राहता, इतिहासप्रेमींची संदर्भ पुस्तके झाली.

     या अध्यापनकाळातच पवारांनी ‘Chh.Rajaram Maharaj and the Maratha State’ हा शिवपुत्र राजाराम महाराजांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारा पीएच.डी.चा आपला प्रबंध सादर करून डॉक्टरेट मिळविली. मार्गदर्शकाशिवाय पूर्ण केलेली ही शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासातील एकमेव डॉक्टरेट होती. या प्रबंधातून डॉ. पवारांनी संयमी व मुत्सद्दी अशा छत्रपती राजारामांच्या कर्तृत्वाला न्याय दिला आहे. तसेच मराठ्यांच्या इतिहासातील राजाराम महाराजांचे योगदान अधोरेखित करत असताना प्रथमच पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्लिश व पर्शिअन साधनांचा वापर करून त्यांनी राजारामकालीन मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या बिकट कालखंडाच्या इतिहासाची पुनर्मांडणी केली आहे.

     न्यायमूर्ती रानडे, इतिहासाचार्य राजवाडे, रियासतकार सरदेसाई यांसारख्या इतिहासकारांनी मराठ्यांच्या इतिहासाची मांडणी करून बराच काळ लोटला होता. आता नव-नवीन ऐतिहासिक पुरावे व साधने उपलब्ध होऊन त्या इतिहासाची पुनर्मांडणी करण्याची गरज होती. अशी मांडणी वा.सी. बेंद्रे, सेतुमाधवराव पगडी, डॉ. अप्पासाहेब पवार यांनी केली. या तिन्ही इतिहासकारांचा प्रत्यक्ष सहवास व मार्गदर्शन डॉ. पवार यांना लाभले. स्वाभाविकच  डॉ. पवारांनी त्यांचा वारसा पुढे चालवला. मराठा इतिहासावर संशोधन करत असताना त्यांच्या हे लक्षात आले की, मराठ्यांच्या इतिहासातील, विशेषत: स्वातंंत्र्ययुद्धाच्या कालखंडातील, व्यक्ती व त्यांच्या कामगिर्‍या उपेक्षित राहिल्या आहेत. त्यांच्या कार्याची दखल इतिहास लेखनात घेतली गेलेली नाही. राजाराम महाराजांशिवाय रामचंद्र पंडित अमात्य, सेनापती संताजी घोरपडे, धनाजी जाधव, महाराणी ताराबाई अशा अनेक कर्तबगार स्त्री-पुरुषांची कामगिरी अंधारात राहिली होती. मग शिवछत्रपतींनंतर ज्यांनी-ज्यांनी स्वराज्य रक्षणाची धुरा सांभाळली त्यांचा इतिहास प्रकाशात आणावा, या कृतज्ञतेच्या भावनेतून डॉ. पवार मराठ्यांच्या इतिहासाकडे आकृष्ट झाले.

     डॉ. पवारांच्या संशोधनाची निष्पत्ती म्हणजे त्यांनी लिहिलेल्या मराठ्यांच्या इतिहासातील स्त्रीकर्तव्य सिद्ध करणारा  ‘महाराणी ताराबाई’ हा संशोधनात्मक ग्रंथ. अत्यंत चिकित्सक वृत्तीने व संशोधकीय बैठकीने तयार केलेला हा ग्रंथ मराठ्यांच्या या राणीचे कर्तृत्व सिद्ध करणारा महाराष्ट्रातील पहिला ग्रंथ ठरला. या ग्रंथामध्ये त्यांनी ताराबाईंचा, छत्रपती राजारामांच्या मृत्यूनंतरचा, ७-८ वर्षांचा औरंगजेबाविरुद्धचा अविश्रांत लष्करी व राजनैतिक लढा, त्यांची रणनीती आणि स्वराज्यनिष्ठा या सर्वांची चिकित्सा नवीन कागदपत्रांच्या आधारे केली. त्यासाठी त्यांनी सर जदुनाथ सरकार, रियासतकार सरदेसाई, ब्रिज किशोर या इतिहासकारांच्या मांडणीचे खंडण करून स्वातंत्र्ययुद्धाच्या इतिहासाची पुनर्मांडणी केली. महाराणी ताराबाईंच्या चरित्र लेखनामुळे इतिहासाची न्यायप्रणीत मांडणी होऊन मराठ्यांच्या इतिहासातील स्त्री-प्रणीत लेखनाला सुरुवात झाली. डॉ. पवारांच्या या चरित्र ग्रंथाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ग्रंथ-निर्मिती पुरस्कारही मिळाला.

     मराठ्यांच्या इतिहासातील वादग्रस्त पण इतिहासप्रेमींना आकर्षित करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. त्यांच्या जीवनाप्रमाणेच इतिहास लेखनातही त्यांची शोकांतिका झाली होती. ही शोकांतिका दूर करण्याचा प्रयत्न इतिहासकार वा.सी. बेंद्रे प्रभृतींनी केला होता. तोच धागा पकडून १९८९ साली डॉ. पवार यांनी संभाजी  महाराजांच्या हौतात्म्याच्या त्रिशताब्दीच्या निमित्ताने एक स्मारक ग्रंथ प्रकाशित करून या मराठा राजाच्या व्यक्तिमत्त्वावर आणि कामगिरीवर अधिक प्रकाश टाकला. या ग्रंथाच्या प्रदीर्घ प्रस्तावनेत त्यांनी मराठी व फारसी बखरकार, इतिहास संशोधक, साहित्यिक व विचारवंत यांच्या संभाजीमहाराजांवरील लिखाणाचा चिकित्सक परामर्श घेतला. विशेषत: शिवाजी-संभाजी या पिता-पुत्रांच्या समज-गैरसमजातून निर्माण झालेल्या भावनिक गुंत्याचा त्यांनी ऐतिहासिक साधनांच्या आधारे उलगडा केला.

      महाराणी ताराबाईंवरील ग्रंथाप्रमाणेच डॉ. पवारांच्या ‘सेनापती संताजी घोरपडे’ या चरित्र-ग्रंथामुळे मराठा इतिहास लेखनात मोलाची भर पडली. मराठ्यांच्या एका महान पण उपेक्षित सेनापतीवरील हा पहिला संशोधनात्मक ग्रंथ ठरला. डॉ. पवारांचे ग्रंथ लेखन हे औरंगजेबाचे इतिहासकार साकी मुस्तैदखान, खाफीखान, भीमसेन सक्सेना यांचे इतिहास ग्रंथ, मोगल दरबारातील बातमीपत्रे व पुराभिलेखागारातील प्रकाशित व अप्रकाशित कागदपत्रे यांचा आधार घेऊन साकारले आहे. यातून संताजीच्या पराक्रमाची, असामान्य नेतृत्वाची व त्याच्या गनिमी काव्याच्या अद्वितीय कौशल्याची चर्चा करून त्याच्या जीवनाच्या शोकांतिकेला त्याचा स्वभावच कसा कारणीभूत ठरला, याचे परखड विवेचन केले आहे.

     मराठ्यांच्या इतिहासातील अनेक अज्ञात व दुर्लक्षित व्यक्तींवर तसेच घटनांवर पुनर्चिकित्सेचा झोत टाकत त्यांना प्रकाशात आणणारा डॉ. पवारांचा आणखी एक महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे ‘मराठेशाहीचा मागोवा’. यामध्ये त्यांनी संभाजी महाराजांना मोगली कैदेतून सोडवण्यासाठी झालेला एक अज्ञात प्रयत्न, १६८९ची मराठ्यांची मसलत, शिवछत्रपती व त्यांचा परिवार असे अनेक काळाच्या पडद्याआड गेलेले विषय हाताळले आहेत.

    याशिवाय डॉ. पवारांनी ‘शिवछत्रपती एक मागोवा’, ‘शिवचरित्रापासून आम्ही काय शिकावे?’, ‘मराठ्यांचे स्वातंंत्र्य युद्ध’, ‘छत्रपती संभाजी- एक चिकित्सा’, ‘आमच्या इतिहासाचा शोध आणि बोध’ असे अनेक ग्रंथ लिहून मराठ्यांच्या इतिहासाचे दालन समृद्ध केले आहे. १९९२ साली डॉ. पवारांनी ‘इतिहास संशोधन आणि त्याद्वारे समाज प्रबोधन’ हे ध्येय ठेवणारी ‘महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी’ ही संस्था स्थापन केली. ‘इतिहासो हि राष्ट्रस्य समाजस्य प्रबोधक:’ हे ब्रीद अंगिकारलेली संस्था उभी केल्यावर डॉ. पवार महाराष्ट्राच्या प्रबोधनकाळाकडे आकृष्ट होणे स्वाभाविकच होते. यातूनच त्यांच्या आधुनिक काळातील थोर समाज क्रांतिकारक राजा राजर्षी शाहू यांच्या कार्यावरील संशोधनास प्रारंभ झाला. ७-८ वर्षांच्या अथक परिश्रमांतून त्यांनी राजर्षी शाहूंवरील १२०० पानांचा एक त्रिखंडात्मक बृहद्ग्रंथ संपादित केला. या ग्रंथामुळे विश्लेषणात्मक शाहू-चरित्राबरोबरच शाहूकालीन छायाचित्रे, जाहीरनामे, पत्रव्यवहार व कायदे असा दुर्मिळ दस्तऐवज प्रकाशित झाला.

    यानंतर राजर्षी शाहू छत्रपतींचे समाजक्रांतीचे विचार महाराष्ट्राच्या बाहेर आसेतुहिमाचल गेले पाहिजेत, असा ध्यास डॉ. पवारांनी घेऊन भारताच्या १४ प्रादेशिक भाषांमध्ये शाहू चरित्र अनुवादित करण्याचा संकल्प सोडला. त्यानुसार कानडी, कोकणी, उर्दू, तेलगू, गुजराती व हिंदी या भाषांत ते आणले गेले. त्याची इंग्रजी व जर्मन आवृत्ती त्यांनी नुकतीच प्रसिद्ध केली असून रशिअन आवृत्ती प्रकाशनाच्या मार्गावर आहे.

     १९९२ साली महाराष्ट्रातील इतिहास-अभ्यासकांनी एकत्र येऊन ‘अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदे’ची स्थापना केली. या संस्थेचे पहिले संस्थापक अध्यक्ष डॉ. पवार झाले. परिषदेच्या एका अधिवेशनात वाचले गेलेले शोधनिबंध पुढच्या अधिवेशनात प्रसिद्ध केले जातात. हा पायंडा डॉ. पवारांनी सुरू केला. त्यामुळे परिषदेतर्फे आजपर्यंत २२ शोध निबंध संग्रह प्रकाशित झाले आहेत.

     १९७० साली डॉ. पवार यांचे गुरू डॉ. अप्पासाहेब पवार यांनी शिवाजी विद्यापीठात ‘शाहू संशोधन केंद्र’ या संस्थेची स्थापना केली. राजर्षी शाहूंच्या कारकिर्दीच्या कागदपत्रांचे अनेक खंड केंद्रातर्फे प्रकाशित झाले आहेत. गेली ७-८ वर्षे डॉ. जयसिंगराव पवार हे आपल्या गुरूने स्थापन केलेल्या संशोधन संस्थेत फक्त १/- रु. प्रतिकात्मक मानधन घेऊन संचालक म्हणून कार्यरत आहेत. राजर्षी शाहूंच्या चरित्राशी व आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित अशा अनेक ग्रंथांचे प्रकाशन या केंद्रातर्फे त्यांनी ‘राजर्षी शाहू साहित्य माला’ द्वारे केलेले आहे. डॉ. पवार यांना आत्तापर्यंत २५ हून अधिक सामाजिक व साहित्यिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

डॉ. मंजुश्री पवार

पवार, जयसिंगराव भाऊसाहेब