Skip to main content
x

फाटक, पद्मजा शशिकांत

     प्रसन्न शैलीत ललितलेखन करणार्‍या पद्मजा शशिकांत फाटक यांचा जन्म नागपूर येथे झाला. अठराव्या वर्षी त्यांचे लग्न झाले. त्यांची जडण-घडण आईपेक्षा बाबांच्या मुशीतून अधिक झाली. वडिलांनी खूप चिकाटीने परंतु मैत्रीच्या जिव्हाळ्याने त्यांना ‘संगोपनात मोडणार्‍या लहानमोठ्या गोष्टी’ शिकवल्या. वडिलांनी माणुसकी अधोरेखित केली. या त्यांच्या पद्मोदय घरात बालसन्मानाला महत्त्व होते. मुलीला एन.सी.सी.चे शिक्षण, कुठल्याही पाण्यात पोहणे, एकटीने सिनेमाला जाणे, बोटिंग, ग्लायडिंग आशा गोष्टींनाही प्रोत्साहन देणार्‍या बाबांनी बौद्धीक प्रामाणिकता, सुसंगती, समानुभूती, निरीश्वरवाद ह्यांचे संस्कार केले. मानवजातीविषयी अपार करुणा ही वडिलांचीच देणगी होती.

     गुजरातेतून महाराष्ट्रात आल्यावरही बाबांची नाळ प्रादेशिकतेशी जरी जोडली गेली नाही, तरी पद्मजाताईंना इरावती कर्वे, दुर्गाबाई भागवत, मौज, सत्यकथा इत्यादींची साहित्य-खाण सापडली. वडील देशाटन करू शकले नाहीत, पद्मजाताईंनी विश्वपर्यटन केले व आपल्या अनुभवांची व्याप्ती वाढवली.

     पद्मजा यांनी आत्तापर्यंत विविध प्रकारचे लेखन केले आहे. त्यात ‘शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक’ (१९८१) हा चरित्रग्रंथ, ‘हसरी किडनी’ (२०००) हे अनुभवकथन, ‘अमेरिकन समाजाची ओळख करून देणारी ‘आवाजो’ आणि ‘हॅपी नेटवर्क टु यू’ ही पुस्तके, ‘राही’ हा कथासंग्रह, ‘गर्भश्रीमंतीचं झाड’ (१९७९) व ‘सोनेलु मियेर’ (१९८६) हे ललितलेखसंग्रह, ‘चिमुकली चांदणी’ (१९७२), ‘चमंगख चण्टीगो’ (खमंग गोष्टी- १९७८), ‘हिंदविजय सोसायटीतले पगडी आजोबा’ (१९८०), ‘पैशांचं झाड’ (१९७५) या बालसाहित्याचा समावेश आहे. ‘लिहायचं असेल, तर काय करायचं ते नीटपणे कर अन्यथा करूच नकोस, हे वडिलांचे आत्मीयतेचे परंतु सक्रिय भरीव संस्कार पद्मजाताईंनी मनापासून जोपासले आहेत, ते विशेषतः त्यांनी ताराबाई मोडकांचे चरित्र लिहून प्रत्ययास आणून दिले आहे.

     आधुनिक, पुरोगामी प्रवृत्तीच्या लेखिका पद्मजाताई यांच्या मनमोकळ्या प्रसन्न शैलीमुळे, विचारपरिप्लुत व आशयसमृद्धी यांमुळे वेगळेपणा ठसवणारे त्यांचे लेखन लोकप्रिय ठरलेले आहे. एम.ए. झालेल्या पद्मजाताईंनी, दीपा गोवारीकर व विद्या विद्वांस यांच्या सहकार्याने संपादित केलेल्या ‘बापलेकी’मध्ये आपल्या वडिलांच्या आवडीनिवडींच्या सवयींच्या उल्लेखासोबत त्यांनी केलेल्या संस्कारांचे उत्तम व साक्षेपी दर्शन घडविले आहे.

     त्यांच्या लेखन कार्यासाठी त्यांना विविध पुरस्कार प्राप्त झाले. २०१४ साली त्यांचे निधन झाले. 

- वि. ग. जोशी

फाटक, पद्मजा शशिकांत