राजाध्यक्ष, विजया मंगेश
मराठी नवकथेने निर्माण केलेल्या नव्या वाङ्मयीन वातावरणात लिहू लागलेल्या साहित्यिकांपैकी एक प्रमुख साहित्यिक विजया राजाध्यक्ष यांचा जन्म मिरज येथे झाला. आईचे नाव सरस्वती गणेश आपटे, वडिलांचे नाव गणेश रामचंद्र आपटे. कोल्हापूरला, प्रतिष्ठित असणार्या एकत्र कुटुंबात संगोपन झाले. सुसंस्कारित असे बालपण आणि शालेय व महाविद्यालयीन जीवन गेले. ब्रँच राजाराम हायस्कूलमधून एस.एस.सी. (१९५०), राजाराम महाविद्यालयातून बी.ए. (१९५४), पुणे विद्यापीठाची एम.ए.ची पदवी (१९५६) घेतली. लेखक व समीक्षक असणार्या प्रा.मं.वि.राजाध्यक्ष यांच्याशी विवाह (१९५६) त्यानंतर मुंबईत वास्तव्य केले. एल्फिन्स्टन मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. (१९८०) श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठात पदव्युत्तर मराठी विभाग प्रमुख निवृत्त झाल्यानंतर याच विद्यापीठात ‘सुप्रतिष्ठ प्राध्यापक’ (झीेषशीीेी एाशीर्ळीीीं) म्हणून नियुक्ती झाली. दोन्ही विद्यापीठांतील एम.फिल. व पीएच.डी. करणार्या विद्यार्थ्याच्या मार्गदर्शक आहेत.
कोल्हापूर ते मुंबई हे स्थलांतर विजयाबाईंच्या वैयक्तिक आयुष्याबरोबर वाङ्मयीन जीवनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे ठरले. ‘कलापूर’ असणार्या लहानशा गावातील पारंपरिक, जुन्या जीवनसरणीचे संचित घेऊन मुंबईसारख्या मोठ्या, बहुरंगी, आधुनिक जीवनशैली असणार्या शहरात आल्यानंतर प्रत्येक कलाक्षेत्रातील नवतेचे भान वाढत गेले. १९५०मध्ये ‘कशाला आलास तू माझ्या जीवनात!’ ही त्यांची पहिली कथा, ‘स्त्री’ मासिकात प्रकाशित झाल्यानंतर; ‘अधांतर’ (१९६५) ते ‘जास्वंद’ (२००७) या कालावधीत ‘विदेही’ (१९७२), ‘अनोळखी’ (१९७३), ‘अकल्पित’ (१९७६), ‘कमान’ (१९७८), ‘हुंकार’ (१९८४), ‘अनामिक’ (१९९०), ‘समांतर’ (१९९९) असे एकूण वीस कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.
विजयाबाईंची कथानिर्मितीची प्रदीर्घ वाटचाल अनेक दृष्टींनी विकसनशील असल्याचे जाणवते. जाणिवांची व्यामिश्रता व अभिव्यक्तीतील प्रयोगशीलता यातून ही कथा सकस होत आली आहे. आत्मकेंद्रित, स्वप्नाळू चित्रणाकडून कौटुंबिक व सामाजिक वास्तवाच्या दर्शनाकडे, अतिरिक्त काव्यात्मता व अलंकारिकता जाऊन साध्यासोप्या भाषेकडे, भावनात्मकतेपेक्षा मूल्यात्मक जाणिवेकडे, विविध घाटांचे उपयोजन करण्याचा प्रयोग, वानप्रस्थाश्रमाच्या संवेदनशीलतेतून घेतलेला जीवनाचा वेध, नाट्य व काव्य यांचा समन्वय साधणारी ‘त्रिवेणी’सारखी कथा, कादंबरीच्या पाऊलखुणा उमटवणार्या दीर्घकथा (‘आधी-नंतर’ हा संग्रह) असा हा कथाप्रवास आहे. गौरी देशपांडे यांच्या कथेत प्राधान्याने नित्यमुक्त, सहजमुक्त स्त्री आहे, तर विजयाबाईंच्या कथेत वेगवेगळ्या पिढ्यांतील बद्धमुक्त स्त्रीची जीवनकहाणी आहे. ‘लेखकांत लिंगभेद मानू नये’ ही विजयाबाईंची धारणा लक्षात घेऊनही ‘जन्म’, ‘कमल’, ‘विदेही’, ‘देह मृत्यूचे भातुके’, ‘ऋतुचक्र’ यांसारख्या कथा विजयाबाईंसारखी लेखिकाच लिहू शकते, असे वाटल्यावाचून राहत नाही.
विजया राजाध्यक्ष यांचे कथाविश्व स्त्रीलक्ष्यी असले, तरी मानवी मन व जीवन यांविषयीचे त्यातील आकलन स्त्रीवादी वा अशा कोणत्या विचारप्रणालीच्या चौकटीतले नाही. आयुष्यातल्या गुंतागुंतीचे भान त्यातून प्रकट होते, जीवनाकडे पाहण्याच्या विविध दृष्टी त्यातून सूचित झाल्या आहेत. जन्म-मृत्यू, श्रद्धा-अश्रद्धा, न्याय-अन्याय, साफल्य-वैफल्य यांच्यातील जटिलतेचे भान राखत, मानवी अस्तित्व, संस्कृती व मूल्यविचार अशा अनेक संदर्भातील स्वत्वाचा शोध हे त्यांच्या कथेचे बलस्थान आहे. परंपरा व आधुनिकता यातील निरंतर द्वंद्वाची जाण ठेवत जुन्या-नव्याचा पुनर्विचार, संतुलन व समन्वय अशा जाणिवा त्यातून व्यक्त होतात. ज्या नवसाहित्याच्या प्रभावकाळात विजयाबाईंच्या लेखनाला आरंभ झाला, त्यातील नवतेच्या जाणिवेत, रोमॅन्टिक परंपरेला छेद हा एक ठळक विशेष होता. पण विजयाबाईंच्या एकूण लेखनात सूक्ष्मपणे व व्यापक अर्थाने आशावादी जीवनजाणीव प्रत्ययाला येते. साध्या माणसाची निरागसता, स्त्रीचे सर्जनशील मनोबल, माणुसकी, मानवी अस्तित्वाचे सातत्य, सहजीवनातून मिळणारी मनःशांती, अभागी जीवांसाठी जगण्याचे मूल्य, आणि मानवी निर्मितिशीलता यावरील दृढ विश्वास प्रकट होत राहतो. संवादाची व समन्वयाची एक व्यापक अशी मूल्यजाणीव विजयाबाईंच्या व्यक्तित्वात आहे. त्यांची समीक्षाही केवळ जाणकारांसाठी नाही तर सर्वसामान्य रसिकाला आस्वादाची प्रेरणा देणे व चिकित्सेला पोषक वातावरण निर्माण करणे ही संवादाची भूमिका त्यामागे असल्यामुळे सुगम भाषाशैली हे तिचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. विजयाबाईच्या आस्वादक व विश्लेषक दृष्टींचा संगम त्यात आहे.
‘कथा’ या वाङ्मयप्रकाराशी विजयाबाईंची प्रधान निष्ठा असली तरी, ‘ललित लेख’ या रचनाप्रकारातही त्यांनी लक्षणीय लेखन केले आहे. ‘कदंब’ (१९७९), ‘स्वच्छंद’ (१९८७) आणि ‘अनुबंध’ (१९९८) या संग्रहामध्ये आत्मपर लेख व व्यक्तिचित्रे यांचा समावेश आहे. अनेक प्रतिभावंतांच्या कर्तृत्वाचे काही अपरिचित पैलू त्यात प्रकट झाले आहेत. ‘नित्य नवा दीस जागृतीचा’ या सदरलेखनात एका मध्यमवर्गीय, चाळिशीच्या टप्प्याशी पोचलेल्या स्त्रीच्या आयुष्यातील ‘जागृती’च्या दिवसांची रेखाटने आहेत; तर ‘अवतीभवती’ (१९८२) या संग्रहात मुंबईच्या बहुरंगी जीवनाशी आणि माणसे, नाटके, चित्रपट, संगीत, पुस्तके (विशेषतः कविता) या सगळ्याशी संवाद साधू पाहणार्या विजयाबाईंच्या रसिक, संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते. ‘तळ्यात...मळ्यात’मधील (१९९७) लेखन, वानप्रस्थाश्रमातील संवेदनशीलतेतून आकारला आले आहे. ‘साठ वर्षांच्या जगण्यातून कळत गेलेले सत्य विजयाबाईनी मांडले आहे; ते आयुष्याविषयी, जगण्यातील श्रेयाविषयी आहे. ‘बहुपर्यायी आयुष्य जगताना अनेक वाटा खुल्या होतात, संपूर्णत्वाचा शोध अधिक आत्मविश्वासाने घेता येतो. त्यासाठी त्या वाटांचे एकमेकांशी काही नाते मात्र हवे. ते नाते शोधणे म्हणजेच जगणे!’ ‘स्वतःभोवती वेगाने फिरणार्या नातेसंबंधाच्या, कर्तव्याच्या, कामाच्या चक्रात स्वतः एखाद्या स्थिर आसासारखे राहणे, आणि तरीही ते चक्र फिरते ठेवणे हे खरे श्रेय.’ विजयाबाईंचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या चिंतनातही अनुस्यूत आहे.
समीक्षक व संशोधक या नात्यांनीही विजयाबाईंची कामगिरी अतिशय महत्त्वाची आहे. १९५५ च्या सुमाराला परीक्षणे (मुख्यतः ‘सत्यकथेत’) लिहिल्यापासून त्यांनी समीक्षात्मक लेखन सुरू केले. ‘कवितारती’ (१९७९), ‘जिव्हार स्वानंदाचे’ (१९८१) आणि ‘वेध कवितेचा’ (१९९०) या त्यांच्या समीक्षा-लेखसंग्रहात तसेच ‘कविता दशकाची’ (१९८०) या सहकार्याने केलेल्या संपादनांत, विविध प्रवृत्ती असणार्या कवींच्या अनुभवविश्वाचे व आविष्कार-विशेषांचे विवेचन आहे. ‘संवाद’ (१९८५) या निराळ्या, वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकात, वा.ल.कुलकर्णी, गंगाधर गाडगीळ व गो.वि.करंदीकर यांच्या प्रदीर्घ वाङ्मयीन मुलाखतीतून मराठी साहित्य व समीक्षा यांच्या अभ्यासासाठी उपयुक्त अशी साधनसामग्री विजयाबाईंनी उपलब्ध करून दिली. श्रेष्ठ व युगप्रवर्तक नवकवी बा.सी.मर्ढेकर हा विजयाबाईंचा आयुष्यभराचा ध्यास आहे. ‘मर्ढेकरांची कविता: स्वरूप आणि संदर्भ’ (१९९१) ह्या त्यांच्या द्विखंडात्मक ग्रंथात मर्ढेकरांच्या काव्याचा संशोधनपूर्वक केलेला सर्वांगीण अभ्यास आहे. या संशोधनातून मिळालेल्या चरित्रात्मक सामग्रीच्या आधारे, मर्ढेकरांच्या आयुष्याशी व कवितेशी संबंधित अशा लेखांचा संग्रह ‘पुन्हा मर्ढेकर’मध्ये (२००८) आहे, तर ‘शोध मर्ढेकरांचा’ (२००९) या पुस्तकातील लेखन, मर्ढेकरांच्या व्यावसायिक व वाङ्मयीन जीवनावर भर देणारे आहे. ‘आदिमाया’ (१९९०) (विंदा करंदीकरांच्या प्रेमकवितांचे संपादन व प्रस्तावना) आणि ‘करंदीकरांचे समग्र लघुनिबंध’ (१९९६) (संपादन व प्रस्तावना) या पुस्तकानंतरचा ‘बहुपेडी विंदा’ (खंड १-२००५ व खंड २- २००६) हा विजयाबाईंचा ग्रंथ लक्षणीय आहे. गो.वि.करंदीकर यांच्या समग्र साहित्याचे परिशीलन करणारा, हा मराठीतील पहिलाच द्विखंडात्मक समीक्षाग्रंथ आहे. ‘मराठी वाङ्मयकोश (खंड ४)- समीक्षा-संज्ञा’ (२००२) (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ) या मौलिक ग्रंथाच्या समन्वयक संपादक या नात्याने विजयाबाईंनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. सुनीता देशपांडे यांच्या आत्मकथनावरील, ‘आहे मनोहर तरी: वाचन आणि विवेचन’ (२०००) हे श्री.पु.भागवत यांच्या सहकार्याने संपादित केलेले पुस्तकही वैशिष्ट्यपूर्ण आहे. श्रीमती नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठात आयोजित केलेल्या कार्यशाळा, चर्चासत्रे व संशोधनप्रकल्प अशा उपक्रमांतून विजयाबाई व त्यांचे सहकारी यांनी मिळून संपादित केलेली उपयुक्त पुस्तके सिद्ध झाली; ‘हास्य-विनोद-सुखात्मिका’ (१९९२), ‘वाङ्मयीन पत्रव्यवहार’ (१९९३), ‘कथाशताब्दी’ (१९९३) आणि ‘प्रबंधसार’ (१९९३). अशा तर्हेने लेखिका, समीक्षक व अध्यापक अशी तीन रूपे विजयाबाईंच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वात समाविष्ट आहेत. गेल्या अर्धशतकातील वाङ्मयीन संस्कृतीच्या त्या साक्षीदार तर आहेतच, शिवाय ही संस्कृती घडवण्यातही त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. त्यांच्या या बहुविध साहित्यिक कर्तृत्वाचा उचित असा गौरव करणारे अनेक पुरस्कार, पारितोषिके व मानसन्मान त्यांना लाभले आहेत. ‘अधांतर’, ‘विदेही’, ‘पारंब्या’ या तीन कथासंग्रहांना व ‘बहुपेडी विंदा’ या ग्रंथाला महाराष्ट्र शासन राज्यपुरस्कार; ‘कवितारती’ला राज्य पुरस्काराबरोबर रा.श्री.जोग समीक्षा पारितोषिक, तसेच ह.श्री.शेणोलीकर पुरस्कार; मर्ढेकरांची कविता स्वरूप आणि संदर्भ या द्विखंडात्मक ग्रंथाला ‘साहित्य अकादमीचा पुरस्कार’, तसेच ‘कै.केशवराव कोठावळे पुरस्कार’, सर्वोत्कृष्ट विद्यापीठ अध्यापक गौरव पुरस्कार इत्यादी. त्याचबरोबर विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे ‘एमिरिटस फेलोशिप’ ही त्यांना प्रदान करण्यात आली होती. मराठी वाङ्मय परिषद, बडोदे, कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई महानगर संमेलन, इंदूर येथे झालेल्या ७४व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना प्राप्त झाला. आशा बगे, अंबिका सरकार व सानिया या कथाकारांनी, त्यांच्या कथालेखिका म्हणून झालेल्या घडणीत, विजयाबाईंच्या कथांचा वाटा होता, असे कृतज्ञतापूर्वक उल्लेख केलेले आढळतात.
- प्रा.मीना गोखले