Skip to main content
x

राऊत, शांताराम काशिनाथ

      ल्पक बोधचिन्हे करण्यासाठी प्रसिद्ध असलेले शांताराम काशिनाथ राऊत यांचा जन्म ठाणे येथे झाला. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व स्वातंत्र्यसैनिक काशिनाथ रघुनाथ राऊत ऊर्फ नानाजी राऊत यांचे ते चिरंजीव आहेत. मुंबईतील सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट या कलाशिक्षणसंस्थेतून त्यांनी कमर्शिअल आर्टची पदविका १९५२ साली प्राप्त केली.

‘उल्का अ‍ॅडव्हर्टायझिंग’ आताची सुप्रसिद्ध ‘एफसीउल्का’ या भारतातील प्रमुख जाहिरात संस्थेत संकल्पनकार म्हणून सुरुवात करून ते कला विभागाचे प्रमुख म्हणून निवृत्त झाले. तेथेच ज्येष्ठ कला सल्लागार म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. त्यांचे कलागुरू चापगर, र.कृ. जोशी, बाळ मुंडकुर व अ‍ॅन मुकर्जी यांच्या प्रोत्साहनामुळे ते बोधचिन्हांच्या अभ्यासाकडे वळले व पुढे तीच त्यांची ओळख ठरली.

राऊत यांनी ‘सर्जनशीलतेचे एक आव्हान : बोधचिन्ह’ हे छोटे पुस्तक लिहिले आहे. बोधचिन्हाचा इतिहास ते बोधचिन्हाची निर्मितिप्रक्रिया त्यांनी या पुस्तकात विशद करून सांगितली आहे. तसेच त्यांनी स्वत: केलेल्या; टाटा मेमोरिअल हॉस्पिटल अ‍ॅण्ड कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट, मुंबई; इन्डाफेअर, न्यू दिल्ली (भारत सरकार); बालविकास सेवा योजना (भारत सरकार);  जिज्ञासा - बालविकास संस्था; ठाणे आर्ट सोसायटी; ठाणे स्कूल ऑफ आर्ट; यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अशा अनेक संस्थांच्या बोधचिन्हप्रक्रिया सुंदररीत्या उलगडून सांगितल्या आहेत.

त्यांची तेहरान प्रदर्शनातील कलाकृती स्वस्तिक, कमळ व त्यामधून केलेले गणेशाचे चित्रांकन हा ग्रफिक शैलीचा उत्तम नमुना ठरला. पारंपरिक भारतीय संस्कृतीमधील त्यांचे ‘सरस्वती’चे तंत्रआर्टशैलीतील बोधचिन्ह लोकप्रिय झाले. षटकोनाकृती मधाचे पोळे व प्रकाशवलयातील मधमाशी हे शिस्तबद्धता आणि भविष्यातील उत्कर्षाचे प्रतीक असलेले बोधचिन्ह राऊत यांनी सारस्वत बँकेसाठी तयार केले. भौमितिक तसेच चीनमधील तानग्र्राम खेळातील आकारांचा राऊत यांनी अनेक बोधचिन्ह- निर्मितीमध्ये सर्जनात्मक वापर केलेला आहे.

त्यांनी १९८३ मध्ये तयार केलेले साउथ आफ्रिका व नामिबिया येथील स्त्रियांच्या संघटित लढ्यावरील वर्णद्वेषविरोधी जागतिक परिषदेकरिता केलेले बोधचिन्ह जगभर गाजले. दृक्कलेतील दृष्टिभ्रम संकल्पनेवर आधारित या बोधचिन्हात्मक भित्तिचित्रांमध्ये कबुतराच्या पंखांमध्ये गोऱ्या व काळ्या माणसांचे चेहरे चित्रित केलेले जाणवतात. संयुक्त राष्ट्रांच्या भित्तिचित्र व बोधचिन्ह स्पर्धेत राऊत यांना चार वेळा पारितोषिके मिळाली आहेत. कागद व इतर माध्यमांतून जगातील वेगवेगळ्या देशांतील पारंपरिक मुखवटे बनविण्याचे त्यांचे कौशल्य सर्वांना परिचित आहे. त्यांनी अनेक संस्थांसाठी याची प्रात्यक्षिके केलेली आहेत.

उपयोजित कलेच्या व्यापारी जगात कलेची अभिजातता टिकवणारा हा कलाकार आहे. त्यांच्या प्रसिद्ध सरस्वती शैलीतील बोधचिन्हात्मक कलाकृती एअर इंडिया, तसेच अनेक संस्थांच्या संग्रही आहेत. १९९० मध्ये टाटा स्मारक केंद्राच्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या सुवर्णजयंतीनिमित्त भारत सरकारने त्यांच्या बोधचिन्हांची स्टॅम्पच्या डिझाइनसाठी निवड केली.

शांताराम राऊत ठाणे शहराच्या कला व सामाजिक कार्यांत सक्रिय असल्यामुळे ठाणे महानगरपालिकेने त्यांचा सन्मान केला . ठाणे स्कूल ऑफ आर्टच्या संस्थापनेतही त्यांचा मार्गदर्शक म्हणून सहभाग होता.

- रंजन जोशी

राऊत, शांताराम काशिनाथ