Skip to main content
x

सामंत, बाळ गंगाधर

     बाळ गंगाधर सामंत यांचा जन्म चंदगड जि. बेळगाव येथे झाला. मुंबईच्या रुईया महाविद्यालयातून मराठी घेऊन ते बी.ए.झाले आणि मुंबई विद्यापीठाची एम.ए.पदवी त्यांनी प्राप्त केली. प्रारंभीच्या काळात त्यांनी पत्रकारिता केली. १९४९पासून ते शासनाच्या प्रसिद्धी खात्यात नोकरी करू लागले. शासकीय खात्यात त्यांनी विविध पदे भूषविली. मुख्यमंत्र्यांचे साहाय्यक म्हणूनही त्यांनी काम केले. १९६६नंतर बड्या खासगी कंपन्यांचे संपर्काधिकारी म्हणून ते कार्यरत होते. निवृत्तीपूर्वी ते रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये सल्लागार होते.

     प्रारंभीच्या काळात त्यांनी प्रामुख्याने विनोदी लेखन केले. ‘खिरापत’, ‘गोंधळ’, ‘नवराबायको’, ‘करामत’, ‘खुषमस्करी’ आदी चाळीसएक विनोदी कथा व लेखांचे संग्रह त्यांच्या नावावर आहेत. शासकीय कारभाराचा प्रत्यक्ष अनुभव असल्यामुळे त्यांतील बारकावे सामंतांना ठाऊक होते. त्यामुळे त्यांचा मार्मिक उपहास करणार्‍या, त्यांतील त्रुटींवर हलक्याफुलक्या पद्धतीने टीकाटिप्पणी करणार्‍या अनेक कथा त्यांनी लिहिल्या आहेत.

     चौफेर वाचन, नाट्यसंगीताविषयी आकर्षण, प्रवासाची आवड यांमुळे सामंतांचे उत्तरकालीन लेखन विविधांगी आहे. बालगंधर्वांचा निकटचा सहवास त्यांना लाभला. त्यांनी ‘तो राजहंस एक’ (१९८८) हे बालगंधर्वांसंबंधी चरित्रात्मक पुस्तक लिहिले. ‘मरणात खरोखर जग जगते’ (१९९३), ‘प्रेमग्रंथ’ (१९९६) ही तत्त्वचिंतनात्मक पुस्तके त्यांनी लिहिली. ‘हिटलर, एक महान शोकांतिका’, ‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार’ ‘गजराज’ अशी काही वैशिष्ट्यपूर्ण पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. २००४ साली ‘पद्मश्री’ ही पदवी देऊन केंद्रशासनाने त्यांचा गौरव केला.

       - डॉ. सुभाष भेण्डेे

सामंत, बाळ गंगाधर