Skip to main content
x

सावंत, शिवाजी गोविंद

     कादंबरीकार शिवाजी गोविंद सावंत यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा या गावी झाला. बी.ए.च्या प्रथम वर्षाचे शिक्षण घेतल्यावर त्यांनी कॉमर्सचा डिप्लोमा घेतला व काही काळ कोल्हापूरच्या मेन राजाराम हायस्कूलमध्ये अध्यापक म्हणून नोकरी केली. नंतर, पुणे मुक्कामी, राज्यसरकारच्या शिक्षणखात्यात त्यांनी ‘लोकशिक्षण’ मासिकाचे सहा वर्षेे संपादन केले. त्यानंतर सावंतांनी केवळ चरित्रात्मक कादंबरी-लेखनाला वाहून घेतले.

     अमाप साहित्य उपलब्ध असलेल्या व भारतीयांचा मानबिंदू असलेल्या प्रसिद्ध महाभारतातील कर्णाच्या जीवनावर आधारलेली ‘मृत्युंजय’ ही कादंबरी सावंतांनी १९६७ साली प्रकाशित केली. या कादंबरीच्या वीस आवृत्त्या निघून हजारो प्रती संपल्या, यावरून तिच्या प्रचंड लोकप्रियतेची सहज साक्ष पटावी. यावरच आधारित नाटकही सतत बारा वर्षे रंगभूमीवर यशस्वी ठरले. इतकेच नव्हे, तर ‘मृत्युंजय’ची कन्नड, गुजराती, मल्याळी, बंगाली, हिंदी व राजस्थानी भाषांतील भाषांतरेही लोकप्रिय झाली.

     ‘अशी मने असे नमुने’ या शिवाजी सावंतांच्या पुस्तकाच्या चार आवृत्त्या निघाल्या. त्यात ते म्हणतात,

     ‘माझ्या साहित्यिक वाटचालीत आजर्‍याला फार मोलाचे आणि अविस्मरणीय असे स्थान आहे. ही आहेत त्या गावाकडची म्हणजे आजर्‍याकडची घाटोळी माणसं. माझं त्यांचं प्रत्यक्ष रक्ताचं जमलेलं असं कोणतंच नातं नाही; पण रक्तापेक्षा माती अधिक दाट असावी ! माणसाच्या अबोध व कोर्‍या मनाची पाटी जिथं घडते, बनत असते, तो परिसर फार फार महत्त्वाचा असतो, असं मला वाटतं.’

     ‘मोरावळा’ या पुस्तकात ते सहज आपले मत व्यक्त करतात, ‘शेवटी साहित्याचं सर्वश्रेष्ठ मौलिक तत्त्व कोणतं? ‘वाचकाला लेखकानं समानानुभूती देणं हेच नाही का?’ मोरावळा गुणकारी तर असतोच; पण लज्जतदार, पौष्टिक व खुमासदारही असतो.’ या संग्रहातील व्यक्तिचित्रे तशीच आहेत.

     चरित्रात्मक कादंबरी लेखन हे आवडते क्षेत्र असल्याने शिवाजीरावांनी छत्रपती संभाजीच्या जीवनावर ‘छावा’ (१९७९), पद्मश्री विखे पाटील यांच्या जीवनावर आधारलेली ‘लढत’ (१९८५), श्रीकृष्ण चरित्रावर ‘युगंधर’ (२०००) ही प्रदीर्घ कादंबरी लिहिली. याशिवाय, ‘शेलका साज’, ‘कांचनकण’ हे ललित लेखनही त्यांनी केलेले आहे. सावंत यांची आणखीही ग्रंथसंपदा आहे. उदा. युगंधर : एक चिंतन.

     शिवाजी सावंत यांना भारतीय ज्ञानपीठाचा ‘मूर्तिदेवी’ पुरस्कार, ‘पूनमचंद भुतोडिया’ हा बंगाली पुरस्कार, कोल्हापूर भूषण, पुणे विद्यापीठाचा ‘जीवनगौरव’ हा पुरस्कार, असे नामांकित पुरस्कार लाभले. चरित्रात्मक कादंबरीच्या क्षेत्रात शिवाजी सावंतांनी आपले नाव अजरामर करून ठेवले आहे.

     - वि. ग. जोशी

सावंत, शिवाजी गोविंद