Skip to main content
x

शेंबेकर, गोविंद रघुनाथ

              गोविंद रघुनाथ शेंबेकर यांचा जन्म पश्‍चिम विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील शेंबा या लहानशा खेड्यात झाला. त्यांचे मूळ आडनाव वाघमारे, पण शेंबा गावचे रहिवाशी म्हणून शेंबेकर असे त्यांचे आडनाव प्रचलित झाले. त्यांचे वडील रघुनाथ, सरकारी नोकरीत मामलेदार (नायब तहसीलदार) होते. गोविंद दोन वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. नंतर गोविंद यांचे पालनपोषण त्यांची आई सारजाबाई यांनी केले. गोविंद शेंबेकर यांचे लीलाताई यांच्याशी १९३८मध्ये लग्न झाले. ते १९३४मध्ये खामगाव येथे संस्कृतमध्ये विशेष प्रावीण्य मिळवून मॅट्रिक परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. नागपूर येथे बी.एस्सी. (कृषी) झाले आणि लगेच छिंदवाडा येथे कृषि-अधिकारी म्हणून सरकारी नोकरीत रुजू झाले.

              ‘सुशिक्षित तरुणांनी खेड्यात जाऊन काम करावे’ या म. गांधींच्या आवाहनाला साद देत नोकरीचा राजीनामा देऊन शेंबेकर गावात परतले आणि आपला गाव, आपली काळी आई, शेतीच्या सेवेत खर्‍या अर्थाने रुजू झाले.

              शेंबेकर यांनी शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करून शेतकर्‍यांना प्र्रोत्साहन दिले. बी-बियाणांची निर्मिती, पाण्याची बचत करणे, त्याचे व्यवस्थापन, शेतातच अनेकानेक टाकाऊ वस्तूंपासून खतनिर्मिती करणे (उदा., हिरवळ, वाळलेला पालापाचोळा, तुर्‍हाट्या इ.) खते तयार करण्यासाठी विविध प्रकार शोधणे, शेतात यंत्रांचा वापर, जैविक रोग व कीड नियंत्रणासाठी वेगळे अर्क, औषधी तयार करून ती पिकांवर शिंपडणे असे नानाविध प्रयोग करून परिसरातील शेती व्यवसाय त्यांनी फुलवला. कमीत कमी पाण्यात कोरडवाहू जमिनीची शेती त्यांनी चांगली पिकवून दाखवली. येथूनच गोविंद शेंबेकर सर्वांचे ‘बुवासाहेब’ झाले. त्या काळी गावात वीज नव्हती. त्याही परिस्थितीत त्यांनी पिठाची गिरणी सुरू केली. त्याच्या आधारावर वीजनिर्मिती केली. गावातल्या मालाला चांगली बाजारपेठ मिळावी म्हणून स्वतः कोळसा व पाणी यांवर चालणारा ट्रक घेतला. चालक मिळणे अशक्य असल्याने शेंबेकर यांनी स्वतः ते काम केले. आणि बाजारपेठ मिळवली.

              दुसर्‍या महायुद्धानंतर सर्वत्र साखरेची टंचाई झाली होती. त्यावर मात करण्यासाठी छिंदवाड्याहून उसाचे बेणे आणून शेतात ऊस पिकवला आणि गूळ तयार करण्यासाठी गुर्‍हाळ सुरू केले. उसाप्रमाणे द्राक्ष, केळी, जूट अशा अनेक पिकांची पेरणी, दुधाळ जनावरे सांभाळणे, त्यांचे संगोपन, दूध डेअरी असे अनेक यशस्वी प्रयोगही वेळोवेळी त्यांनी केले. गावातील सर्वांना परिसरातील बातम्या, घडामोडी माहीत व्हाव्यात म्हणून ते वृत्त चक्रमुद्रितावर छपाई करून परिसरात वितरण करत असत. तसेच पुढे त्या काळात एक भलामोठा आकाशवाणी संच आणून त्यावर बातम्या आणि कृषीविषयक माहिती, मुलाखती गावकर्‍यांना ऐकवण्याचे कामही त्यांनी केले. यातून अनेक नवीन योजना, प्रकल्प यांची माहिती सर्वांना झाली पाहिजे, अशी शेंबेकरांची कल्पना होती. गोविंद शेंबेकर अनेकदा कृषी विद्यापीठात जाऊन आपल्या कृषीविषयक शंकांचे निरसन करून घेत. विद्यापीठातले शेतकरी मेळावे, शिवारफेरी, प्रदर्शने यांना ते आवर्जून जात. यांचे आयोजन ते स्वतःच्या गावातही करत. शेतीवर नुसते प्रेम केल्याने शेती कशी चांगली पिकते ते त्यांनी कृतीने दाखवून दिले.

              शेंबेकरांनी गावकर्‍यांच्या सहकार्याने १९५३मध्ये कृषी विद्यालयाची स्थापना केली. हे वर्‍हाडातले पहिले कृषी विद्यालय ठरले. शाळेतील काही भाग त्यांनी शेतीसाठी राखून ठेवला. या भागात त्यांनी विद्यार्थ्यांना भाज्या पिकवण्याचे प्रत्यक्ष ज्ञान दिले, तसेच मंडईत नेऊन भाज्या विकण्याचे कसबही विद्यार्थ्यांना आत्मसात करायला शिकवले. शेंबेकर उत्तम व्यवस्थापक, शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणूनही समाजाला कळले.

              या आणि अशा उपक्रमांची दखल घेत गावास महाराष्ट्र शासनाने आदर्श गाव हा पुरस्कार देऊन गावकर्‍यांसह शेंबेकरांचा सत्कार केला. ऊस लागवड आणि गूळ उत्पादन याबाबतही त्यांचा विशेष गौरव झाला. शेती विषयात झालेली त्यांची भरीव कामगिरी पाहता त्यांना महाराष्ट्र शासनाचा कृषिभूषण पुरस्कार, मलकापूरच्या कृषी मेळाव्यात अधिक धान्य पिकवाअंतर्गत चांदीचे तबक अशी व यांसारखी मानचिन्हे व मानपत्रे शेंबेकरांना मिळाली. ते पंजाबराव देशमुखांच्या भारत कृषक समाजाचे आजीवन सदस्य होते. अमेरिकन पीस कोअर योजनेअंतर्गत दोन अमेरिकन स्वयंसेवक शेंब्याला दीड वर्ष त्यांच्याकडे राहायला होते. त्यांच्यावर केलेले पुत्रवत प्रेम व संस्कार यामुळे तीस वर्षांनी ते पुन्हा शेंब्यास आले आणि गावातील पुरातन गणपती मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मोठी रक्कम देऊन गेले. शेंबेकरांनी सत्कर्म सार्वजनिक वाचनालय सुरू केले. या परिसरातले हे पहिलेवहिले वाचनालय होय. गावकर्‍यांनी पुढे या वाचनालयाचे नामकरण शेंबेकरांच्या नावाने केले आहे. १ मे १९६० रोजीच्या संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्माण दिनाच्या मुंबईच्या सोहळ्यास जिल्ह्यातील प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी म्हणून शेबेंकरांना यशवंतराव चव्हाणांनी स्वतः विशेष निमंत्रणाने बोलावून घेतले होते.

- प्रशांत वि. वाणी

 

शेंबेकर, गोविंद रघुनाथ