Skip to main content
x

शेंडे, सीताराम गंगाधर

       सीताराम गंगाधर ऊर्फ बापूसाहेब शेंडे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर या खेडेगावात झाला.  सातारा येथे प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्यांनी कोल्हापूरहून पदवी शिक्षण पूर्ण केले. ते एम.ए.च्या शिक्षणासाठी पुण्याला गेले. त्यासाठी त्यांनी शेतमजुरांच्या समस्या या विषयाबाबत सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. धनंजयराव गाडगीळ यांचे मार्गदर्शन घेतले. त्यांच्याच प्रयत्नातून शेंडे यांना शिष्यवृत्तीही मिळाली. पुण्याच्या विधी महाविद्यालयातून त्यांनी एलएल.बी.चाही अभ्यास केला. ग्रामीण भागातील बालपण आणि शेतमजुरांवरील अभ्यास यामुळे ग्रामीण सुधारणांकडे शेंडे यांचे लक्ष वेधले गेले. त्यांनी १९३७पासून स्वातंत्र्य चळवळीत तळमळीने भाग घेतला. त्यांनी भूमिगत होऊन कार्य केले व कारावासही भोगला. राष्ट्रीय काँग्रेसचे ते कार्यकारिणी सदस्यही होते. ते १९४२च्या चले जाव ठरावाच्या सभेत उपस्थित होते. ते अखिल भारतीय ग्रामोद्योग संघाचे मुंबई इलाख्याचे सचिव होते. अखिल भारतीय विणकर संघाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी लोकर प्रकल्पाचा काश्मीरमध्ये राहून अभ्यास केला. खादी उद्योगाबरोबरच हातकागद संस्थेच्या स्थापनेत शेंडे यांची भूमिका महत्त्वाची होती. नंतर ते अखाद्य तेल व साबण उद्योग संघाचे सचिव झाले. नंतर त्यांनी महाराष्ट्र सेवा संघाचे सचिवपद सांभाळून सत्य निकेतन या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. त्यांचे मुख्य कार्यक्षेत्र अहमदनगर जिल्ह्यातील राजूर या वनवासी विभागात होते. त्यांनी  त्याच ठिकाणी विविध शिक्षण संस्था संकुल उभे केले.

       महाराष्ट्रात मधमाशापालन व्यवसायाच्या उभारणीसाठी शेंडे यांनी वनवासी व ग्रामीण शेतकऱ्यांमध्ये जाऊन मूलभूत स्वरूपाचे काम केले. शेंडे यांनी १९४६मध्ये सातारा जिल्ह्यातील महाबळेश्‍वर येथे मधमाशापालन केंद्राची स्थापना केली. त्यांनी लाकडी पेट्यांसाठी वाई येथील सुतारकाम करणाऱ्या कारखान्यातून लाकडी फळ्या व इतर साहित्याची जमवाजमव केली. स्थानिक पाच तरुणांना कर्नाटकातील होनावर येथे मधमाशापालन व्यवसायाच्या प्रशिक्षणासाठी पाठवले. मधमाशांची मोहोळे पकडून लाकडी पेटीत बंदिस्त करणे म्हणजे दैवी संकट ओढवून घेणे ही अंधश्रद्धा त्या भागात रूढ होती. ती शेंडे यांनी प्रयत्नपूर्वक दूर करून या व्यवसायास चालना दिली. त्याच वेळी वनविभागाने एक वनसंरक्षण समिती स्थापन करून शेंडे यांना सदस्य करून घेतले. पुढे मे १९४९च्या सुमारास ३०० ग्रामवासीयांनी मधमाशापालन व्यवसाय स्वीकारला. त्यातूनच १९५० किलोग्राम मधाचे उत्पादन मिळाले. प्रत्येक मोहळामागे ६.५ किलो हे प्रमाण महत्त्वपूर्ण ठरले.

       महाबळेश्वरच्या अतिपावसाच्या डोंगरातून पुण्याच्या सपाटीवरील भागात १०० मोहोळांचे पाऊसकालीन स्थलांतर ही एक मोठी क्रांतिकारक घटना होती. या योजनेचे श्रेय सर्वस्वी शेंडे यांना द्यावे लागेल. या व्यवसायासाठी शास्त्रीय बैठकीची गरज ओळखून, शेंडे यांनी मधमाशा संशोधन संस्थेची स्थापना करण्यात यश मिळवले. सुप्रसिद्ध कृषिशास्त्रज्ञ डॉ.गो.बा.देवडीकर, चिं.वि.ठकार यांच्या मदतीने १९५२मध्ये आधुनिक मधमाशापालनाची सुरुवात झाली. वैकुंठलाल मेहता यांच्या अध्यक्षतेखाली खादी ग्रामोद्योग आयोगांतर्गत मधमाशापालन संशोधन व विस्तार विभागाचे अखिल भारतीय निदेशक म्हणून शेंडे यांनी पदभार सांभाळला व या व्यवसायाचा देशव्यापी विस्तार केला.

       शेंडे यांनी १९६३मध्ये प्राग येथील आंतरराष्ट्रीय मधमाशापालन अधिवेशनासाठी प्रतिनिधित्व केले व युरोपमधील अनेक देशांतील या व्यवसायाचा अभ्यासही केला. त्यांनी अखिल भारतीय मधमाशापालक संघाचे सचिवपद व अध्यक्षपद भूषवले व ‘इंडियन बी जर्नल’ त्रैमासिकाचे प्रकाशन नियमितपणे सुरू केले. पुढे हिंदी व कानडी भाषेतून या मासिकाच्या आवृत्त्या निघाल्या.  शेंडे यांनी मधसंकलन व विक्री व्यवस्थाही निर्माण केली.  आयुष्याच्या शेवटापर्यंत हे कार्य चालू ठेवले. 

       - डॉ. कमलाकर क्षीरसागर

 

शेंडे, सीताराम गंगाधर