शिंदे, गणपत जयाजीराव
वाई येथील चंद्रभागा या सुस्वरूप नर्तकी, व तिच्या ख्याल-टप्पा गायकीवर अनुरक्त होऊन ग्वाल्हेर संस्थानाचे महाराज जयाजीराव शिंदे यांनी तिला १८४०-४५ च्या सुमारास आपल्याकडे आश्रय दिला. जयाजीरावांपासून झालेली या चंद्रभागेची दोन मुले म्हणजे बलवंत व गणपत ही होत. ग्वाल्हेर येथे जन्म झालेले भैया गणपतराव हे गायक, बीनकार भैया बलवंतराव यांचे धाकटे बंधू होते. भैया गणपतराव यांना आईकडून, तसेच ग्वाल्हेर दरबारातील बंदे अली खाँ, बहादूर हुसेन, इम्रत हुसेन खाँसारख्या अन्य कलावंतांकडून संगीताचे धडे मिळाले. लखनौ येथे सादिक अली खाँ या उच्च दर्जाच्या ठुमरी गायकाकडून त्यांना ठुमरीचीही तालीम मिळाली. ‘सुघरपिया’ या उपनामाने गणपतभैया यांनी ठुमरीच्या अनेक उत्तम रचना केल्या, ज्या आजही प्रचलित आहेत.
गणपतभैया यांच्या व्यसनी स्वभावामुळे व काही नीतिबाह्य वर्तनामुळे त्यांना ग्वाल्हेरमधून हद्दपार करण्यात आले. त्यांचे वास्तव्य काही महिने कलकत्त्यास लाला दुलीचंद या रसिक रइसाकडे, गोहरजानसारख्या मर्मज्ञ गायिकेकडे असे, तर काही महिने ते रामपूरच्या नवाबाकडे असत. कधी चार महिने वाराणसीला राहत. व्यसनी असले तरी त्यांच्या कलाप्रावीण्याबद्दल दुमत नव्हते. त्यामुळे त्यांची कीर्ती उत्तर भारत, बंगाल प्रांतात विशेष होती.
त्या काळात भारतात हार्मोनिअम या वाद्याचा नुकताच प्रवेश झाला होता. पॅरिसहून उत्तम बनावटीच्या हार्मोनिअमची आयात होत असे. तत्कालीन अभिजनांप्रमाणेच गणपतभैयाही या वाद्याकडे आकृष्ट झाले व कुणाकडेही न शिकता ते स्वत:च हार्मोनिअम वाजवू लागले. रागसंगीताचा आविष्कार करणारे भारतातील पहिल्या हार्मोनिअमवादकाची मान्यता त्यांना मिळाली. रागातील एखाद्या निराळ्या स्वरास षड्ज कल्पून विस्तार करण्याची षड्जसंक्रमण वा मूर्च्छना ही क्रिया हार्मोनिअम वाजवताना भैया फार मोहकपणे करत व याचा प्रभाव तेव्हाच्या ठुमरीगायनावर पडला. नंतर महाराष्ट्रातील नाट्यसंगीतातही ठुमरीगायनाच्या प्रभावामुळे ही तर्हा आली.
ते उत्तम हार्मोनिअमवादक होते व ठुमरी ही त्यांची खासियत होती. यमन, बिहाग, केदार अशा आम रागांत आलाप व जोडकाम करून मग दहा-पंधरा मिनिटे ते मध्यलयीची चीज वाजवत. पण ठुमरी, त्यातही ‘बोलबनाव की ठुमरी’ हीच त्यांची खासियत होती. अनेकदा ते स्वत: थोडे गात व हार्मोनिअमवर ठुमरी वाजवत. ठुमरी-दादरे पेश करताना त्यांत मोठ्या सफाईने व नखर्याने खटका, मुरकीचा वापर करून ते वादनात रंग भरत. त्यांचा ठुमरी वाजवण्याचा ढंग फार रसिला होता. त्यांच्या हार्मोनिअम व ठुमरीच्या या ढंगाचा प्रभाव त्यांचे शिष्य मौजुद्दिन खाँ, कलकत्त्याची गोहरजान व जद्दनबाई, आगर्याची मलकाजान, पाटण्याची जोहरजान, गयेचे सोहनी महाराज इ. तत्कालीन ठुमरी गायकांवरही पडला. ग्वाल्हेरचे जंगी खाँ, कलकत्त्याचे श्यामनाथ खत्री, गिरिजाशंकर चक्रवर्ती, मीर इर्शाद अली, गयेचे गफूर खाँ, लखनौचे सज्जाद हुसेन व सैयद अली कदर ‘बब्बन’, इंदूरचे बशीर खाँ हे त्यांचे हार्मोनिअमवादनातले शिष्य होते. याशिवाय अकबरपूर रियासतीचे नवाब ठाकूर अली व रामपूरनजीकच्या बिलसी येथील रईस सआदत अली खाँ छम्मन साहब यांनीही भैयांकडून हार्मोनिअमचे शिक्षण घेतले. या सार्या शिष्यांनी ठुमरी व हार्मोनिअमवादनात आपला ठसा उमटवून भैया गणपतरावांच्या लौकिकात भर घातली.
महाराष्ट्रातील भाचूभाई भांडारे, गोविंदराव टेंबे इ. हार्मोनिअमवादकांनीही त्यांच्या प्रभावाचा उल्लेख केला आहे. मुंबईमध्ये १९०६ च्या सुमारास लाला दुलीचंद यांच्यासह गणपतराव आले असता त्यांचा जो सहवास झाला, त्याबद्दल गोविंदराव टेंबे यांनी ‘माझा संगीतव्यासंग’ या ग्रंथात सविस्तर लिहिले आहे.
माधवराव शिंदे ग्वाल्हेरच्या गादीवर असताना, दतिया संस्थानात धौलपूर येथे अडुसष्टाव्या वर्षी गणपतराव यांचे निधन झाले.
— चैतन्य कुंटे