Skip to main content
x

सुर्वे, नारायण गंगाराम

     कवी नारायण सुर्वे यांचा जन्म मुंबई येथे झाला. आपल्या जन्माविषयी नारायण सुर्वे लिहितात, ‘मी अनाथ मुलगा म्हणून जन्माला आलो, ही अतिशय दुःखद गोष्ट आहे. भूषणास्पद नाही. ही जन्मदात्री आई जेव्हा माझी नाळ कापून, माझ्यापासून अलग झाली असेल, तेव्हा तिच्या डोईवर आकाश फाटले असेल...; परंतु पुढल्या भवितव्याने काही वेगळेच ठरवलेले दिसते.... माझी नाळ कापली जाऊन मी अलग झालो खरा; परंतु कुणीतरी चटकन मला आपल्या स्तनाशी घेतलेही. ही माझी दुसरी माय. जन्मदात्रीपेक्षाही थोर. मी जन्मलो तेव्हा काही नाम धारण करून जन्मलो नाही. मात्र मी नसेन तेव्हा ह्या पृथ्वीच्या पाठीवर एक नाम ठेवून जाईन - ते म्हणजे नारायण गंगाराम सुर्वे...’(मनोगत, ‘सनद’)

     मुंबईच्या इंडिया वुलन मिलमधील स्पिनिंग खात्यात साचेवाले म्हणून काम करणारे श्री. गंगाराम कुशाजी सुर्वे आणि कमला मिलमध्ये बाइंडिंग खात्यात काम करणार्‍या श्रीमती काशीबाई गंगाराम सुर्वे या जोडप्याने या अनाथ मुलाला स्वीकारले, सांभाळले, वाढवले आणि आपले नाव दिले. आपले आईवडील कामगार होते, त्यांच्यामुळेच मुंबईच्या कामगारवर्गाशी आपण जोडले गेलो, याविषयी नारायण सुर्वे यांना विलक्षण अभिमान आहे. हा अभिमान त्यांनी आपल्या लेखनातून, भाषणांतून अनेकदा व्यक्तही केला आहे. ही अभिमानाची भावना सुर्वे यांच्या कवितेमधूनही वारंवार डोकावताना दिसते.

      मुंबईच्या गिरणगावात, गिरणी कामगारांच्या जगात नारायण सुर्वे यांचे बालपण गेले. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रांतांमधून मुंबईत आलेल्या, पोटासाठी श्रम विकणार्‍या आणि त्यासाठी पूर्णपणे गिरण्या-कारखान्यांवर अवलंबून असलेल्या कामगारांशी सुर्वे यांचा अगदी जवळून संबंध आला. हा कामगारवर्ग व्यवसायाने मूळचा शेतकरी असलेला, पण पोटासाठी शहरात आलेला आणि शहरावर पूर्णपणे अवलंबून असलेला असा होता. परंतु, मनातून मात्र हा वर्ग आपल्या खेड्याशी आणि खेड्यातील जीवनपद्धतीशी नाते ठेवून होता. या वर्गाच्या या द्विधा अवस्थेचे आणि सुखदुःखांचे अगदी जवळून निरीक्षण सुर्वे यांनी केले.

      सुर्वे स्वतः या जगाचा एक भाग असल्यामुळे या जगाचे प्रश्न त्यांनी फार जवळून समजून घेतले. कामगारवर्गावर होणारा अन्याय, या वर्गाची होणारी आर्थिक आणि राजकीय पिळवणूक, या वर्गाच्या वाट्याला आलेली ‘सर्वहारा’ अवस्था सुर्वे यांनी प्रत्यक्ष अनुभवली. या सर्व अनूभवांतूनच कवी नारायण सुर्वे यांची जीवनदृष्टी घडत गेली, असे म्हणता येईल.

     कामगार चळवळीमुळे सुर्वे यांचा परिचय मार्क्सवादी तत्त्वज्ञानाशी झाला. या तत्त्वज्ञानामुळे सुर्वे यांच्या विचारांना आणि त्यांच्या निष्ठेला विशिष्ट दिशा मिळाली. यातूनच परिस्थितीला सामोरे जाण्याचे धैर्य असलेला आणि परिवर्तनासाठी लढणारा नारायण सुर्वे हा कार्यकर्ता निर्माण झाला, असे म्हणता येईल. कार्यकर्ता म्हणून सुर्वे यांनी कामगार चळवळीमध्ये प्रत्यक्ष भाग घेतला. लालबागच्या चाळीत आपल्या शेजारीपाजारी राहणार्‍या कामगारांना सभांची माहिती देणे, पुस्तके वाचून दाखवणे आणि कम्युनिस्ट विचारांचा परिचय करून देणे; ही कामे नारायण सुर्वे करीत. म्हणून त्यांना सर्व जण ‘मास्तर’ म्हणत. याशिवाय थाळीप्रचार करणे, खडूप्रचार करणे, पोस्टरे चिकटवणे, संपाच्या वेळी पिकेटिंग करणे, युनियनची वर्गणी गोळा करणे, निवडणुकांमध्ये कामे करणे, मिरवणुकीत सहभागी होणे, इत्यादी अनेक कामे सुर्वे यांनी केली. शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमरशेख आणि शाहीर गवाणकर यांनी कम्युनिस्ट चळवळीच्या प्रचारासाठी निर्माण केलेल्या कलापथकांमध्येही सुर्वे सहभागी झाले.

     १९५८च्या सुमारास नारायण सुर्वे यांनी काव्यलेखनाला प्रारंभ केला. त्या वेळी ते शाळेत शिपाई म्हणून काम करीत होते. मुख्यतः ते कामगारांचीच वस्ती असलेल्या बोगद्याच्या चाळीतील अंधार्‍या खोलीत राहत होते. आपले अल्पशिक्षण, साहित्यक्षेत्राशी दुरान्वयानेही नसलेला संबंध, आपली अभावग्रस्त परिस्थिती आणि सामाजिक स्थान यांचा विलक्षण दबाव सुर्वे यांच्या मनावर होता. असे असूनही या दबावाखाली त्यांची कविता गुदमरली नाही किंवा दडपली गेली नाही.

     सुर्वे कविता लिहू लागले आणि बाबूराव बागुलांच्या प्रयत्नांमुळे ‘नवयुग’मध्ये त्यांची कविता छापूनही आली. त्यानंतर सुरुवातीच्या काळात नवयुग, युगांतर, मराठा, इत्यादी नियतकालिकांमधून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या. १९६२ साली ‘ऐसा गा मी ब्रह्म’ हा सुर्वे यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. समकालीन कवितेपेक्षा सुर्वे यांच्या कवितेचे असलेले वेगळेपण या संग्रहामुळे स्पष्टपणे जाणवू लागले. १९६३ साली ‘ऐसा गा मी ब्रह्म’ला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्कारामुळे सुर्वे प्रसिद्धीच्या झोतात आले आणि वाचक-रसिकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले.

     १९६६ मध्ये ‘माझे विद्यापीठ’ हा सुर्वे यांचा दुसरा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. ‘ऐसा गा मी ब्रह्म’मध्ये दिसून येणारी कवीच्या सामर्थ्याची बीजे या दुसर्‍या संग्रहात अधिक विकसित रूपात प्रकट झाली. १९७५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘जाहीरनामा’ या तिसर्‍या संग्रहाने नारायण सुर्वे यांच्या कवितेचे स्वरूप अधोरेखित केले. यानंतर ‘सनद’ हा निवडक कवितांचा संग्रह (१९८२), ‘नव्या माणसाचे आगमन’ (१९९५) आणि ‘नारायण सुर्वे यांच्या गवसलेल्या कविता’ हा अप्रकाशित कवितांचा संग्रह (१९९५) असे तीन संग्रह प्रसिद्ध झाले आहेत.

     नारायण सुर्वे यांच्या कवितेतून मराठी कवितेत तोवर कधीच व्यक्त न झालेले असे कष्टकर्‍यांचे जग आपल्या सर्व पैलूंसकट व्यक्त होते; हे सुर्वे यांच्या कवितेचे प्रथमदर्शनी जाणवणारे वैशिष्ट्य होय. या कष्टकर्‍यांच्या जगाला दाहक अशा राजकीय, सामाजिक आणि आर्थिक वास्तवाची आणि जीवनसंघर्षाची पार्श्वभूमी लाभली आहे. समकालीन सामाजिक परिस्थितीवर, त्यातील अन्याय्य गोष्टींवर, प्रश्नांवर, माणसाच्या माणूसपणाचा अपमान करणार्‍या व्यवस्थेवर प्रत्यक्षाप्रत्यक्ष भाष्य करणे हा सुर्वे यांच्या कवितेचा स्थायिभाव आहे. हे भाष्य करीत असताना सुर्वे यांच्या कवितेतून मार्क्सवादी विचारांची दिशा स्पष्टपणे व्यक्त होते. परंतु माणसाशी असलेल्या  आत्मीय संबंधांमुळे आणि त्या संबंधांतून कवितेत प्रकट होणार्‍या मार्क्सवादी जाणिवेमुळे सुर्वे यांची कविता मार्क्सवादी विचारांचे सूचन करीत असली, तरी प्रचारकी स्वरूप धारण करीत नाही.

     जीवनावर आणि माणसांवर सुर्वे यांची दृढ श्रद्धा आहे. माणूस हा त्यांच्या आस्थेचा, प्रेमाचा आणि शोधाचा विषय आहे. सुर्वे यांच्या मते माणूस हाच साहित्याचा केंद्रबिंदू आहे. माणूस किंवा व्यक्ती ही एकटी नसते. ती समाजाचा घटक असते. म्हणूनच साहित्य आणि समाज यांचा अतूट संबंध असतो, असे सुर्वे मानतात. म्हणूनच समाज, आणि त्या समाजाच्या पार्श्वभूमीवर माणूस हा सुर्वे यांच्या कवितेचा गाभा आहे. माणसाचा, त्याच्या स्वभावधर्माचा, माणसाच्या सर्जनशीलतेचा आणि सामर्थ्याचा कुतूहलाने घेतलेला शोध सुर्वे यांच्या कवितेत सातत्याने जाणवत राहतो. माणसावरील आणि जीवनावरील या श्रद्धेमुळे आणि प्रेमामुळेच सुर्वे यांच्या कवितेतील आशावादी सूर कधीही लोप पावलेला दिसत नाही.

     सुर्वे यांच्या कवितेला विलक्षण लोकप्रियता लाभली आहे. आजवर त्यांच्या काव्यवाचनाला उदंड प्रतिसाद लाभला आहे. सुर्व्यांच्या कवितेतील प्रासादिकता हे याचे एक कारण म्हणता येईल. अगदी परिचित वाटणारी, रोजच्या वापरातल्या बोलीभाषेसारखी भासणारी, प्रमाण मराठी आणि बोली यांची स्वाभाविक सरमिसळ असणारी भाषा, ओळखीची वाटणारी प्रतिमासृष्टी आणि सहज वाचता येतील, समजून घेता येतील अशा गद्यसदृश लयी यांमुळे सुर्वे यांची कविता समाजाच्या सर्व थरांतील लोकांच्या तोंडी वसलेली दिसते.

     एका बाजूला गद्यसदृश लयीची कविता निर्माण करणार्‍या सुर्व्यांनी सुरुवातीला गाणीही लिहिली आहेत. शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमरशेख, शाहीर गवाणकर यांच्याबरोबर कलापथकांमध्ये वावरताना सुर्वे यांच्यावर जे संस्कार झाले, त्यांतून प्रेरणा घेऊन त्यांनी १९५६मध्ये ‘डोंगरी शेत’ हे आपले पहिले गीत लिहिले. स्त्रीच्या कष्टांचा आणि वेदनेचा अनुभव स्त्रीसुलभ भाषेतून देणार्‍या या गीताला समाजाच्या सर्व थरांतील लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शाहीर अमरशेखांनी हे गीत खेड्यापाड्यांत, अगदी घरोघरी पोहोचवले. त्या काळी लोकप्रियतेमुळे हे गीत केवळ सभासंमेलनांत किंवा चळवळींच्या विविध उपक्रमांत नव्हे, तर धंदेवाईक तमाशांच्या खेळांमध्येही गायले जात होते. या गीताची रेकॉर्ड हातोहात खपली. या गीतानंतर सुर्वे यांनी ‘गिरणीची लावणी’, ‘महाराष्ट्राच्या नावानं’ हा गोंधळ, ‘गाडी आणा बुरख्याची’ हे गीत, अशी सुमारे पंधरा ते वीस गीते लिहिली. त्यांपैकी आठ गीते ‘ऐसा गा मी ब्रह्म’ या संग्रहात आढळतात.

     पुढे मात्र सुर्वे यांनी गीते लिहिली नाहीत. आपला पिंड किंवा वृत्ती गीतकाराची नाही हे त्यांनी ओळखले आणि कवितेवरच लक्ष केंद्रित केले, असे दिसते. ‘कविता श्रमाची’ आणि ‘गाणी चळवळीची’ हे दोन गीतसंग्रह सुर्वे यांनी संपादित केले आहेत.

     नारायण सुर्वे यांनी फारसे गद्यलेखन केलेले नाही. कारणपरत्वे त्यांनी लिहिलेले लेख, व्यक्तिचित्रे, दिलेल्या मुलाखती व भाषणे यांपैकी काही लेखन एकत्रित स्वरूपात ‘माणूस, कलावंत आणि समाज’ या संग्रहात प्रसिद्ध झाले आहे. या लेखनामधून सुर्वे यांची जीवनदृष्टी आणि साहित्यविषयक भूमिका स्पष्टपणे व्यक्त झाली आहे. समकालीन साहित्याविषयीचे आणि समीक्षेविषयीचे त्यांचे विचारही या संग्रहातील लेखनामधून प्रकट झाले आहेत.

     आपल्या ८३ वर्षांच्या आयुष्यात नारायण सुर्वे यांना अनेक मोठे पुरस्कार, मानसन्मान, शिष्यवृत्ती आणि गौरववृत्ती मिळाल्या. १९९५ मध्ये परभणी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान सुर्वे यांनी भूषविले होते. अनेक आंतरराष्ट्रीय संमेलनांमध्ये, परिषदांमध्ये सुर्वे सहभागी झाले आहेत. त्यांच्या कवितांचे अन्य अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. आणि सुर्वे यांना अन्य भाषक रसिकांचीही भरघोस दाद मिळाली आहे. भारतातच नव्हे, तर जगभरात त्यांच्या कवितेचे चाहते आहेत. १९६०नंतरच्या मराठी कवितेचा विचार करताना नारायण सुर्वे यांची कविता हा एक महत्त्वाचा टप्पा ठरतो, यात शंका नाही.

- डॉ. अरुणा दुभाषी

सुर्वे, नारायण गंगाराम