Skip to main content
x

ताटके, मनोहर बाळकृष्ण

           नोहर बाळकृष्ण ताटके यांचे बालपण सोलापूर येथे गेले. ते हरिभाई देवकरण विद्यालयातून मॅट्रिक उत्तीर्ण झाले. शाळेत ते प्रामुख्याने हॉकी खेळत असत. त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा होता. सोलापूर येथे इंटरपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांनी परळ, मुंबई येथील पशू वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यांचे आजोबा खंडकर (आईचे वडील) यांनीही परळ, मुंबई येथून पशूवैद्यकीय महाविद्यालयातून पदवी घेतली. आजोबांच्याच प्रेरणेने ताटके यांनी पशूवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला.

           एम.व्ही.एस.सी.ची पदवी घेतल्यानंतर जुन्नर, नारायणगाव या गावांतून ताटके यांच्या शासकीय सेवेची सुरुवात झाली. त्यानंतर ते उरळी-कांचन येथे गेले असता, मणीभाई देसाई यांच्याशी ओळख झाली. तेच त्यांचे या क्षेत्रातले गुरू होय. त्यानंतर त्यांची ओळख कृषिमहर्षी अण्णासाहेब शिंदे यांच्याबरोबर झाली. या सर्वांच्या प्रेरणेने त्यांचे या क्षेत्रातील लिखाण खूप वाढले.

           त्यांचे लेख बी.ए.आय.एफ. या संस्थेतून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी विविध गायींविषयी बरीच सांख्यिकी माहिती तयार केलेली होती. त्या गायींचे आई-वडील, ती गाय किती दूध देते, त्या गायीने किती वासरांना जन्म दिला, तिचे रोजचे खाणे यांचे टिपण त्यांच्याकडे होते.  हे सगळे लिखाण ते पहाटे २.३० ला उठून करत असत. त्यांचा वाचण्याचा छंद अफाट होता. वाचन, कात्रणे काढणे, टिपण काढणे हा त्यांचा उद्योग मृत्यूपर्यंत चालू होता. निवृत्तीनंतर ते ‘श्‍वेतक्रांती’ या गायींविषयक मासिकाचे कार्यकारी संपादक झाले. त्याचबरोबर निरनिराळ्या संस्थांना पशुविषयक सल्ला ते वेळोवेळी देत असत.

           शासकीय सेवेत असताना त्यांनी आकाशवाणी केंद्रातून दिल्या जाणाऱ्या ‘माझे घर माझे शेत’ या कार्यक्रमातून  पशु-पक्षी यांना होणारे रोग, त्यावरील औषधे यांविषयी मार्गदर्शन केले आहे.

           त्यांच्या प्रत्येक कृतीतून त्यांची शिक्षणाविषयीची धडपड, तळमळ दिसून येत होती. सरकारी पैसा हा सरकारच्या कामासाठीच वापरायचा, ही त्यांची आग्रहाची मागणी होती. त्यांनी अतिशय कष्टातून आणि काटकसरीतून स्वतःचे विश्‍व उभे केले होते. वैयक्तिक संकटे कितीही आली तरी ते डगमगले नाहीत. 

- संपादित 

ताटके, मनोहर बाळकृष्ण