Skip to main content
x

टेकाडे, आनंदराव कृष्णाजी

    नंदराव टेकाडे ह्यांच्या घराण्याचे मूळ गाव नागपूर जिल्ह्यातील मोहपा; पण कवीचा जन्म धापेवाडा (जिल्हा नागपूर) येथे कृष्णाजी व काशीबाई ह्या दाम्पत्याच्या पोटी, आईच्या मातुलगृही झाला. वयाच्या सहाव्या वर्षी वडील निवर्तल्यानंतर मामांनी त्यांचे संगोपन केले. सहाव्या वर्षानंतर आजारपणामुळे शिक्षण सोडले आणि पुढे ते अपूर्णच राहिले. त्यामुळे आनंदरावांनी स्वतःच आत्मनिवेदनात ‘भाषा-निरक्षर’ म्हटले आहे.

कथा-कीर्तने, पुराणे, आख्याने इत्यादींच्या संस्कारांतून त्यांना भारतीय इतिहासाची व परंपरेची ओळख झाली व त्या संदर्भाचा अत्यंत प्रभावी उपयोग त्यांनी आपल्या काळातील प्रतिमा-प्रतीकांच्या योजनेसाठी केला. १९१० सालच्या सुमारास, वयाच्या विशीतच त्यांनी राष्ट्रीय जाणिवांच्या प्रभावी काव्यलेखनास सुरुवात केली. गोपाळ कृष्ण गोखले यांच्या मृत्यूनंतर त्यांनी त्या संदर्भात आपली पहिली कविता लिहिली. ‘शारदा देवी’ या शीर्षकाची कविता सर्वप्रथम वासुदेवराव आपटे यांच्या ‘आनंद’ मासिकात १९११ साली प्रसिद्ध झाली. त्यांच्या प्रारंभीच्या कविता ‘खेळगडी’, ‘लोकमित्र’, ‘चित्रमय जगत’ व हरिभाऊ आपट्यांचे ‘करमणूक’ हे नियतकालिक यांत प्रसिद्ध झाल्या. १९१३ सालच्या ‘करमणूक’च्या अंकात त्यांची ‘चंद्रसेना’ ही कविता हरिभाऊंनी प्रसिद्ध केली व सोबतच पत्र पाठवून कवीचे कौतुकही केले. आनंदरावांच्या काव्यलेखनामागे लोकमान्य टिळकांच्या जहाल राष्ट्रवादी विचारांची प्रेरणा प्रामुख्याने होती. १९१४ सालच्या सुमारास जाहीर कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय कविता गाऊन सादर करण्याच्या प्रयोगाला सुरुवात झाली. तेव्हापासून स्वातंत्र्याच्या चळवळीनिमित्त महाराष्ट्रात आणि विशेषतः नागपुरात आनंदरावांचे देशभक्तिगीतगायन हा एक अविभाज्य भागच बनला होता.

स्वातंत्र्याकांक्षेने भारलेल्या राष्ट्रीय काव्याच्या ऐन भराच्या त्या कालखंडाचा एक महत्त्वपूर्ण काव्यारव टेकाड्यांचा होता. माडखोलकरांनी म्हटल्याप्रमाणे, “ही कविता तत्कालीन चळवळीचा एकपरीने काव्यमय प्रतिध्वनी असून तिच्यात पूर्ववैभवाची स्मृती, प्रचलित राजकीय कल्पना आणि चळवळीच्या प्रवर्तकाविषयीचा आदर यांच्या छटांची सरमिसळ झालेली आहे.”

राष्ट्रभक्तीप्रमाणेच राधाकृष्णभक्ती हासुद्धा त्यांच्या कवितेचा एक प्रधान विषय आहे. दोन्ही भक्तींचा उत्कट प्रत्यय टेकाड्यांच्या काव्यातून येतो. त्यांची सर्वाधिक गाजलेली कविता, ‘आनंदकंद ऐसा, हा हिंद देश माझा, सत्यास ठाव देई, वृत्तीस ठेवी न्यायी, स्वत्वास माळी राजा, हा हिंद देश माझा। जगी त्याविना कुणीही, स्मरणीय अन्य नाही, थोरांत थोर समजा, हा हिंद देश माझा’ (आनंदगीत भाग-२); २६ ऑगस्ट, १९२१ रोजी त्यांनी लिहिली. परंतु, राष्ट्रीय जाणिवांप्रमाणे प्रणयविषयक व निसर्गविषयक जाणिवांचीही प्रभावी अभिव्यक्ती आनंदरावांनी विपुल प्रमाणात केली.

काव्यविषयाचा एकसुरीपणाचा गैरसमज टेकाड्यांविषयी पसरलेला दिसतो; परंतु तो खोटा ठरवणारी विविधता आणि विपुलता आनंदरावांच्या काव्यात प्रत्ययाला येते. ‘गा गा प्रेमाचे गाणे। प्रेमावाचुनि सर्व सुने’ असे म्हणणार्‍या टेकाड्यांनी प्रतिमा, प्रतीके आणि राधा-कृष्ण रूपक ह्यांच्या साहाय्याने कुणाही आधुनिक कवीइतकीच उत्कट प्रेमकविता लिहिल्याचे दिसून येते.

स्वातंत्र्यपूर्ण साहित्यप्रेरणा व जीवनप्रेरणा आणि भारतीय परंपरा-प्रभाव ह्यांमुळे प्रणयाभिव्यक्तीची प्राचीन मराठीपासून चालत आलेली रूपकप्रधान रीत त्यांनीही अंगीकारलेली दिसते. आशयाप्रमाणेच अभिव्यक्ति-वैशिष्ट्यांमध्येही भरपूर विविधता दिसते. विविध वृत्ते आणि रचना प्रकारांचा त्यांनी उपयोग केला. भावकविता आणि गीतरचना ह्यांच्या सीमारेषेवर झुलणार्‍या आणि गीत-प्रकाराकडे झुकणार्‍या गेय, प्रासादिक अभिव्यक्तीमुळे टेकाड्यांची कविता सर्वसामान्य रसिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली. राष्ट्रीय चळवळीचा एक भाग झाल्याने ती कालसापेक्ष परिघात अधिक अडकली, तरी ह्या कवीचे मराठी काव्यप्रवाहातील, राष्ट्रीय काव्यविश्वातील आणि गीतपरंपरेतील स्थान ऐतिहासिक महत्त्वाचे ठरते.

तत्कालीन कविसंमेलने अन् साहित्यसंमेलने हमखास गाजविणारे ते एक केंद्रवर्ती कवि-व्यक्तिमत्त्व होते. गायनाचे कुठलेही पारंपरिक व शास्त्रीय शिक्षण न घेताही भावनानुकुल काव्यगायनाचे ते एक आदर्श ठरले होते. हिंदी परंपरेसारखा त्यांचा हा विशेष, मराठी काव्यपरंपरेत खास उठून दिसतो.

त्यांच्या कवितेचा सूर सर्वसाधारणपणे सकारात्मक, आशावादी आणि आनंदी राहिला. आनंदवादी भारतीय तत्त्वज्ञान परंपरेचे ते एक पाईक असल्याने, आपला हा स्थायी सूर त्यांनी अखेरपर्यंत जाणीवपूर्वक जपलेला दिसतो. ‘आनंदगीत’ ह्या एका शीर्षकाखाली त्यांच्या काव्याचे चार भाग १९२०, १९२४, १९२८ व १९६४ असे कालानुक्रमे प्रसिद्ध झालेले आहेत. ह्या चारही भागांत त्यांची बहुतांश कविता संग्रहित करण्यात आलेली आहे.

सुरुवातीला त्यांनी नाट्यलेखनाचाही प्रयत्न केलेला दिसतो. ‘संगीत मथुरा’ (१९१२) व ‘संगीत मधुमिलन’ (१९२२) ही नाटके त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कवित्वाचा वेध घेणारा ‘आनंदकंद: आनंदराव टेकाडे’ हा स्मृतिग्रंथ त्यांच्या कन्या सौ.मंदाकिनी घासकडबी, व प्रा.वसंत घासकडबी व वा.रा.सोनार ह्यांनी संपादित केला असून जनशताब्दीच्या निमित्ताने तो १९९१ साली चेत्रश्री प्रकाशन, अंमळनेरतर्फे प्रकाशित करण्यात आला. 

- राजेंद्र नाईकवाडे

टेकाडे, आनंदराव कृष्णाजी