Skip to main content
x

तेलंग, काशिनाथ त्रिंबक

काशिनाथ त्रिंबक तेलंग यांचा जन्म मुंबईला झाला. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. शाळेमध्ये त्यांना उत्तम शिक्षकांकडून इंग्रजी, विद्वान पारंपरिक पंडितांकडून संस्कृत आणि मामा परमानंदांकडून गणित शिकण्याची संधी मिळाली. १८६४मध्ये तेलंग मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. नंतर १८६७मध्ये त्यांनी बी.ए. ही पदवी प्राप्त केली, तर १८६९मध्ये एम.ए. आणि एलएल.बी. या पदव्या एकदम मिळविल्या. १८७२मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेची अ‍ॅडव्होकेटची परीक्षा दिली. ती उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी मूळ शाखेत वकिलीस सुरुवात केली. लहानपणापासूनच तेलंगांनी संस्कृत, मराठी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांत भरपूर वाचन केलेले असल्याने त्यांचे व्यक्तिमत्त्व व्युत्पन्न बनले होते. इंग्रजीवर त्यांचे अनन्यसाधारण प्रभुत्व होते; त्यामुळे त्यांच्या इंग्रज सहकार्‍यांनाही त्यांच्याबद्दल आदर वाटत असे. मॅक्फर्सन, फॅरन आणि इन्वरॅरिटी यांचा दबदबा असतानाही तेलंगांनी पाच वर्षांतच स्वत:चे स्थान निर्माण केले. त्यांच्या संस्कृत व्यासंगामुळे हिंदू कायदा त्यांनी सहजगत्या आत्मसात केला होता. संस्कृत व इंग्रजी या दोन्ही भाषांवरील प्रभुत्वाचा तेलंगांना वकील म्हणून त्याचप्रमाणे नंतर न्यायाधीश म्हणून फार उपयोग झाला.

१९५५ आणि १९५६मध्ये संसदेने संमत केलेल्या ‘हिंदू कोड’ च्या चार कायद्यांमुळे आणि त्यानंतरच्या पंचावन्न वर्षांत सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांनी दिलेल्या निकालांमुळे हिंदू कायदा आता निश्चित आणि स्थिर झाला आहे. परंतु एकोणिसाव्या शतकातली परिस्थिती वेगळी होती. हिंदू कायदा त्यावेळी प्राचीन काळातल्या स्मृतींपासून अगदी सोळाव्या-सतराव्या शतकात लिहिल्या गेलेल्या टीका आणि भाष्यांपर्यंत विविध संहितांमध्ये विखुरलेला होता. त्यात अनेक पंथ आणि उपपंथ होते. त्यामुळे देशाच्या विविध भागात या कायद्याची वेगवेगळी तत्त्वे अमलात होती. त्यामुळे उच्च न्यायालयासमोर जेव्हा एखादा कौटुंबिक किंवा वैयक्तिक स्वरूपाचा तंटा निवाड्यासाठी येई, तेव्हा संस्कृत जाणणार्‍या आणि प्राचीन संहिता व भाष्यांचा अर्थ लावू शकणार्‍या वकिलांची आणि न्यायाधीशांची आवश्यकता भासे. योगायोगाने तेलंग या काळातच वकिली करू लागल्याने मुंबई उच्च न्यायालयाला या क्षेत्रातला जाणकार सहायकच जणू उपलब्ध झाला.

तेलंगांचा दृष्टिकोन अत्यंत समतोल, प्राचीन संहितांतील शब्दांचा किंवा तत्त्वांचा सांप्रत काळातील गरजांना अनुरूप अर्थ लावण्याचा असे. ते न्यायालयाची दिशाभूल कधी करत नसत. त्यामुळे सर्व न्यायाधीश त्यांच्या युक्तिवादाला मान देत. त्यांना ‘हिंदू कायद्याचा चालता-बोलता ज्ञानकोश’ असे म्हटले जाई. एखाद्या खटल्यात तेलंग दोन्ही बाजूंपैकी कोणाचेही वकील नसले, तरी त्यांचे मत विचारण्यासाठी किंवा त्यांचा सल्ला घेण्यासाठी त्यांना न्यायालयात बोलाविले जाई. तेलंगांच्या वकिलीच्या काळात मुंबई उच्च न्यायालयासमोर आलेले दोन अत्यंत महत्त्वाचे खटले म्हणजे लल्लुभाई बापुभाई विरुद्ध मानकुवरबाई आणि दादाजी विरुद्ध रखमाबाई हे होत. यातील पहिल्या खटल्यातील वादाचा मुद्दा हा संहिता आणि स्थानिक रूढी यांच्यात भिन्नता असेल तर प्राधान्य कोणाला द्यावे, हा होता. यात तेलंगांचे मत रूढीच्या बाजूने पडले आणि ते तीन न्यायाधीशांच्या पूर्णपीठाने मान्य केले. रखमाबाई खटल्यातील वादाचा मुद्दा लहानपणी लग्न झालेल्या मुलीला, ती वयात आल्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध नवर्‍याबरोबर राहण्यास भाग पाडता येईल काय, असा होता. हा खटला बराच काळ चालला; त्यात प्रारंभी तेलंगांनी रखमाबाईंची बाजू मांडली होती. 

१८८९मध्ये न्या.नानाभाई हरिदास यांच्या निधनामुळे रिकाम्या झालेल्या जागेवर तेलंग यांची उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यावेळी त्यांचे वय जेमतेम अडतीस-एकोणचाळीस वर्षांचे होते. परंतु ते जेमतेम चार वर्षेच न्यायाधीश राहिले. त्यांच्या न्यायाधीशपदावरील कारकिर्दीत उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठासमोर आलेला सर्वांत महत्त्वाचा खटला म्हणजे आप्पाजी नरहर कुलकर्णी विरुद्ध रामचंद्र रावजी कुलकर्णी हा होय. एखाद्या एकत्र कुटुंबात आजोबा-बाप-मुलगा अशा तीन पिढ्या हयात असतील  तर तिसर्‍याला, म्हणजे नातवाला पहिल्याकडून (म्हणजे आजोबाकडून) वाटणी मागता येते का, असा प्रश्न या खटल्यात न्यायालयासमोर आला. यावर न्या.तेलंगांचे उत्तर होकारार्थी होते, पण ते अल्पमतात होते. परंतु नंतरच्या काळात अनेक उच्च न्यायालयांनी  न्या.तेलंगांचे मत मान्य केले. कायदा व न्याय याव्यतिरिक्त समाजकारण, राजकारण, धर्मकारण आणि अर्थकारण या क्षेत्रांतही न्या.तेलंग यांनी सक्रिय सहभाग घेऊन भरीव कार्य केले. काँग्रेसच्या स्थापनेत न्या.तेलंगांचा सहभाग होता.

न्यायाधीश होण्याआधी वयाच्या छत्तिसाव्या वर्षी मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय कुलगुरू आणि सर्वांत तरुण कुलगुरू होण्याचा मान त्यांना मिळाला. न्या.तेलंग आणि त्यांच्यानंतर न्या.रानडे आणि न्या.चंदावरकर या न्यायमूर्ती-त्रिमूर्तीने परस्परपूरक भूमिका निभावून महाराष्ट्राला उदारमतवादाचा वस्तुपाठ घालून दिला.

- शरच्चंद्र पानसे

 

तेलंग, काशिनाथ त्रिंबक