Skip to main content
x

टिकेकर, रामचंद्र विनायक

धनुर्धारी

      टिकेकर यांचे रत्नागिरी जिल्ह्यातील टिके हे मूळ गाव होय. त्यांनी ‘किरात’ व इतरही काही टोपणनावे घेऊन लेखनाला सुरुवात केली, परंतु ‘धनुर्धारी’ या नावाने ‘केसरी’मधून त्यांनी जे लेख लिहायला आरंभ केला, ते लेख अतिशय लोकप्रिय झाले त्यामुळे लेखक म्हणून त्यांनी ‘धनुर्धारी’ हेच नाव कायम ठेवले. आयुष्याच्या अखेरच्या वर्षांत त्यांच्या मनात विरक्तीची भावना उत्पन्न झाली आणि लातूरजवळ तडवळ येथे रामदासी संप्रदायाची दीक्षा घेण्याचे त्यांच्या मनात आले. तेव्हा ‘राघवानंद’ या टोपणनावाने त्यांनी त्या पंथाची देवळे व मठ यांचे पुनरुज्जीवन करावे म्हणून वर्तमानपत्रातून काही लेख लिहिले. ‘राघवानंद’ हा ‘धनुर्धारी’ यांचा शेवटचा अवतार होय. ‘कलम कदमी’ नामक रोजनिशी हे त्यांचे अखेरचे लेखन असून या रोजनिशीवरून आज अज्ञात असणार्‍या अनेक तत्कालीन गोष्टींवर प्रकाश पडू शकला असता, परंतु त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकाने हेतुतः ही रोजनिशी नष्ट केली व तिच्यामधील सर्व नोंदी काळाच्या पडद्याआड गेल्या.

     टिकेकर यांचे शिक्षण इंग्रजी सहा इयत्ता इतकेच झाले होते. घरची गरिबी व स्वतः वडीलभाऊ असल्यामुळे त्यांना मध्येच शाळा सोडून नोकरी धरावी लागली. धारवाड येथील शाळेत असताना भाषा व इतिहास या विषयांचे त्यांनी भरपूर वाचन केले. या वाचनाचा त्यांच्या लेखनासाठी पुढील काळात उपयोग झाला. ‘सदर्न मराठा रेल्वे’च्या धारवाड येथील अकान्ट्स ऑफिसात त्यांची पहिली नोकरी झाली. त्यानंतर अक्कलकोट, सोलापूर, बार्शी इत्यादी वेगवेगळ्या ठिकाणी निरनिराळ्या प्रकारच्या नोकर्‍या त्यांनी केल्या. उदरनिर्वाहासाठी त्यांनी अडत-भुसार- किराणा- स्टेशनरी इत्यादी दुकाने चालविली, शिकवण्या केल्या व जेणेकरून अर्थप्राप्ती होईल अशा लहानमोठ्या उलाढालीही केल्या. मात्र उपजीविकेसाठी जेथे-जेथे त्यांना जावे लागले, तेथे-तेथे त्यांनी समाजोपयोगी कार्य केले. उदाहरणार्थ अक्कलकोट संस्थानात ‘द अक्कलकोट अ‍ॅग्रिकल्चरल सिंडिकेट’ नामक संस्था काढून शेतकर्‍यांची गार्‍हाणी दूर करण्याचा प्रयत्न केला, सोलापूरमध्ये मोडकळीस आलेला विणकर्‍यांचा धंदा मार्गी लावण्यासाठी ‘वीव्हर्स गिल्ड’ स्थापन करून धावत्या धोट्याचे माग बनवून कापडाच्या जीन्स विणण्याची योजना आखली, बार्शी येथे कापडाच्या गिरण्या सुरू केल्या. अर्थात असे उद्योग केले तरी लक्ष्मी त्यांच्यावर कधी प्रसन्न झाली नाही. ते गरीबच राहिले. अनेकदा तर त्यांच्या प्रयत्नांतून केवळ अपयश आणि कर्ज तेवढे वाट्याला आले.

     ‘धनुर्धारी’ यांनी आपल्या पंचेचाळीस वर्षांच्या आयुष्यात विपुल लेखन केले. ‘जवानमर्द ब्राह्मणभाई’, भाग १-२ (१८९१), ‘मराठ्यांच्या मर्दुमकी’, भाग १-२ (१८९१) , ‘वीरस्नुषा राधाबाई’ (१८९१), ‘आपणांवरील जबाबदारी’ (१८९२), ‘आजोबाने नातवास सांगितलेल्या गोष्टी’ (१८९२), ‘तंट्या भिल्लं’ (१८९१), ‘हरिपंत फडके’ (१८९२), ‘शूर अबला’ (१८९२), ‘पैसा कसा मिळेल?’ (१८९२), ‘नाना फडणवीस’ (१८९३), ‘मराठ्यांचा पत्रबद्ध इतिहास’ (१८९३), ‘अहिल्याबाई होळकरीण’ (१८९५), ‘पानपतचा मोहरा’ (१८९३), ‘प्रौढ प्रतापनिधी माधवराव’ (१८९७), ‘उमाबाई दाभाडे’ (१८९७), ‘वाईकर भटजी’ (१८९८), ‘बाळकृष्ण आत्माराम गुप्ते’ (१८९८), ‘पिराजी पाटील’ (१९०३), ‘उपाशी महाराष्ट्राला उद्योग’ (१९०३), ‘गुरुभक्ती’ (१९०४), ‘ब्रह्म’ (१९०४), ‘भक्ती’ (१९०४), ‘अभ्यास’, ‘आमची गळिताची धान्ये’, ‘व्यापारी भूगोल’, ‘नीतिधर्मपाठ’, ‘अलिजाबहादुर शिंदे’, ‘आर्यधर्माचा इतिहास’, ‘मरेन पण ख्रिस्ती होणार नाही’, ‘हिंदु लोकांचा कैवारी’ असे अक्षरशः नानाविध विषयांसंबंधीचे सुबोध व उद्बोधक लेखन टिकेकर यांनी केले आहे. याशिवाय ‘कुलवधूंचा ज्ञानकोश’, ‘लहान मुलांचे पुस्तकालय’, ‘शेत-शेतकी आणि शेतकरी’, ‘व्यापार-उदीम’ अशीही साहित्य निर्मिती त्यांच्या नावावर आहे. तत्कालीन समाजस्थितीशी निगडित अनेक विषयांचा परामर्श त्यांनी घेतला. त्यामधून स्वानुभवाची प्रतीती व परोपकाराची आकांक्षा यांचे दर्शन घडते.

     स्वदेशाविषयीचे आत्यंतिक प्रेम आणि समाजोद्धाराची तळमळ हे त्यांच्या साहित्य निर्मितीचे प्रमुख अधिष्ठान आहे. उपमा, उत्प्रेक्षा, अतिशयोक्ती इत्यादी शब्दालंकार व रम्य कल्पना यांनी युक्त अशी त्यांची भाषा आहे. उदाहरणार्थ ‘फूल चुरगळले तरी ते बहारदार वास देते’ या शब्दांत त्यांनी अहिल्याबाईंच्या कर्तृत्वाची काव्यपूर्ण नोंद केली आहे. पेशवाई आणि नाना फडणीस यांच्या मर्यादांसंबंधी लिहिताना त्यांच्या लेखणीत त्वेष उतरतो. ‘धनुर्धारीं’ची भाषा घरगुती असली, तरी रंजक आहे. अवतरणे, सुभाषिते, म्हणी, दृष्टान्त, अर्थांतरन्यास यांनी ती नटलेली असली तरी तिच्यात नटवेपणा नाही. ‘आपल्या इतिहासासंबंधाने पराकाष्ठेचे औदासीन्य दिसते.’ ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन सर्वसामान्यांना इतिहासाची गोडी लागावी या भावनेने त्यांनी आपले ऐतिहासिक स्वरूपाचे लेखन केले. 

      व्यापार, उदीम, अर्थशास्त्र या विषयांसंबंधी लिहिताना ‘डॉ. वॅट याचा कोश’, ‘स्टेट्समन इयर बुक’, ‘सार्वजनिक सभा’चे त्रैमासिक इत्यादींचा साधार उपयोग त्यांनी केला आणि अर्थशास्त्रासारख्या रूक्ष विषयावरही मनोरम व सुगम पद्धतीने लिहिले. ‘वास्तविक पाहता या आमच्या नीचतर दैनेचे मुख्य कारण अपरिहार्य अशी परदेशाच्या व्यापार-उदम्यांची आम्हांबरोबर लागलेली झटापट, आणि त्यांच्याशी सामना देण्याला अवश्य असणार्‍या साधनांची अनुकूलता हेच होय;’ ‘आमचे राज्यकर्ते आमच्या देशाच्या नैतिक उन्नतीविषयी जितकी कळकळ दाखवितात तितकीच किंवा त्याच्या दशांश कळकळ ते आमच्या आधिभौतिक सुस्थितीविषयी दाखवीत नाहीत यातच आमच्या नष्टचर्याचे सारे बीज आहे.’ या शब्दांत त्यांनी भारतातील दैन्याचे व देशाच्या परागतीचे निदान केले आहे. ‘ज्ञान आणि उद्योग हे सध्याच्या काळी असेच नव्हे तर सर्वदा कल्पवृक्ष होत. परवशतेला ज्ञान आणि दारिद्य्राला उद्योग अमृतसंजीवनी होय,’ अशा स्वरूपाचे ‘धनुर्धारी’ यांचे विचार देशवासीयांना कायम प्रेरक ठरावेत असे आहेत.

      नाना विषयांवर लिहिले असले, तरी ‘धनुर्धारी’ हे नाव विशेष प्रसिद्ध आहे ते त्यांच्या ‘वाईकर भटजी’ या कादंबरीसाठी. ऑलिव्हर गोल्डस्मिथच्या ‘द विकार ऑफ वेकफील्ड’ या कादंबरीचे हे रूपांतर आहे. जॉर्ज इलियटच्या ‘सीन्स फ्रॉम क्लेरिकल लाइफ’ या कादंबरीशीही तिचे साम्य आहे. या कादंबरीतून एके काळच्या भिक्षुकी गृहस्थितीचे नमुनेदार चित्र पाहावयास मिळते. केवळ समकालीन नव्हे तर उत्तरकालीन वाचकांनाही विचारप्रवृत्त करणारे विवाहविषयक मतप्रतिपादन धनुर्धारीनी निर्भीडपणे केले आहे. विवाहाप्रमाणेच धर्मश्रद्धा, धर्मांतर, मैत्री, सुख, सौंदर्य, लक्ष्मी, आत्महत्या, झोप, सत्ता, कर्ज इत्यादी बाबतींतही त्यांनी आपली मते कादंबरीतील विवेचनामधून मांडली आहेत. स्वभाव वर्णनाचे कौशल्य हा या कादंबरीचा एक महत्त्वाचा विशेष म्हणावा लागेल. खुद्द वाईकर भटजी, त्यांचे कुटुंब व स्नेही मोरोबा यांपैकी प्रत्येकाचे कादंबरीतील व्यक्तिचित्रण स्वाभाविक, परस्परभिन्न  व वैशिष्ट्यपूर्ण आहे. स्त्री-स्वभावातील खाचाखोचांचे त्यांनी केलेले निरीक्षण भटजींच्या पत्नीच्या व्यक्तिचित्रणातून प्रकटते. ‘वाईकर भटजी’ ह्या कादंबरीपासून मराठीतील रूपांतरित कादंबर्‍यांचा प्रवाह क्रमशः विकसित होत गेला.

     शेतकर्‍यांची गार्‍हाणी व त्यांच्या अनुकंपनीय हाल-अपेष्टा जगजाहीर करण्यासाठी धनुर्धारी यांनी ‘पिराजी पाटील’ ही कादंबरी लिहिली. ही कादंबरी हा वास्तविक पाहता कादंबरी लेखनाचा त्या काळातील एक नवा प्रयोग म्हणता येईल. सर्वसामान्यपणे कादंबरीला एक कथानक असावे असा संकेत रूढ होता, ‘पिराजी पाटील’मध्ये मात्र वेगवेगळ्या कथांचे मिश्रण करून त्याला त्यांनी कादंबरीचे रूप दिले आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण समाज, इंग्रज अधिकार्‍यांची बेपर्वाई वृत्ती, राज्यव्यवस्थेची नवीन पद्धती, निसर्गाची अवकृपा, दुष्काळामुळे पसरणारी अवकळा इत्यादी मानवी व अतिमानवी कारणांमुळे खेड्यातील जीवन किती दुःखद व कष्टप्रद होते, त्याचे आत्मीयतेने केलेले चित्रण आढळते. लोभी माणसे, स्त्रियांची केविलवाणी दशा इत्यादींचे चित्रणही त्यांनी आस्थापूर्वक केले आहे. कादंबरीतील पात्रांच्या जीवनाशी, त्यांच्या सुखदुःखांशी व आशानिराशेच्या वेगवेगळ्या प्रसंगांशी कादंबरीकार समरस होतो.

     ‘धनुर्धारी’ यांचे लेखन प्रसंगोपात्त असो वा विषयनिष्ठ असो, त्यामागे त्यांना आपल्या समाजाविषयी वाटणारे प्रेम व समाजाविषयीची कळकळ प्रतीत होते. लेखन हे जनसेवेचे एक साधन आहे, अशी त्यांची धारणा होती. ‘समशेरीने लेखणीस साम्राज्य ओपिले हे मात्र विसरू नका; आणि त्याप्रमाणे हातून होईल तेवढी धर्मसेवा, देशसेवा, भाषासेवा करा, हे माझे विनयपूर्वक मागणे आहे.’ असे त्यांनी लिहून ठेवले आहे. त्यांच्या आचारविचारांतून व कार्यातून त्यांचा हाच दृष्टीकोन प्रकट झाला आहे. 

     - प्रा. डॉ. विलास खोले

टिकेकर, रामचंद्र विनायक