Skip to main content
x

तळपदे, जयश्री चित्रसेन

जयश्री टी.

      लाप्रिय वातावरण असलेल्या घरात जन्माला आलेल्या जयश्री टी. यांचे वडील चित्रसेन हे नाटकांमधून कामे करत असत, तर त्यांच्या आईला गायनाची आवड होती. त्यामुळे आपसूकच लहानपणापासून जयश्री यांच्यावर कलेचे संस्कार झाले. बालवयातच त्यांनी नृत्याचे शिक्षण घेण्यास प्रारंभ केला, तो के.श्री. पांचाळ यांच्याकडे. कालांतराने नृत्यात पारंगत झालेल्या जयश्री टी. यांनी लहान वयातच नृत्याचे कार्यक्रम सादर केले. त्यांचा नृत्याविष्कार पाहूनच ‘गूँज उठी शहनाई’ या चित्रपटामध्ये बालकलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. बालकलाकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत स्थिरस्थावर झाल्यावर जयश्री टी. यांना ‘धर्मकन्या’ या मराठी चित्रपटात काम मिळाले. त्यांच्यावर चित्रित झालेली ‘सखी गं, मुरली मोहन मोही मना...’ ही बैठकीची लावणी सादर करताना दिसलेल्या त्यांच्या चेहऱ्यावरच्या विभ्रमाच्या खुणांचे मूळ त्यांनी बालपणी घेतलेल्या नृत्याच्या शिक्षणात आहे, असे दिसते.

      जयश्री टी. यांचा महत्त्वाचा चित्रपट म्हणजे ‘बायांनो नवरे सांभाळा’. १९७४ सालच्या या चित्रपटात जयश्री यांनी साकारलेली भूमिका महत्त्वपूर्ण होती. अन्यायाने पेटून उठलेली नायिका आपल्यावर अन्याय करणाऱ्या व्यक्तींचा सूड घेते. साधी भोळी, अबला ते सबला असा अंबू या व्यक्तिरेखेचा प्रवास त्यांनी आपल्या अभिनयातून साकारलेला आहे. या भूमिकेसाठी जयश्री यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळाला. यानंतरचा त्यांचा महत्त्वाचा चित्रपट म्हणजे ‘ह्योच नवरा पाहिजे’ (१९८०). या चित्रपटात त्यांनी दादा कोंडके या दिग्गज कलाकाराबरोबर केलेले कामही नावाजले गेले. त्यानंतर त्यांनी ‘मानाचं कुंकू’ (१९८१), ‘विश्‍वास’ (१९८२) या चित्रपटातून महत्त्वपूर्ण भूमिका केलेल्या आहेत.

     मराठी चित्रपटसृष्टीत नावारूपाला आलेल्या, तसेच सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक पटकावणाऱ्या या मराठी अभिनेत्रीने हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला, तो आपल्या अभिनयकौशल्याने. हिंदीतील अभिनेत्री हेलन, बिंदू यांच्याबरोबरीने जयश्री यांनीही कुशल नृत्यांगना म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. कालांतराने हिंदी चित्रपटांमधून त्यांना चरित्रभूमिका मिळत गेल्या, त्या भूमिकाही त्यांनी तितक्याच आनंदाने रंगवल्या. तमिळ, तेलगू, मल्याळम्, उडिया, आसामी, राजस्थानी, पंजाबी, बंगाली अशा १८ भाषांमधील चित्रपटात त्यांनी निरनिराळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या. एवढ्या विविध भाषांमध्ये काम करणार्‍या त्या एकमेव मराठी अभिनेत्री होत्या. गुजरात सरकारतर्फे तीन वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. 'दिले से दिया वचन', 'इस प्यार को क्या नाम दूॅं', 'दो दिल एक जान', 'ससुराल सिमर का', 'ये उन दिनों की बात हैं' अशा काही दैनंदिन स्वरूपाच्या मालिकांमध्येही त्यांनी विविध भूमिका केल्या. 

     जयश्री टी. या मा. विनायक यांच्या मुलाशी, म्हणजे जयप्रकाश कर्नाटकी यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. त्यांनी देशात व परदेशात नृत्याचे कार्यक्रम केले आहेत.       

- संपादित

तळपदे, जयश्री चित्रसेन