Skip to main content
x

तगारे, गणेश वासुदेव

     हाराष्ट्रात पुण्या-मुंबईचे विद्वान मुख्य प्रवाहातील समजले जातात. पण आपल्या पांडित्याने ग.वा. तगारे यांनी सांगलीसारख्या गावातून कष्ट साध्य अभ्यास करून प्राच्यविद्येच्या क्षेत्रात आपले स्थान पक्के केले, अशी त्यांची ख्याती. राष्ट्रीय संस्कृत संस्थानाने त्यांच्याकडे अठरा महापुराणांच्या इंग्लिश भाषांतराचा प्रकल्प सुपुर्द केला होता. हे अजस्र काम चोखम्बा प्रकाशनाने दिल्लीत प्रकाशित केले. १९७१ ते १९९६ अशी पंचवीस वर्षे प्रा. तगारे यांनी भागवत, नारद पुराण, कूर्म पुराण, वायू-ब्रह्मांड-स्कंद अशा सहा प्रचंड पुराणांचे भाषांतर केले. ते पावणेदोन लक्ष श्‍लोकांचे होते. याखेरीज संस्कृत, प्राकृत, पाली, अर्धमागधी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते, ग्रंथही प्रकाशित झाले.

     ग.वा. तगारे मूळचे सांगली जिल्ह्यातील आष्टे गावचे. त्यांच्या घरातील संस्कारक्षम जीवनात ते लहानाचे मोठे झाले. तसे तगारे घराणे मूळचे राष्ट्रकूटांची राजधानी उस्मानाबाद म्हणजेच धाराशिवमधील ‘तगर’, ‘तेर’ गावचे. चौदाव्या शतकात ही मंडळी आष्टे येथे स्थलांतरित झाली. आजही वाळवे-इस्लामपूर-अधनी येथील तगारे घराणी मूळचे आष्टा येथीलच सांगतात. वडिलांचा सराफीचा व्यवसाय, पण ग.वा. यांना संस्कृतची गोडी लागली.

     शालेय वयात ते सांगलीच्या सिटी हायस्कूलमध्ये दाखल झाले. पदवीसाठी महाराष्ट्रातील ख्यातनाम विलिंग्डन महाविद्यालयात दाखल झाले. फक्त एका गुणाने त्यांची ‘जगन्नाथ शंकरशेठ’ शिष्यवृत्ती हुकली, पण त्यांनी आपल्या कर्तृत्वाने ही उणीव भरून काढली. पदवीनंतर नाइलाजाने त्यांना सिटी हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी पत्करावी लागली, पण मनात विद्यानगरी पुण्यात येऊन पुढचा अभ्यास करावयाचा होता. बलवत्तर मनीषा धरून ते पुण्यात आले.

     सुप्रसिद्ध संस्कृत विद्वान डॉ. प.ल. वैद्य यांचे साहाय्यक म्हणून काम करीत असताना त्यांनी एम.ए.ची पहिली टर्म पूर्ण केली, पण पुढच्या काळात आजारपणामुळे आणि आर्थिक अडचणींमुळे त्यांना कराडला मावशीकडे यावे लागले. कराड-शिराळा-भालोद (खान्देश) अशा विविध ठिकाणी शिक्षकाच्या नोकर्‍या करीत त्यांनी १९३९ साली एम.ए. पूर्ण केले आणि पीएच.डी.साठी पुण्याला डेक्कन महाविद्यालयात येण्याचे ठरवले. तगारे सांगलीत होते, त्या वेळी त्यांना रानडे वाड्यात सुप्रसिद्ध न्यायमूर्ती राम केशव रानडे यांचा शेजार व सख्य लाभले.

     पुण्यातील शिक्षणासाठी आर्थिक तरतूद म्हणून पुण्याजवळच्या भोर संस्थानच्या राजेसाहेबांकडे मुलांना शिकवण्याची जबाबदारी घेतली. डेक्कन कॉलेजमध्ये ‘हिस्टॉरिकल ग्रामर ऑफ अपभ्रंश’ या विषयावर  पीएच.डी. मिळवली. ग्रंथरूपाने हा प्रबंध प्रसिद्ध झाला. जगभर भाषा कोविदांनी त्यांचा गौरव केला. डॉ. सु.मं. कात्रे त्यांचे मार्गदर्शक होते. भोरच्या राजेसाहेबांनी डॉ. तगारे यांना भोरच्या विद्यालयाचे मुख्य नेमण्याची इच्छा दर्शवली आणि प्रबंध प्रकाशित करायला डेक्कन महाविद्यालयाला देणगी दिली. संस्थानच्या विलीनीकरणानंतर त्यांना ‘डायरेक्टर ऑफ एज्युकेशन’ची नोकरी देऊ केली, पण सरकारी प्रशासकीय काम त्यांना नको होते. उस्मानाबाद-कोल्हापूर अशी प्राध्यापकी करीत ते आपला संस्कृतचा व्यासंग वाढवत होते. राजाराम कॉलेजचे प्रा. डॉ. आ.ने. उपाध्ये यांच्याशी तगारे यांचा घनिष्ट संबंध आला. त्यांनी मराठीतून प्राकृत भाषांचा इतिहास लिहिण्यास सुचवले. कोल्हापूर वास्तव्यात भाऊसाहेब खांडेकर, रणजित देसाई, शंकर पाटील, रमेश मंत्री व पुढे बाळाचार्य खुपेरकर शास्त्री यांच्याशी त्यांची घनिष्ट मैत्री झाली. जैन आणि शैव तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासाठी त्यांना ‘हेमचंद्र पुरस्कार’ मिळाला.

     डॉ. तगारे यांच्या पत्नीचे नाव शांताबाई. या दोघांना चार पुत्र झाले, पण त्यांना कन्येची आवड असल्याने त्यांनी देवीला नवस केला होता. वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी ते पुन्हा पुण्यात डेक्कन कॉलेजच्या संस्कृत कोशात काम करण्यासाठी आले. त्यांचे वास्तव्य पद्मावतीजवळ होते. उतारवयातही ते बसने ये-जा करीत.

     डॉ. तगारे यांनी केलेले पुराणाचे इंग्लिश रूपांतर ४३ खंडात आहे. त्याखेरीज अपभ्रंश भाषेवरचा पीएच.डी. प्रबंध, ‘स्पंदकारिका’, ‘सिद्धान्तज्योतीचा तत्त्व निर्णय’, ‘वसुगुप्ताची शिवसूत्रे’, ‘कुंदकुंदाचार्यांचे प्रवचन सार’, ‘काश्मीरशैव दर्शन’, ‘पाली-प्राकृत भाषांचा इतिहास’ असे बरेच ग्रंथ त्यांच्या विद्वत्तेची चौफेर दृष्टी दाखवून देतात. मूर्तिविज्ञानाधारे कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मूर्तीचा अभ्यास करून ही ‘लक्ष्मी’ विष्णुपत्नी नसून शिवपत्नी ‘पार्वती’ आहे असा सिद्धान्त मांडला.

     कोणत्याही प्रकारच्या लौकिकाची, आर्थिक अभिलाषेची तमा न बाळगता केवळ अभ्यासाला वाहून घेणारा हा पंडित विरळाच म्हणावा लागेल. ९७ वर्षांच्या दीर्घायुष्यानंतर प्रा. तगारे अनंतात विलीन झाले. ग्रंथरूपाने ते मागे उरले, एवढे मात्र खरे!

          — वा.ल. मंजूळ

तगारे, गणेश वासुदेव