Skip to main content
x

जोगळेकर, योगिनी विश्वनाथ

      योगिनी जोगळेकर यांच्यावर बालपणापासून विविध कलांचे संस्कार झाले. पुण्याच्या हुजूरपागा शाळेत मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाले. वयाच्या केवळ आठव्या वर्षी त्यांची कवितेशी भातुकली सुरू झाली. पहिली कविता शाळेच्या ‘बालिका-दर्शन’मध्ये छापून आली. शालेय जीवनात ‘निशिकांतची नवरी’ ह्या नाटकात त्यांनी भूमिका केली. त्या वेळी गणपतराव बोडस, पेंढारकर या दिग्गजांचे मार्गदर्शन लाभले. ‘ललितकलादर्श’च्या त्या महिला नाटककार झाल्या. शिक्षण घेत असताना संगीत, लेखन, अभिनय, वक्तृत्व, चित्रकला अशा अनेक अंगांनी त्यांचे व्यक्तिमत्त्व बहरत गेले. संस्कृत आणि मराठी घेऊन त्या स.प.महाविद्यालयातून बी.ए.ला पहिल्या आल्या. त्या वेळी त्यांना ‘यशोदा चिंतामणी’, ‘कुसुम वाघ’, ‘विंझे’ ही तीन मानाची पारितोषिके मिळाली. १९४८ ते १९५३ या काळात पुण्यातील सरस्वती मंदिरात शिक्षिका म्हणून त्यांनी काम केले. महाविद्यालयात असताना तंबोरा बक्षीस  म्हणून मिळाले आणि पुढे त्या गायिका झाल्या. एच.एम.व्हीने त्यांच्या ध्वनिमुद्रिका काढल्या. सर्व केंद्रांतून आणि भारताच्या सर्व संगीत मंडळांतून त्या गाऊ लागल्या. ‘रंगात रंगला श्रीरंग’ या संगीत नाटकाच्या रौप्यमहोत्सवी प्रयोगाचे वेळी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात संगीत दिग्दर्शक केशवराव भोळे गौरव करताना म्हणाले, “उद्याची मोठी स्त्री-नाटककार होशील.”

योगिनीबाईंचा मूळचा पिंड साहित्यात रमणारा होता. त्यांनी चाळीस कादंबर्‍या, बावीस कथासंग्रह, चार कवितासंग्रह, बारा बालवाङमयसंग्रह, तीन नाटके, एक चरित्र अशी विपुल साहित्य-सेवा केली.

त्यांचे लेखन बहुढंगी असले, तरी प्रामुख्याने कुटुंब, कुटुंबातील व नाते-संबंधांतील ताण-तणाव, संघर्ष यांना वेढून असणारे होते, त्यामुळे त्याला अतिशय लोकप्रियता लाभली. त्यांचे लेखन वाचकांना आपले, जिव्हाळ्याचे वाटले. त्यांच्या कथा-कादंबर्‍या मध्यमवर्गीय कुटुंबाच्या खांडेकरी वळणाच्या! त्यामुळे बदलत्या उच्चभ्रू वर्गाच्या पैसाकेंद्री समाजव्यवस्थेविरुद्ध त्या अत्यंत तीव्रतेने विरोध दर्शवितात. त्यांच्या कथेत सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तींचा संघर्ष दिसतो. बहुतेक कथांतील स्त्रिया सोशिक, सात्त्विक, प्रेमळ व भाबड्या, हसतमुख आणि त्यागमूर्ती दिसतात. त्यांच्यातील कवयित्रीचे प्रतिबिंब त्यांच्या कथा-कादंबर्‍यांतून दिसून येते. काही कथांमध्ये त्यांनी कविताही लिहिल्या आहेत. त्यांच्या काव्यात्मवृत्तीचा मनोहर आविष्कार कथांतून झालेला आढळतो.

त्यांनी आपला पहिला कथासंग्रह ‘झुंजूमूंजु’ आईला आणि वडिलांना अर्पण केला, कारण तेच त्याचे पहिले वाचक आणि समीक्षक! त्यांचे ‘उलट-सुलट’, ‘श्रावण’, ‘शर्यत’, ‘प्रतीक’, ‘ओटी’, ‘प्राची’, ‘उर्मी’, ‘पाझर’, ‘शिलगंण’, ‘आविष्कार’, ‘देणगी’, ‘उपहार’, ‘जाण’, ‘मौन’, ‘अप्रूप’ इत्यादी कथासंग्रह विशेष उल्लेखनीय! एका खासगी कथाकथन कार्यक्रमात ‘शिलांगण’ ही कथा ऐकताना प्रसिद्ध लेखक पु.भा.भावे यांचे डोळे ओलावले. ही कथेला मिळालेली पावतीच होय. ‘नन्या आईसफ्रुटवाला’ या कथेसाठी आचार्य अत्रे यांनी त्यांची पाठ थोपटली.

त्यांच्या कादंबर्‍यातील व्यक्तिरेखांनी जीवनसंघर्ष करायला अनेकांना उद्युक्त केले, तर कोणाला जीवन जगायला शिकवले. सोलापूरची एक तरुणी छळाला कंटाळली होती, पण ‘गुलबक्षी’ कादंबरीतील नायिकेने तिला सावरले. ‘वादळफूल’, ‘नादब्रह्म’, ‘प्राजक्ता’, ‘द्विदल’, ‘हार-जीत’, ‘पूर्ती’, ‘कसरत’, ‘तिढा’, ‘झुला’, ‘शह’, ‘कुणासाठी कुणीतरी’, ‘बावन्नकशी’, ‘चढ-उतार’, ‘निरागस’, ‘घरोघरी’, ‘सांगाती’ इत्यादी कादंबर्‍या लक्षणीय!- त्यांचे ‘रिमझिम’, ‘सूरगंधा’, ‘आंबट-चिंबट’, ‘आलापिनी’ हे चार कवितासंग्रह ‘रामप्रहर’ हे चरित्रलेखन तर ‘गुरुशिष्य’, ‘तिळगुळ’, ‘खंडू खोडसाळे’, ‘फुलांचे झेले’, ‘वाकडी काकडी’, इत्यादी कुमार वाङ्मय प्रसिद्ध आहे. ‘मागील दार’, ‘तिसरी घंटा’, ‘तिघांच्या तीन तर्‍हा’, ‘रंगात रंगला श्रीरंग’ ही नाटके त्यांनी लिहिली.

किल्ले रायगडाच्या पायथ्याशी त्यांच्या कवितेच्या दोन सुंदर ओळी संगमरवरात लिहिल्या आहेत. त्या ओळी त्यांचे अजरामर स्मारकच म्हणावे.

“सूर्याआधी नमस्कार पूर्व दिशेला असावा

शिवाआधी दंडवत जिजामातेस असावा.”

डॉ.भालेराव स्मृती पुरस्कार (मुंबई मराठी साहित्यसंघ), अमृत महोत्सवी (७५ वे) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - स्त्री-लेखिका पुरस्कार; हे त्यांना मिळालेले महत्त्वाचे पुरस्कार होत.

- वि. ग. जोशी

जोगळेकर, योगिनी विश्वनाथ