Skip to main content
x

उपाध्ये, आदिनाथ नेमीनाथ

        दिनाथ नेमिनाथ उपाध्ये यांचा जन्म इचलकरंजी जवळील बारवाडपासून जवळच असलेल्या सदलगे मजले शमनेवाडी येथे झाला. वडील नेमिनाथ हे पूजा- अर्चा, प्रवचन, धर्मकृत्ये करणार्‍या उपाध्ये घराण्यातील एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून गणले जात. ते शेतीही करत. दुर्दैवाने त्यांची पहिली चार मुले जगली नाहीत. उतारवयात झालेला मुलगा म्हणजेच आदिनाथ होय. लहानपणी कोणाची दृष्ट लागू नये म्हणून आदिनाथाचे नाक टोचले होते व भिक्षेने पैसे जमवून त्यात चमकी घातली होती. पहिली चार मुले गेल्याचे दुःख वडिलांना असल्याने त्यांनी तो सोडून जाईल या भयाने आदिनाथला जवळही घेतले नाही, लळा लावला नाही. त्याचे नावही कल्लू (कानडी भाषेत कल्लू म्हणजे दगड) ठेवले. परंतु चार वर्षांचा झाल्यावर शाळेत घालताना त्याचे नामकरण आदिनाथ झाले.

     आदिनाथ तिसरीत असतानाच वडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्याचा सांभाळ काकांनी म्हणजेच बाबाजींनी केला. चौथीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर आदिनाथचे पुढील शिक्षण बेळगावला गिलगेची अरताल हायस्कूलमध्ये झाले.

     आदिनाथ जात्याच हुशार असल्याने त्याला दक्षिण महाराष्ट्र जैन सभेची व शाळेची अशी दुहेरी शिष्यवृत्ती मिळाली आणि १९२३ साली उत्तम गुण मिळवून शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाला. सांगलीच्या राजाराम महाविद्यालयामधून महाविद्यालयीन शिक्षण सुरू झाले. तिथेच शंकरशेट शिष्यवृत्ती मिळाली. १९२८मध्ये मुंबई विद्यापीठातून ते संस्कृत ऑनर्स हा मुख्य विषय व अर्धमागधी हा अवघड विषय घेऊन बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले.

     त्यानंतर लगेच नोकरी न करता आदिनाथ यांनी आईच्या आग्रहास्तव पुण्याच्या भांडारकर संस्थेतून, अर्धमागधी विषयात मुंबई विद्यापीठाची एम.ए.ची पदवी प्राप्त केली. कोल्हापूरच्या महाराणी लक्ष्मीबाई प्रशाळेमध्ये आदिनाथ उपाध्ये शिक्षक म्हणून नोकरी करू लागले. काही काळानंतर राजाराम महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत झाले. सदलगे येथील मामांच्या धाकट्या कन्येशी १९३२ साली आदिनाथ विवाहबद्ध झाले.

     प्रा. आदिनाथ उपाध्ये यांच्या शिक्षणातील बराचसा काल भांडारकर संस्थेत गेल्यामुळे जुनी हस्तलिखिते व तत्सम कामांची त्यांना कल्पना होती  तसेच  त्याची आवडही निर्माण झाली होती. अर्धमागधी विषयातील शिक्षण व प्राकृत विषयातील संशोधन यांमुळे कुंदकुदाचार्य यांनी जैन धर्मातील एकत्रीकरण प्रवचनसार या ग्रंथात केले होते, हे उपाध्येंच्या लक्षात आले. परंतु पुढे प्रादेशिकतेनुसार अनेक ठिकाणी याच्या प्रती उपलब्ध झाल्या व त्यांत अनेक दोषही होते. या ग्रंथाची शुद्ध प्रत तयार करण्याचे कार्य डॉ. उपाध्ये यांनी केले.

     प्रवचनसार या ग्रंथाची शुद्ध प्रत तयार करण्याच्या कामाला आठ वर्षे लागली. डॉ. उपाध्ये यांना १९३८ मध्ये, त्यांच्या या अभुतपूर्व कामाची दखल घेऊन ‘डी. लिट.’ ही बहुमानाची पदवी देऊन सन्मानित केले गेले. १९३० सालापासून राजाराम महाविद्यालयातील प्राध्यापक ते प्राचार्य असा त्यांचा प्रवास लक्षणीय होता. याच काळात ते विद्यार्थ्यांना संस्कृतच्या अभ्यासक्रमाकडे वळण्यास प्रवृत्त करत व मार्गदर्शनही करत. १९६२ ते १९७१ या काळात प्राचीन भाषा विभागाचे अध्यक्ष,अभ्यास मंडळाचे सदस्य व प्रभारी कुलगुरू अशी महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली. त्यांनी १९७१मध्ये ऑस्ट्रेलियामधील कॅनबरा येथे भरलेल्या अठ्ठाविसाव्या जागतिक प्राच्य विद्या परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी म्हैसूर येथे जैनधर्म व प्राकृत भाषा संशोधन यासाठी संस्था स्थापन केली. या संस्थेची उभारणी डॉ. उपाध्ये यांनी केली. डॉ. उपाध्ये सेहेचाळिसाव्या कन्नड साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. १९७३मध्ये पॅरीस येथे प्राचीन भाषांच्या अभ्यासासाठी भरलेल्या परिषदेत भारतातर्फे बेल्जमधील सँटवर्प येथे भरलेल्या जागतिक विश्वशांती परिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.

     डॉ. आदिनाथ उपाध्ये यांना १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्राचीन भाषा पंडित म्हणून राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. १९७५ मध्ये राज्यपालांच्या हस्ते सुवर्णपदक प्राप्त झाले. याशिवाय अनेक देशी व परदेशी नियतकालिकांत त्यांचे संशोधन निबंध प्रसिद्ध झाले. त्यांच्या प्रचंड कार्याची दखल देशात-विदेशांत घेतली गेली. परंतु डॉ. उपाध्ये यांनी आपले सर्व आयुष्य म्हैसूर येथील ‘जैनधर्म व प्राकृत भाषा’ संशोधन संस्थेच्या कामातच खर्ची घातले. डॉ. उपाध्ये यांचे कोल्हापूर येथे हृदयरोगाने देहावसान झाले.

सुपर्णा कुलकर्णी

उपाध्ये, आदिनाथ नेमीनाथ