Skip to main content
x

वैद्य, परशुराम लक्ष्मण

       रशुराम लक्ष्मण वैद्य यांचा जन्म कोकणातील केंबळी गावात झाला. वैद्य कुटुंबाची आर्थिक अवस्था कमालीची गरिबीची होती. लक्ष्मणराव वैद्यांना दरमहा ४-५ रुपयेच पगार मिळत असे. कुटुंबास हातभार लावण्यासाठी परशुरामांच्या मातोश्रींना काबाडकष्ट करावे लागत. खेडेगावात एक छोटेसे घर होते व थोडी शेतीवाडी सावकाराच्या ताब्यात होती.

     सहाव्या वर्षी बटू परशुरामाची मुंज झाली. त्या वेळी ‘मुंज’ हा एक औपचारिक समारंभ नसायचा. तो खराखुरा ‘उपनयन संस्कार’ होता. दुसर्‍या दिवसापासूनच बटू परशुरामाचे वेदपठण सुरू झाले. चौथ्या इयत्तेपर्यंत ‘ॐ भवति भिक्षां देहि’ हे भिक्षाव्रतच चालू होते. त्यानंतर परशुरामाचे संस्कृत शिक्षण सिद्धेश्वर या गावी जोरात सुरू झाले. व्याकरणशास्त्राचे शिक्षण सांगलीस झाले, तर आयुर्विद्या ते नाशिकला शिकले. वस्तुत: उत्तम आयुर्विद्या जाणत असतानाही केवळ वय लहान असल्याने वैद्यकीय व्यवसाय सुरू केला नाही.

     प्रथमत: तर्खडकरांच्या पुस्तकाच्या साहाय्याने नाशिक मुक्कामी ते आंग्लभाषा शिकले. डे. ए. सोसायटीचे आजीव सदस्य व संस्कृतचे प्राध्यापक पानसे यांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलमध्ये (त्या वेळी नानावाड्यात भरत असे) त्यांना प्रवेश मिळवून दिला. मॅट्रिकच्या परीक्षेत त्यांना दुसरी शंकरशेट शिष्यवृत्ती (१९१२) मिळाली.

     मध्यंतरी बरीच स्थित्यंतरे होऊन परशुराम वैद्यांचे आईवडील रोह्यातच स्थायिक झाले. यामुळे सन १९१२ साली दोन्ही जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्त्या रोहे या टुमदार गावात मिळाल्या.

     मॅट्रिक परीक्षेनंतर परशुरामपंत महाविद्यालयीन शिक्षणासाठी फर्गसन महाविद्यालयात दाखल झाले. काही शिकवण्या करून स्वत:चे व भावाचे शिक्षण परशुरामपंत पुढे रेटत होते. पण या दगदगीमुळे इंटरमिजिएट परीक्षेत प्रथम श्रेणी मिळाली नाही. परशुरामपंतांनी काहीशा वैतागातच पुढील शिक्षणाला रामराम ठोकला.

     न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांना शिक्षकाची नोकरी  मिळाली. ती सांभाळून त्यांनी पुढील शिक्षण करावयाचे ठरवले. ते न जमल्यामुळे शिक्षकी पेशा सोडून, कर्ज काढून पुढील महाविद्यालयीन शिक्षण करावे असे त्यांच्या मनात आले. सुदैवाने त्या काळी रँग्लर पु. र. परांजपे हे फर्गसनचे प्राचार्य होते. त्यांनी वैद्यांना पुरेसे कर्ज दिले तसेच परतफेड करण्याचा तगादा लावला नाही.

     पदवीपरीक्षेत त्यांना प्रथमश्रेणी व भाऊ दाजी शिष्यवृत्ती मिळाली. नंतर त्यांनी एक वर्ष कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात प्राध्यापकी केली. पुढे सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात ते प्राध्यापक झाले. न्यू इंग्लिश स्कूल, फर्गसन व तिन्ही विलिंग्डन महाविद्यालये ही डेक्कन एज्युकेशन सोसायटीची असल्याने, त्या सोसायटीने वैद्यांना आजीव सदस्य करून घेतले. पुढे परशुरामपंत वैद्य कोलकाता येथे गेले. तेथे पाली हा विषय घेऊन पदव्युत्तर परीक्षेत ते पहिले आले.

     यानंतर त्यांना भारत शासनाची शिष्यवृत्ती मिळाली. त्या शिष्यवृत्तीच्या बळावर ते फ्रान्स व बेल्जियम या देशांत गेले. पॅरिसला असताना त्यांनी फ्रेंचमध्ये आर्यदेवाच्या कृतीवर प्रबंध लिहून तेथे डि.लिट. पदवी मिळवली. त्यानंतर परत ते पुण्याला फर्गसनला आले. पण काही दिवसांतच नियामक मंडळाबरोबर त्यांचे मतभेद झाले म्हणून त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी व फर्गसन महाविद्यालय सोडले. पुढे ते व्ही. जी. जोगांच्या पुढाकाराने वाडिया महाविद्यालय (प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी) येथे संस्कृत व प्राकृत शिकवू लागले. सांगलीत विलिंग्डन महाविद्यालयात प्राध्यापक असताना, इचलकरंजी संस्थानचे महाराज घोरपडे यांनी बौद्ध धर्मावर तीन व्याख्याने देण्यासाठी परशुरामपंत वैद्यांना निमंत्रण दिले. पुढे या व्याख्यानत्रयीचे ‘बौद्ध धर्माचा अभ्युदय व प्रसार’ या शीर्षकाखाली एक पुस्तक तयार झाले.

     निवृत्तीनंतर पाच वर्षे वाराणसीला बनारस हिंदू विद्यापीठात विद्यापीठीय प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर चार वर्षे मिथिला इन्स्टिट्यूट (दरभंगा) येथे बौद्ध संस्कृत ग्रंथांची संस्करणे केली. या संस्कारित ग्रंथांची एकूण पृष्ठसंख्या २०,००० एवढी आहे. पुढे परशुराम वैद्यांनी १९६१पासून पुण्याच्या भांडारकर संस्थेत महाभारताच्या संशोधित आवृत्तीचे तिसरे व अखेरचे प्रमुख संपादक म्हणून काम केले. महाभारताचे खिलपर्व, हरिवंश, त्याचे संशोधित संस्करण व पदसूचीचे (प्रतीक सूची) सहा मोठे खंड वैद्यांनीच संपादित केले.

     भांडारकर संस्थेत महाभारताच्या संशोधित आवृत्तीचे काम व बडोदा येथील सयाजीराव गायकवाड संस्थेच्या रामायणाच्या संशोधित आवृत्तीचे काम, अयोध्या व युद्धकांड मिळून एकूण १-५ भागांचे संशोधित संस्करण, जैन कवी पुष्पदंत याचे अपभ्रंश भाषेतील महापुराण, हेमाद्रीचे प्राकृत व्याकरण, बौद्धगयार्थसंग्रह अशा रितीने परशुरामपंत वैद्यांनी संस्कृत-पाली-प्राकृतात भरघोस काम केले.

      वस्तुत: प्रा. वाग्वैद्य आदिनाथ नेमिनाथ उपाध्ये हे स्वत: प्राकृतचे गाढे व्यासंगी व पंडित पण त्यांनी भांडारकर संस्थेच्या संशोधनवार्षिकात (खण्ड ५०, १९६९, पृष्ठ ९१-९४) एक खास लेख लिहून प. ल. वैद्य यांनीच केवळ दशरूपकाच्या अवलोकटीकेत उद्धृत एका अपभ्रंश गाथेची नेमकी संस्कृत छाया तयार करून कसे अचूक अर्थनिरूपण केले आहे, याची प्रशंसा केली आहे.

     एका अनाकलित अपभ्रंश गाथेची, तिच्यातील शब्दनादानुसार, पुनर्बांधणी करून, त्याची संस्कृत-छाया निर्माण करून अचूक अर्थनिरूपण केल्याची प्रशंसापावती आदिनाथ नेमिनाथ उपाध्येंकडून मिळावी व उपाध्यांनी वैद्यांना अपभ्रंशाच्या बाबतीतले ‘मार्गशोधक’ म्हणावे, यापेक्षा अधिक काय स्तुती असू शकेल?

      सन १९६६मध्ये महाभारताच्या प्रकाशानाच्या वेळी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन उपस्थित होते.

     महत्त्वाचा भाग असा की, या अमोल कार्यासाठी वैद्य यांनी एक छदामही घेतला नाही. एवढेच नाही तर ज्या वेळी संस्थेकडे सेवकांचा पगार द्यायला पैसा नव्हता, त्या वेळी या साधुपुरुषाने आपल्या मिळकतीची गंगाजळी सेवकांचे वेतन देण्यासाठी कायमची देऊ केली. त्या वर्षी त्यांना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला.

डॉ. मो.गो. धडफळे

वैद्य, परशुराम लक्ष्मण