Skip to main content
x

वैद्य, पुरूषोत्तम गणेश

भैय्या वैद्य

     पुरुषोत्तम गणेश वैद्य ऊर्फ भैय्या वैद्य यांचा जन्म ९ मे १९३४ रोजी सातारा येथे  झाला. वडील गणेश भगवंत वैद्य हे समाजकार्यात रस घेणारे, करारी, शिस्तप्रिय आणि राष्ट्रप्रेमी होते. आई इंदिरा, प्रेमळ आणि तत्पर गृहिणी होती. सातारा जिल्ह्यातील कोळे गावातल्या एक शिक्षकी शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. कऱ्हाडच्या ‘शिवाजी  विद्यालया’त माध्यमिक शिक्षण झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्याच्या ‘फर्गसन’ महाविद्यालयात ते दाखल झाले.

      गणित विषयाची खास आवड असल्याने विज्ञान शाखेत त्यांनी प्रवेश घेतला. चिकाटी, जिद्द, अथक परिश्रम, आत्मविश्‍वास यांच्या बळावर ते शिकत राहिले आणि बघता बघता एम.एस्सी., एम.एड.पर्यंत त्यांनी मजल मारली. खेळांची आवड असल्यामुळे खेळांचा सराव करता करता नकळत खिलाडू वृत्ती अंगी बाणली गेली. त्यांना संख्याशास्त्रज्ञ व्हायचे होते. पण शिकण्या-शिकवण्याची त्यांना मुळातच आवड होती. अंगी अध्यापन कौशल्य होतेच. शिवाय मुलांची अचूक नस त्यांना नेमकी ठाऊक होती. एन्. सी. जोशी या मित्राच्या सहकार्याने, सहमतीने सुरुवातीला विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर वर्ग सुरू केले. पण मनात ऊर्मी होती ती शाळा काढण्याची! १९६२ साली त्यांनी सुरू केलेल्या आपटे प्रशाला जेमतेम एकवीस मुले होती.

      ‘नापासांची शाळा’, ‘इतरांनी नाकारलेल्या मुलांची शाळा’, ‘गावातले गटार’ या शब्दांत जी शाळा हिणवली गेली तीच पुढे अनेकांना प्रेरणास्रोत, पथप्रदर्शक, आदर्श वाटली. १९६२ मध्ये धाडसाने पुढे उचललेले पाऊल भैय्या वैद्यांच्या डोळस, हुकमी नेतृत्वामुळे, द्रष्टेपणामुळे, कल्पकतेमुळे पुढे पुढेच पडत राहिले. नवनवीन कल्पना, योजना, प्रयोग आणि उपक्रम यांच्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांना आकर्षित केले. पालकांना दिलासा, विश्‍वास दिला. सहकार्‍यांना कार्यमग्न राहण्याची प्रेरणा दिली. १९६२ मध्ये भैय्या वैद्य यांनी शाळेचा संसार कौशल्याने सुरू केला. त्याचवेळी नुकतेच लग्न झाल्याने सहधर्मिणी म्हणून जीवनात आलेल्या वसुंधरेवर घरच्या  संसाराची जबाबदारी सूज्ञपणे टाकली. वसुंधराताईंनी आपल्या या ध्यासवेड्या पतीला साथ दिली. प्रारंभीची आठ वर्षे भैय्यांनी पगार घेतला नाही. या त्यागात घरच्यांनीही त्यांना सर्वोत्तम साथ दिली. स्पष्ट परंतु मृदुभाषी, उत्साही, प्रसन्न वृत्ती, कल्पकता, संवेदनशील मन, प्रयोग-उपक्रम शीलता, नवनवीन कार्यात झोकून द्यायची सहजता ही त्यांची वैशिष्ट्ये होती. विद्यार्थ्यांना गुणदोषांसकट स्वीकारून त्यांच्यातील नैराश्य, मरगळ घालवत त्यांना आनंददायी शिक्षणानुभव, जीवनानुभव देत उमलवणे, स्वयंअध्ययन करायला प्रवृत्त करणे, सहकार्‍यांना प्रयोगासाठी स्वातंत्र्य देणे यामुळे आपटे प्रशाला अल्पावधीतच नावारूपाला आली. गुणग्राही वृत्ती, मित्र जोडण्याची कला, पेशावर उदंड प्रेम, अध्यापन कौशल्य, प्रभावी नेतृत्व आणि सामाजिक जाण या गुणांमुळे हातून नेत्रदीपक कार्य घडले शिवाय त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले. त्यांनी अहर्निश झपाटून, सपाटून कार्य केले. त्यांचे कार्य महाराष्ट्रात विस्तारले.

      ‘धडपड व्यासपीठ’, ‘आचार्यकुल’, ‘पालक शिक्षक संघ’, ‘पुणे म.न.पा. शिक्षण मंडळ’, ‘बालकुमार साहित्य संस्था’, ‘ज्ञानदा प्रतिष्ठान’, ‘ज्ञानेश्‍वर विद्यापीठ’, ‘किशोर मित्र’, ‘महाराष्ट्र राज्य गणित महामंडळ’ अशा कितीतरी संस्थांशी आपल्या कार्यशीलतेमुळे त्यांनी कायमचे नाते जोडले. शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान मोलाचे आहे.

      गणित, शास्त्र आणि शिक्षण या विषयांवर ३०० हून अधिक लेख, पन्नास पेक्षा जास्त पुस्तकांचे लेखन  त्यांनी केले. ‘शेवग्याच्या शेंगा’, ‘नापासांची शाळा’, ‘कथा ही विज्ञानस्फूर्ती’ची इ. पुस्तके खूपच गाजली. एन्. सी. ई. आर. टी. दिल्ली तर्फे घेतल्या जाणार्‍या निबंध स्पर्धेत (शिक्षकांसाठी) त्यांच्या निबंधांना लागोपाठ दोन वर्षे पारितोषिके मिळाली. (१९६७, १९६८) भैय्या वैद्य यांच्या शिक्षणक्षेत्रातील भरीव, नेत्रदीपक कार्यासाठी त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार - शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च राष्ट्रपती पुरस्कार (५ सप्टेंबर १९८५) देऊन खास गौरवण्यात आले.

       पु.ग.वैद्य हे विद्या महामंडळ आणि आपटे प्रशालेची शान वाढवणारे,तळागाळातील मुलांना, उपेक्षित मुलांना फुलविण्यासाठी नित्य तत्पर असणारे, अनेक सामाजिक संस्थांना आपल्या सर्वोत्तम सहकार्याने आधार-दिलासा देणारे, सर्वांना आपले वाटणारे, कुशल संघटक, प्रेरक मार्गदर्शक होते.

- ललिता गुप्ते

वैद्य, पुरूषोत्तम गणेश