Skip to main content
x

इराणी, मेरवान शेरियार

अवतार मेहेरबाबा

     अवतार मेहेरबाबा यांचे मूळ नाव मेरवान शेरियार इराणी. पुणे येथे एका पारशी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील शेरियार आणि आई शिरीन हे आध्यात्मिक वृत्तीचे होते. मेरवान यांचे शालेय शिक्षण पुण्यातील एका खेड्यात झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते डेक्कन महाविद्यालयात दाखल झाले. त्यांना त्यांच्या तरतरीत आणि उमद्या स्वभावामुळे त्यांचे मित्र ‘बिजली’ या नावाने संबोधत. त्यांनी बालवयातच ‘कॉस्मोपोलिटन क्लब’ची स्थापना केली होती. या क्लबमार्फत निधी उभारून त्याचा विनियोग जागतिक आपदस्थितीतील धर्मादायासाठी होत असे. मेरवान उत्तम कविता करीत, सुरेल गात. त्यांना अनेक भाषा अवगत होत्या. ते क्रिकेटही उत्तम खेळत. हाफिज, शेक्सपियर, शेली हे मेरवान यांचे आवडते साहित्यिक होते.

     एकोणीस वर्षांचे असताना, त्यांच्या आयुष्याला एक आगळे वळण मिळाले. महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकत असताना त्यांना एक मुस्लिम साध्वी, हजरत बाबाजान भेटल्या. त्या साध्वीने मेरवान यांच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि आशीर्वाद दिले. त्या क्षणापासून मेरवान यांना पुढील मार्गक्रमणेचे संकेत मिळाले. त्यांनी आपल्या ऐहिक जीवनाला रामराम ठोकला आणि साध्वी बाबाजान यांच्यासह अनेक तीर्थस्थानांना आणि आध्यात्मिक गुरूंना भेटी दिल्या. नागपूरचे हजरत ताजुद्दीनबाबा, केडगावचे नारायण महाराज, शिर्डीचे साईबाबा आणि साकोरीचे उपासनी महाराज यांच्या सान्निध्यात, त्यांच्या कृपा प्रसादाने आणि विचारांंनी मेरवान यांच्याही व्यक्तिमत्त्वात आध्यात्मिक जागरण जोमाने सुरू झाले. उपासनी महाराजांकडे सात वर्षे साधना केल्यानंतर वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी त्यांचेही अनुयायी तयार होऊ लागले. त्यांच्या अनुयायांनी त्यांना ‘मेहेरबाबा’ असे नामाभिधान दिले. १९२२ साली त्यांनी मुंबईत ‘मंजिल-ए-मीम’ या आश्रमाची स्थापना केली. तेथेच ते आपल्या अनुयायांना, ज्यांना मंडळी म्हणत, प्रवचने आणि उपदेश करीत. काही वर्षांतच त्यांच्या अनुयायांनी अहमदनगर जवळील खेड्यात मेहेरबाबांचा आणखी एक आश्रम उभा केला. पुढे त्या ठिकाणाचे नाव मेहेराबाद असे करण्यात आले. या मेहेराबाद गावात १९२४ साली त्यांनी ‘प्रेम आश्रम’ नावाची शाळा उभी केली. भारत आणि इराणमधील मुले या शाळेत शिकण्यास दाखल होऊ लागली.

     केवळ भारतातच नव्हे, तर परदेशात, विशेषत: अमेरिका, इंग्लंड, हॉलंड, ऑस्ट्रेलिया अशा देशांत त्यांचे अनुयायी तयार झाले. त्या काळी परदेशी आध्यात्मिक क्षेत्रात अमली पदार्थांचा वापर सढळपणे होत असे. मेहेरबाबांनी या प्रकारावर विरोध व्यक्त केला. ‘गॉड इन ए पिल?’ अशा मथळ्याचे परिपत्रक काढून ‘अमली पदार्थांच्या सेवनाला देवाची परवानगी असेल तर देवाचे मोठेपण ते कसले?’, असा प्रश्न विचारून त्यांनी पाश्चिमात्य राष्ट्रांत आपली छाप पाडली. त्यामुळेच अमेरिकेतील हॉलिवुड चित्रनगरीतील कलावंत, साहित्यिक, विचारवंत, राजकारणी त्यांच्या पुरोगामी विचारांनी प्रभावित झाले. त्यातूनच अमेरिकेतील मायट्रल बीच या साउथ कॅरोलिना भागात ‘मेहेर स्पिरिच्युअल सेंटर’, तसेच ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे ‘अवतार्स अ‍ॅबोर्ड’ हे आश्रम स्थापन करण्यात आले. १९३१ साली ‘राजपुताना’ या बोटीतून ते प्रथम इंग्लंडला रवाना झाले होते. याच बोटीतून महात्मा गांधी देखील दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी निघाले होते. जगभरातील अनेक देशांत झपाटल्यागत हिंडून त्यांनी आध्यात्मिक प्रेरणा देण्याचे काम केले.

     दगड, धातू, वनस्पती, जंतू, मासे, पक्षी, प्राणी आणि माणूस यांच्यात आत्म्याची रूपे असतात आणि आत्म्याची अंतिम पायरी माणसामध्ये असते असे ते मानीत. त्यांच्या मते, साधारणपणे दीड हजार वर्षांनंतर पृथ्वीवर देवाचे अवतार बदलत असतात. झरतृष्ट्र, राम, कृष्ण, बुद्ध, येशू आणि मुहम्मद हे अवतारच होते असे ते मानीत. दोनदा मोटार अपघात झाल्यामुळे मेहेरबाबांच्या हिंडण्या-फिरण्याला मर्यादा आली. त्यांनी आपल्या पाश्चिमात्य अनुयायांना दर्शनासाठी भारतात बोलावले, ‘द इस्ट-वेस्ट गॅदरिंग’च्या निमित्ताने. या मेळाव्यात त्यांनी अमली पदार्थांच्या सेवन करण्यावर सडकून टीका केली.

     १० फेब्रुवारी १९५४ रोजी त्यांनी स्वत:ला उत्तर प्रदेशातील मेहेरस्थान येथे ईश्वराचा अवतार म्हणून जाहीर केले आणि ते ‘अवतार मेहेरबाबा’ या नावाने ओळखले जाऊ लागले. तेव्हापासून ‘अवतार मेहेरबाबा की जय’ हे घोषवाक्य देखील बनले.

     १० जुलै १९२५ पासून मेहेरबाबा यांनी मौनव्रत स्वीकारले. अवतार मेहेरबाबा यांनी विपुल धर्मादाय केला. कुष्ठरोग्यांसाठी आश्रयस्थाने स्थापिली. गरीब आणि मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तींसाठी मदतकार्य केले. आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी मौनव्रत सुरू ठेवले होते.

     मेहेरबाबांनी लिहिलेल्या ‘ओ परवरदिगार’, ‘पश्चात्तापाची प्रार्थना’, ‘प्रिय परमेश्वरा’ या प्रार्थना आजही त्यांचे भक्तगण म्हणत असतात. दर महिन्याच्या १२ तारखेला मेहेराबाद, अहमदनगर येथे धुनी प्रज्वलित केली जाते आणि भक्तगण तेथे मनोकामनांसाठी प्रार्थना करीत असतात. पाश्चिमात्य प्रसिद्ध संगीतिकांमध्येही अवतार मेहेरबाबांच्या प्रार्थना, विचार प्रतिबिंबित झालेल्या आढळतात. ‘बाबा ओ रिली’, ‘हू कम फर्स्ट’ ही काही अल्बमची नावे, ज्यांत मेहेरबाबांचे गुणगान गायिले आहे. ‘देअर ईज अ हार्टेक फॉलोइंग मी’ हे गीत त्यांना फार आवडत असे. मेहेरबाबांनी जगभर दिलेल्या प्रवचनांचे लिखित स्वरूप ‘मेहेरबाबांची प्रवचने’ म्हणून पाच खंडांत उपलब्ध आहेत. ३१ जानेवारी १९६९ रोजी अवतार मेहेरबाबा यांनी मेहेराबाद, अहमदनगर येथेच जगाचा निरोप घेतला.

 — संदीप राऊत

इराणी, मेरवान शेरियार