जेधे, बाबूराव मारुती
सुप्रसिद्ध कान्होजी जेधे यांच्या इतिहासप्रसिद्ध घराण्यात बाबूराव मारूतीराव जेधे यांचा जन्म झाला. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्याच्या कारी गावाचे ते गावकरी. पुणे येथे ते स्थायिक झाले. जेधे कुटुंबियांचा पितळी भांड्यांचा व समयांचा कारखाना अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध होता. अप्पासाहेबांनी इ. स. १९१४ पासूनच सार्वजनिक कार्यात भाग घेण्यास सुरुवात केली. सत्यशोधक चळवळीचे ते कार्यकर्ते होते. श्री शिवछत्रपतींचा शिवाजीनगर (भांबुर्डे) पुणे येथे अश्वारुढ पुतळा बसविण्यात त्यांनी हिरिरीने भाग घेतला. ‘अखिल महाराष्ट्र पाटील परिषदे’चे ते संघटक होते.
पुण्यातील ‘श्री शिवाजी मराठा सोसायटी’, ‘अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद’, ‘श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल’, ‘ताराबाई बोर्डिंग’, ‘मराठा वसतिगृह’, ‘श्री शाहू मंदिर महाविद्यालय’ या वेळोवेळी निघालेल्या संस्था भरभराटीस आणण्यात प्रामुख्याने अप्पासाहेबांचे योगदान आहे. या संस्थांवर सचिव, खजिनदार इत्यादी नात्याने अप्पासाहेब अनेक वर्षे कार्यरत होते.
गुरुवर्य बाबूराव जगताप यांच्या शैक्षणिक कार्याला अप्पासाहेबांनी मनापासून साथ दिली. ‘शेतकरी कामकरी पक्षा’ची स्थापना व वाढ करण्यात अप्पासाहेबांचा सिंहाचा वाटा होता. आपले धाकटे बंधू केशवराव तथा तात्यासाहेब जेधे यांच्या राजकीय कार्यास त्यांच्या मागे राहून अप्पांनी संपूर्ण व सर्वस्वी साहाय्य केले. भलेमोठे कुटुंब सांभाळले. ‘मराठा भांडीवाले धर्मशाळा, पुणे’ या संस्थेस सर्वतोपरी मदत केली. सर्व जातींच्या गरीब विद्यार्थ्यांना वेळोवेळी मदत केली. १९६१ मध्ये पूरग्रस्तांना कपडे व राहण्याची व्यवस्था केली. ग्रामीण विद्यार्थी चळवळीस व विद्यार्थी मंडळांना त्यांचे सहकार्य वेळोवेळी मिळे.
थोडक्यात बाबूराव जेधे यांच्याविषयी असे म्हणता येईल, की ते जरी प्रतिष्ठित घराण्यातील असले तरी त्यांना बहुजन समाजाविषयी आंतरिक कळवळा होता. त्यांनी आयुष्यभर गोरगरिबांच्या व गरजू विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. त्या काळात जे तरुण (बाबूराव जगताप इ.) बहुजन समाजाला शिक्षण मिळावे म्हणून धडपडत होते. त्यांना समाजाकडून पैसा मिळवून देण्याचे, जमिनी उपलब्ध करून देण्याचे महत्वाचे कार्य त्यांनी केले.
शाहू मंदिरासाठी पार्वतीरमणाची जमीन मिळविण्यात अप्पासाहेबांचा प्रमुख सहभाग व प्रयत्न होते. त्यांचे प्रतिष्ठित घराणे व त्यांची तळमळ पाहून त्यांना धनिकांकडून सहज मदत मिळे, त्या मदतीचा विनियोग शिक्षणकार्यासाठी केला जाई. त्यांच्या ‘शिवाजी मराठा सोसायटी’ व ‘अखिल भारतीय शिक्षण परिषदे’तील निरपेक्ष कार्याची दखल घेऊन शुक्रवार पेठेतील महाविद्यालयाला समाजभूषण अप्पासाहेब जेधे यांचे नाव देण्यात आले आहे.
- प्रा. राजकुँवर गं. सोनवणे