Skip to main content
x

जोशी, गोविंद नारायण

भावसंगीताच्या क्षेत्रात आरंभीच्या काळात ज्या कलाकारांनी पायाभरणीचे काम केले, त्यांपैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे जी.एन. (गोविंद नारायण) जोशी.
गोविंद नारायण जोशी यांचा जन्म खामगाव येथील एका सुशिक्षित कुटुंबात
  झाला. जोशींना उंच पट्टीच्या, खणखणीत, पण गोड आवाजाची निसर्गदत्त देणगी लाभली होती. गळ्यात सहज फिरत, चापल्य होते व शब्दोच्चारही सुस्पष्ट होते. त्यांचे वडील नारायण महादेव ऊर्फ अप्पासाहेब जोशी हे खामगावामधील नामांकित वकील होते. त्यांच्या शेजारीच नाटककार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर राहत. त्यामुळे तेथे अनेक कलाकार, साहित्यिकांची नित्य वर्दळ असे. या कारणाने लहान वयातच जी.एन. जोशींना मास्तर कृष्णराव, मास्टर दीनानाथ, इ. अनेक दिग्गज कलाकारांचा सहवास मिळाला.
खामगावला त्यांच्या वाड्यातच बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांच्या परंपरेतील रामभाऊ सोहोनी यांनी गायनवर्ग सुरू केला व सोहोनींकडे जोशींचे पायाभूत संगीतशिक्षण झाले. पुढे ते शिक्षणाच्या निमित्ताने पुण्यास फर्ग्युसन महाविद्यालयात आले. त्यांनी या वास्तव्यात मिराशीबुवा, कृष्णराव पंडित, बापूराव केतकर, इ. कलाकारांना ऐकले. बालगंधर्वांनी आपल्या गायन-अभिनयाने १९२६-२७ च्या काळात साऱ्या मराठी मनावर मोहिनी पसरविली होती, त्यांचा प्रभाव जोशींवरही पडला. याच काळात ते छोट्याखानी मैफली करू लागले. त्यांनी प्रख्यात कवी हरिंद्रनाथ व कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्या ‘हारून उल् रशीद’ या नाटकाच्या एका प्रयोगात फकिराची भूमिकाही केली. नंतर नागपूरच्या मॉरिस महाविद्यालयामध्ये ते दाखल झाले व तेथे दिनकरराव पटवर्धन यांच्याकडे ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचे शिक्षण झाले.
कवी ना.घ. देशपांडे हे जोशींचे वर्गमित्र होते. त्यांनी १९२९ साली ‘शीळ’ ही कविता लिहिली आणि जोशींनी तिला चाल लावून गायला सुरुवात केली. जोशींनी १ जानेवारी १९३१ रोजी मुंबईच्या आकाशवाणीवर आपला पहिला कार्यक्रम दिला, त्यात ही कविता गायली आणि अल्पावधीतच ती लोकप्रिय ठरली. ते १९३१ साली मुंबईस राहू लागले. एका मैफलीत एच.एम.व्ही. कंपनीच्या रमाकांत रूपजींशी ओळख झाली व त्यांनी या तरुण गायकाचे कसब लक्षात घेऊन त्यांच्याकडून पहिल्याच बैठकीत १४ गाणी ध्वनिमुद्रित करून घेतली.
जोशी यांच्या आवाजात १९३२ साली ‘रानारानात गेली बाई शीळ’ (कवी ना.घ देशपांडे), ‘डोळे हे जुल्मी गडे’ (कवी भा.रा. तांबे), ‘प्रेम कोणीही करेना’ (कवी माधव ज्युलिअन) अशी भावगीते, तसेच राग नंद, ‘जाके मथुरा’ व ‘गोरी धीरे चलो’ असे दादरे, यांच्या ध्वनिमुद्रिका एच.एम.व्ही.ने काढल्या. त्या कमालीच्या लोकप्रिय ठरल्या व जोशींचे नाव एक भावगीत गायक म्हणून मराठी, पारशी, गुजराती समाजात गाजू लागले. त्यांनी १९३३ साली ‘तुळसीदास’ या बोलपटातही मुख्य भूमिका व गायन केले. त्यांनी १९३६ साली आफ्रिकेत चार महिन्यांचा, ५० मैफलींचा यशस्वी दौरा केला. रागदारी व ठुमरीच्या ढंगाची त्यांनी गायलेली भावगीते त्या काळात खूप गाजली व त्यामुळे भावगीत गायनास विलक्षण लोकप्रियता मिळाली.
‘मोही जनास’ - कवी अज्ञातवासी (१९३४ ), ‘प्रिय जाहला कशाला’, ‘माझ्या फुला उमल जरा’ -कवी विठ्ठलराव घाटे (१९३६), ‘मंजूळ वच बोल’ (लीला लिमयेसह), ‘चल रानात सजणा, ‘जादुगारिणी सखे साजणी’ - कवी स.अ. शुक्ल (१९३९), ‘कन्हैया दिसशी किती साधा’ - कवी स.अ. शुक्ल (१९४०), ‘नदी किनारी, फार नको वाकू’ - कवी ना.घ. देशपांडे (१९४१) अशी त्यांची अनेक भावगीते विलक्षण गाजली.
त्या काळात ख्यालगायकीचे मराठीतील प्रतिरूप शोभतील अशी चीजवजा पदेही जोशींनी गायली. त्यात त्यांच्या गळ्याची तयारी, ख्यालगायकीतील लकब जाणवते. उदा. ‘गोड गोड मुरली वाजवी’ (तिलंग), ‘उगाच रुसवा’ (काफी), ‘वसुंधरा ही सुंदरा’ (बहार), ‘कान्हा तव बासरी’ (पटदीप), ‘बावरी संभ्रमा’ (मिश्र देस), ‘या तारका’ (मालकंस).
कवी स.अ. शुक्ल यांची ‘चकाके कोर चंद्राची’ व ‘तू तिथे अन् मी इथे’ ही दोन युगुलगीते तेव्हाच्या गांधारी, नंतर गंगूबाई हनगल यांच्यासह जी.एन. जोशींनी गायली. तसेच अभंग, अंगाईगीत, कव्वाली, गझल असेही गीतप्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले. कवी यशवंत यांची ‘आई’ ही कविता, माधव जूलिअन यांची ‘संगमोत्सुक डोह’ (आठ कडव्यांची दीर्घ कविता),
    ना.घ. देशपांडे यांची ‘अंतरीच्या गूढगर्भी’ अशा गाजलेल्या मराठी कवितांचे गायनही त्यांनी केले. ते खऱ्या अर्थाने काव्यगायन होते, त्यांची गायकी शब्दप्रधान होती.
काव्य सादर करताना चालींत सुंदर हरकती, छोट्याच व दाणेदार ताना, रागमिश्रणे असत. त्यांच्या या भावगीतगायनावर ख्याल, ठुमरी व नाट्यसंगीताचा प्रभाव होता; पण या शैलींना त्यांनी फार कल्पकतेने शब्दप्रधान
  गीत  मांडण्यासाठी  वापरले. गीतात मुखडा तालासह गायचा व अंतऱ्यांना विनाताल, मोकळेपणाने  पेश  करायचे  हा  गझलमधील  ढंगही त्यांनी प्रभावीपणे वापरला. त्यांनी लोकसंगीत व भजनाचाही बाज वापरला.
जी.एन. जोशी यांचे रूढ शिक्षण बी.ए.,एलएल.बी. असे झाले असले, तरी त्यांनी वकिली व्यवसायात न गुंतता आपली कारकीर्द गायक म्हणूनच गाजवली. त्यांनी १ जून १९३८ ते ३१ मार्च १९७० या काळात एच.एम.व्ही. कंपनीत ध्वनिमुद्रण अधिकारी म्हणूनही महत्त्वपूर्ण कार्य केले. कलाकारांची मिजास सांभाळून, त्यांना खूष करून त्यांच्याकडून उत्तम कलाविष्कार ध्वनिमुद्रित करून घेण्याचे कसब जी.एन. जोशींकडे होते. त्यांच्या पुढाकारामुळे कित्येक कलाकारांनी ध्वनिमुद्रणासाठी मान्यता दिली व अनेक महान कलाकारांची अद्भुत कला ध्वनिमुद्रणांच्या रूपाने उपलब्ध करून देण्याचे श्रेय जोशींना द्यावे लागते.
गोविंद जोशींनी ‘स्वरगंगेच्या तीरी’ (१९७७, मुंबई) हे ‘स्वानुभवकथन’ करणारे पुस्तक लिहिले. या पुस्तकात जोशींनी स्वतःचे सांगीतिक आयुष्य रेखाटले, शिवाय एच.एम.व्ही. कंपनीतील कारकिर्दीत अनेक कलाकारांचे आलेले अनुभवही शब्दबद्ध केले.
त्यांच्या या लेखनात सहजसोपी, पण नर्मविनोदी भाषा आहे व त्यातून त्यांचे एक व्यक्ती व गायक म्हणून असणारे अनेक पैलू उलगडत जातात. या पुस्तकाचे इंग्लिशमध्ये ‘डाउन मेमरी लेन’ (१९८४) या नावाने प्रकाशन झाले. खास करून विदेशी अभ्यासकांना भारतीय संगीताची तोंडओळख व्हावी या उद्देशाने त्यांनी ‘अंडरस्टॅण्डिंग इंडियन म्युझिक’ हेही पुस्तक लिहिले होते.
मुंबईत असताना गोविंद जोशी यांना आग्र घराण्याच्या गायकीसाठी जगन्नाथबुवा पुरोहित यांचेही मार्गदर्शन लाभले. त्यांनी मैफलींच्या निमित्ताने ब्रिटन (१९७०), अमेरिका व कॅनडा (१९७२-७३) असे परदेश दौरेही केले. त्यांचे मुंबई येथे निधन झाले.
जी.एन. जोशींच्या जन्मशताब्दीनिमित्त २००९ साली अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, तसेच त्यांच्या ‘स्वरगंगेच्या तीरी’ या पुस्तकाची वाढीव आवृत्ती प्रसिद्ध झाली, तसेच एच.एम.व्ही. कंपनीनेही त्यांच्या गायनाच्या दोन ध्वनिचकत्यांचा संच प्रकाशित केला.

चैतन्य कुंटे

जोशी, गोविंद नारायण