Skip to main content
x

जोशी, कांतिलाल डुंगरजी

     कांतिलाल डुंगरजी जोशी ह्यांचे जन्मगाव राजस्थानमधील कुशलगढ. याच गावात त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. १९२६ मध्ये वडिलांनी कांतिलालजींना पुढील शिक्षणासाठी अहमदाबादला पाठविले. १९३० मध्ये महात्मा गांधीजींच्या सत्याग्रहात भाग घेण्यासाठी त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण सोडून दिले. पण पुढच्याच वर्षी गुजरात महाविद्यालयामधून ते बी. ए. झाले. त्यानंतर ते मुंबईला आले.  १९३६ मध्ये अर्थशास्त्र, इतिहास, राजनीती हे विषय घेऊन त्यांनी एम.ए. पदवी संपादन केली. १९३७ च्या सुमारास त्यांनी बंबई (मुंबई) प्रांतीय राष्ट्रभाषा प्रचार सभेची स्थापना केली व जीवनभर मोठ्या निष्ठेने राष्ट्रभाषा प्रचाराचे कार्य ते करीत राहिले. त्या काळी त्यांना उत्तम पगाराची नोकरी मिळून सुखात, चैनीत जगता आले असते. पण ध्येयनिष्ठ तरूण कांतिलालजी अशा कोणत्याही प्रलोभनाला बळी पडले नाहीत. कांतिलाल हिंदीचे जातिवंत शिक्षक, कट्टर समर्थक होते. इंग्रजीचे वर्चस्व असलेल्या वातावरणात त्यांनी आपल्या सौम्य स्वभावाने, अखंड सेवाव्रताने पन्नास वर्षांत जवळपास एक हजार प्रचारक तयार केले. दोन हजार राष्ट्रभाषा प्रचार केंद्रे स्थापन केली. त्यातून लाखो किशोर-किशोरी, युवक-युवती हिंदी शिकले. हजारोजण ‘राष्ट्रभाषा कोविद,’ ‘राष्ट्रभाषा रत्न’ झाले.

      कांतिलाल केवळ शिक्षक वा प्रचारक नव्हते, तर ते उत्तम संघटक होते. छात्रोपयोगी पाठ्यपुस्तकांचे लेखक व संपादक होते. ‘हमारी राष्ट्रभाषा पाठावलि’, ‘राष्ट्रभाषा प्रबोधिनी’, ‘सरल हिंदी व्याकरण’ ही त्यांची पुस्तके अनेक दशके भाषा, संस्कृतीच्या माध्यमातून मुलांवर चारित्र्यनिर्मितीचे संस्कार करीत राहिली. त्यांच्या रचनात्मक कार्यामुळे त्या वेळचे उत्तर प्रदेशचे राज्यपाल श्री. क. मा. मुन्शी ह्यांनी त्यांना एका महाविद्यालयाचे निबंधकपद देऊ केले होते. पण विराट मुंबई नगरीत राष्ट्रभाषेच्या प्रचार प्रसार कार्याला वाहून घेतलेल्या कांतिलाल यांनी हे निमंत्रण अत्यंत विनयपूर्वक नाकारले.

      महात्मा गांधींजींचे कट्टर अनुयायी असूनही, त्यांचा अरबी व देवनागरी अशा दोन लिपींचा आग्रह त्यांनी स्वीकारला नाही. देशाच्या व्यापक हितासाठी देवनागरीच उपयोगी आहे, असा कांतिलालजी यांचा ठाम विश्वास होता. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या हिंदी भाषेच्या प्रचारार्थ केलेल्या समर्पित सेवेसाठी महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे सन्मानपत्र व पद्मश्री अनंत गोपाळ शेवडे हिंदी सेवा पुरस्कार प्रदान करून कांतिभाईंचा सत्कार केला. हिंदी साहित्य संमेलन (प्रयाग) यांनी ‘विद्यावाचस्पती’ ही पदवी व ताम्रपत्र देऊन त्यांना गौरविले. बंबई प्रांतीय राष्ट्रभाषा प्रचार समितीने कांतिलालजींना अमृत महोत्सव वर्षात ‘स्मृतिचिन्ह’ देऊन  सन्मानित केले.

- वि. ग. जोशी

जोशी, कांतिलाल डुंगरजी