जोशी, कृष्ण गोविंद
कृष्ण गोविंद जोशी यांचे शालेय शिक्षण नागपुरातील पटवर्धन विद्यालयात झाले. ते १९३०मध्ये शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी नागपूर येथील कृषी महाविद्यालयामधून १९३५मध्ये बी.एजी. पदवी प्रथम वर्गात पहिल्या क्रमांकाने मिळवली. त्यांनी त्याच महाविद्यालयात कृषि-रसायनशास्त्र विषयात ‘कुरण जमिनीवर खतांचा परिणाम’ या विषयावर संशोधन करून १९४०मध्ये एम.एस्सी. (कृषी) पदवी मिळवली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर येथे डॉ. सुब्रह्मण्यम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मलजलाच्या (स्यूएज) जमिनीचे गुणधर्म व पीक उत्पन्नावर परिणाम’ या विषयावर संशोधन केले व नागपूर विद्यापीठास प्रबंध सादर करून १९४५मध्ये पीएच.डी. प्राप्त केली.
डॉ. जोशी यांनी नागपूर येथील कृषी महाविद्यालयात नऊ वर्षे व्याख्याता म्हणून व तीन वर्षे प्राचार्य म्हणून अध्यापन कार्य केले. त्यांनी मध्य प्रदेश कृषी विभागात १९४४ ते १९५० दरम्यान कंपोस्ट विकास अधिकारी म्हणून काम केले व पशूंचे व मानवी मलमूत्र वापरून कंपोस्ट खत तयार करून शेतात वापरणे, याचे प्रसारकार्य केले. असे खत वापरण्याबाबत शेतकरी वर्गाच्याइसामाजिक गैरसमजुती दूर करण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. मध्य प्रदेश सरकारने त्यांना १९५१ व १९५२मध्ये कॅनडा अॅग्रोमिशन दौऱ्यावर , तसेच अमेरिका व जपानला अभ्यासदौऱ्यावर पाठवले. त्यांनी या दौऱ्यात मृदा संधारण, संत्रा, कापूस, गहू, भुईमूग उत्पादन, पीक संरक्षण, खतांचा उपयोग व लँडग्रँट विद्यापीठातील अध्ययन व अध्यापन कार्य यांचा अभ्यास केला व भारतात परतल्यावर आधी मध्य प्रदेश व १९५६पासून महाराष्ट्राच्या कृषी खात्यात वरिष्ठ पदावर काम करताना आपल्या ज्ञानाचा व विकसित दृष्टिकोनाचा खात्यास व कृषी अध्यापन संस्थांना फायदा करून दिला. त्यांनी जपानी भातशेतीचे खास तंत्रज्ञान, पॉवर टिलरसारखी यंत्रे छोट्या खाचरामध्ये वापरणे, तसेच मलजलाचा काटेकोर उपयोग इत्यादींचा अभ्यास केला व महाराष्ट्र राज्यात मृदा सुधारणेचे प्रयत्न केले. त्यांच्या जपान दौर्याचे फलित म्हणून खोपोली येथे जपानी पद्धतीच्या भातशेतीचे फार्म जपानी तंत्रज्ञानासह सुरू झाले. त्यांनी बायोकेमिस्ट या पदावरून बायोगॅस निर्मितीसाठी प्रयत्न व मलजलाचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्न केले. मध्य प्रदेश शासनाने प्रसिद्ध कृषितज्ज्ञ डॉ.पांडुरंग खानखोजे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या कृषी धोरण समितीचे ते सचिव होते.
महाराष्ट्र कृषी विभागात कृषी -उपसंचालक, सहसंचालक व शेवटी कृषी-संचालक म्हणून कार्य करून त्यांनी आपल्या कामाचा उत्तम ठसा उमटवला. संशोधनात रस असल्यामुळे विदर्भात मृदा संधारण करताना पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे समतल बांध न घालता उतरते व वेगळ्या धर्तीचे बांध असावेत असे सुचवले व ते मान्य झाले. भंडारा जिल्ह्यात पूर्वी मालगुजारांना पाण्याच्या तलावांची दुरुस्ती व विस्तार हक्क होते. मालगुजारी नष्ट झाल्यावर तलावदुरुस्ती न झाल्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याचा उपयोग होत नव्हता. त्यांनी हा प्रश्न शासनाकडे लावून धरला व तलावांच्या निरंतर दुरुस्तीची, तसेच सुधारित झडपा बसवून पाण्याचा सुयोग्य वापर होण्यासाठी तरतूद करून घेतली. शेतकऱ्यांना उन्नत वाणांचे व संकरित उत्तम बियाणे मिळावे यासाठी विदर्भ क्वालिटी सीड्स तसेच महाराष्ट्र सीड्स कॉर्पोरेशनच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी विनामोबदला सल्ला देऊन मदत केली. शेतकऱ्यांच्या शेतांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांचे प्रश्न सोडवून उत्पादन कार्यासाठी त्यांनी कृषी-संचालक म्हणून प्रयत्न केलेच, पण १९७२मध्ये निवृत्त झाल्यावरही त्यांचे हे कार्य सुरूच राहिले. ‘या मातीत रुजलो मी’ हे त्यांचे आत्मचरित्र कृषी क्षेत्रासाठी उद्बोधक आहे.