जोशी, लक्ष्मण बाळाजी
विसाव्या शतकातील गाढे विद्वान, प्रबोधनकार, लेखक व वक्ते म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ओळखले जातात. शास्त्रीजी हे त्यांचे रूढ नाव. वडील बाळाजी व आई चंद्रभागा. शास्त्रींजींचा जन्म धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे झाला. प्रारंभीचे शिक्षण तिथेच झाल्यानंतर वयाच्या चौदाव्या वर्षी शास्त्रीजी वाई (जि. सातारा) येथील प्राज्ञ पाठशाळेत शास्त्राध्ययनासाठी दाखल झाले. तेथील केवलानंद सरस्वती हे त्यांचे गुरू. प्राज्ञ पाठशाळा पारंपरिक पठडीतील पण काहीशा आधुनिक दृष्टीची व राष्ट्रीय बाण्याची होती. या पाठशाळेत काही काळ आचार्य विनोबा भावे हेदेखील अध्ययनासाठी राहिले होते. त्यांच्याकडूनच ते शास्त्रीजी इंग्रजी भाषा शिकले व पुढे इंग्रजी वाचन-लेखनात त्यांनी प्रभुत्वही मिळविले. परंपरागत शास्त्री-पठडी व इंग्रजीप्रधान आधुनिकता यांचा सर्जनशील मेळा शास्त्रीजी घालू शकले. शास्त्रीजींनी सुमारे बारा वर्षे या पाठशाळेत न्याय-वेदान्तादी प्राचीन शास्त्रांचे अध्ययन केले. कोलकाताच्या शासकीय संस्कृत महाविद्यालयातून त्यांनी पुढे तर्कतीर्थ ही पदवी संपादन केली (१९२३). त्यानंतर ते जन्मभर वाई इथेच राहिले व प्राज्ञ पाठशाळेचे कार्य त्यांनी पुढे चालविले. १९२७ साली त्यांचा विवाह झाला. पत्नीचे नाव सत्यवती. त्यांना दोन मुलगे व दोन मुली होत्या. महाबळेश्वर येथे तर्कतीर्थांचे निधन झाले.
महात्मा गांधीच्या नेतृत्वाखालील कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी १९३० व १९३२ साली भाग घेतला व सहा-सहा महिन्यांचा कारावासही भोगला. नंतर मानवेंद्रनाथ राय यांच्या रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टीचे ते क्रियाशील सदस्य झाले (१९३६-१९४८). त्यानंतर मात्र ते काँग्रेस पक्षाशी अनौपचारिक पद्धतीने हयातभर संबंधित होते. प्राचीन व आधुनिक ज्ञानपरंपरांचा समतोल समन्वय साधणार्या शास्त्रीजींच्या सखोल व्यासंगाला उद्देशूनच मानवेंद्रनाथ राय यांनी ‘भारतीय प्रबोधनाचे सर्वोत्कृष्ट अपत्य’ (द बेस्ट प्रॉडक्ट ऑफ इंडियन रेनेसान्स) अशा शब्दांत शास्त्रीजींचा गौरव केला.
महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाचे शास्त्रीजी हे पहिले अध्यक्ष होत. १९८० पासून पुढे निधन होईपर्यंत ते राज्यशासनाच्याच मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष व मुख्य संपादक होते.
शास्त्रीजी धर्मसुधारणावादी होते. कुकुरमुंडे येथील सनातन धर्मपरिषदेत धर्मसुधारणेचे सप्रमाण समर्थन करण्याची संधी त्यांना लाभली (१९२५). त्याच वर्षी वाराणसी येथील संस्कृत पंडित संमेलनातही त्यांनी धर्मसुधारणेची बाजू मांडली. भारताच्या राज्यघटनेचे संस्कृतमध्ये भाषांतर करण्याचे कार्यही त्यांनी केले. सोरटी सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारप्रसंगी पौरोहित्य करण्याचा मान शास्त्रीजींना लाभला (१९५१).
दिल्ली येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद शास्त्रीजींनी भूषविले (१९५४). त्यांच्या ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ या ग्रंथास साहित्य अकादमीचा व मराठीतील पहिलाच असा पुरस्कार मिळाला (१९५५). संस्कृत पंडित (१९७३), पद्मभूषण (१९७६) व नंतर पद्मविभूषण अशा सन्मान्य पदव्याही त्यांना लाभल्या.
प्राज्ञ पाठशाळेचा धर्मकोशाचा बृहत्प्रकल्प व राज्यशासनाचा सर्वविषयसंग्राहक मराठी विश्वकोशाचा महाप्रकल्प यांचे नियोजन, संपादन तथा मार्गदर्शन हे शास्त्रीजींचे अत्यंत महत्त्वाचे ज्ञानकार्य होय. धर्मकोशाची पाच कांडे (संकल्पित अकरा) व एकवीस खंड (संकल्पित चाळीस) आजपर्यंत प्रकाशित झाले आहेत. हिंदू धर्माच्या सर्व ज्ञानविषयांवरील प्राचीन प्रमाणग्रंथांतील वचने धर्मकोशात विषयावर संकलित केलेली आहेत. मराठी विश्वकोशाचे पहिले सतरा खंड व एक परिभाषासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. आधुनिक तथा प्राचीन ज्ञान-विज्ञान क्षेत्रांतील महत्त्वाच्या सर्व विषयांवर मराठी विश्वकोशात तज्ज्ञ अभ्यासकांनी नोंदी लिहिलेल्या आहेत. शास्त्रीजींचे हे दुहेरी कोशकार्य मराठी भाषा, संस्कृत भाषा, हिंदू धर्म व मराठी ज्ञान-विज्ञानवाङ्मय यांच्या दृष्टीने मोलाचे, मार्गदर्शक व ऐतिहासिक महत्त्वाचे आहे.
शास्त्रीजींचा पिंड आचार्याचा, शिक्षकाचा होता. ते स्वभावधर्माने वक्ते, प्रबोधनकार होते. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी महाराष्ट्रभर व बाहेरही अखंडपणे शेकडो भाषणे दिली व व्याख्यानमाला गुंफल्या. त्यांची बहुतेक पुस्तके ही मुळातही व्याख्याने वा व्याख्यानमाला आहेत. सर्वविषयप्रतिवादक असा चालता-बोलता ‘ज्ञानकोश’, असेच त्यांचे वर्णन करावे लागेल. एखादा अवघडसा गुंतागुंतीचा विषय सुबोधपणे स्पष्ट करणारे त्यांचे वक्तृत्व मोठे विचारप्रवर्तक असे. स्वातंत्र्योत्तर काळातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात शास्त्रीजी गुरुस्थानी होते
‘शुद्धिसर्वस्वम्’ (संस्कृत,१९३४), ‘आनंदमीमांसा’ (१९३८), ‘हिंदू धर्माची समीक्षा व सर्वधर्मसमीक्षा’ (१९४१-१९८५), ‘जडवाद’ (१९४१), ‘जोतिनिबंध’ (१९४७) ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ (१९५१) ‘आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा व रससिद्धान्त’ (१९७३), ‘विचारशिल्प’ (निवडक लेख, संपादक प्रा.रा.ग. जाधव), ‘राजवाडे लेखसंग्रह’ (संपादित, १९६४), ‘लोकमान्य टिळक लेखसंग्रह’ (संपादित, १९६९), ‘लेखसंग्रह-खंड पहिला’ (१९८२-१९९४), ‘आद्य शंकराचार्य : जीवन आणि विचार’ (संपादन-अरुंधती खंडकर, १९९७).
‘वैदिक संस्कृतीचा विकास’ (तिसरी आवृत्ती) या सुमारे सहाशे पृष्ठांच्या बृहद् ग्रंथात सहा व्याख्यानांची सहा प्रकरणे आहेत. वेदकालीन संस्कृतीपासून आधुनिक भारतातील सांस्कृतिक आंदोलनापर्यंत या मीमांसेचा व्यापक पट आहे. इतिहास-पुराणे, रामायण, बौद्ध व जैन यांचा धर्मविजय हे महत्त्वाचे सांस्कृतिक टप्पे त्यात आहेत. या ग्रंथाच्या दुसर्या आवृत्तीत शास्त्रीजींनी खूप भरही घातली आहे. ‘विद्यमान भारतीय संस्कृतीच्या वैचारिक सामर्थ्याचे मूळ अधिष्ठान वैदिक संस्कृती आहे,’ हे या ग्रंथातील मुख्य प्रमेय आहे. या ग्रंथाचा इंग्रजी अनुवादही झाला आहे.
शास्त्रीजींनी मार्क्सवादी चिकित्सा पद्धतीने १९४१ साली हिंदू धर्माची समीक्षा केली. पण त्या चिकित्सा पद्धतीच्या मर्यादा लक्षात आल्यानंतर मग स्वतंत्रपणे व्यापक दृष्टीने वैदिक संस्कृतीची मीमांसा केली. ‘हिंदुधर्मसमीक्षा व सर्वधर्मसमीक्षा’ (१९८५) या पुस्तकात शास्त्रीजींच्या दृष्टीकोनातील बदलाचे दर्शन घडते. शास्त्रीजींनी करून दिलेली जडवादाची ओळख, आद्य शंकराचार्यांच्या जीवनकार्याचे स्वतंत्रपणे व समतोलपणे घडवलेले दर्शन आणि रससिद्धान्ताविषयीचे विचार या सर्वांतून शास्त्रीजींचे समतोल, समन्वयशील व ऐतिहासिक मर्मदृष्टीशी सुसंगत असे विशाल सांस्कृतिक परिप्रेक्ष्य लक्षात येते. इतिहासाचार्य राजवाडे व लोकमान्य टिळक यांच्या लेखसंग्रहांच्या प्रस्तावना म्हणजे प्रज्ञावंत सांस्कृतिक धुरीण. त्यांचा कालखंड व त्यांचे कार्य यांना समन्वितपणे व समग्रपणे कसे समजावून घ्यावे व द्यावे, याचा वस्तुपाठच आहेत. शास्त्रीजींच्या पुरोगामी विवेकबुद्धीची प्रचिती त्यांच्या ‘जोतिनिबंधां’तून येऊ शकते.
‘लेखसंग्रह’- खंड पहिला (पृष्ठे ५९०-१९८२) हा ग्रंथराज शास्त्रीजींच्या विशाल सर्वांगीण ज्ञानसंचिताचे विस्मित करणारे दर्शन घडवतो. वैज्ञानिक व ऐतिहासिक भौतिकवाद, भारतीय संदर्भातील धर्म व समाज आणि भारतीय तत्त्वज्ञान अशा तीन विभागांतील या लेखसंग्रहात एकूण ६७ लहानमोठे विवेचक लेख आहेत. यातील अनेक लेख मुळात विश्वकोशासाठी म्हणून लिहिलेले आहेत. आधुनिक पश्चिमी संस्कृतीच्या अधिष्ठानी असलेला भौतिकवाद व भारतीय संस्कृतीच्या अधिष्ठानावर असलेला अध्यात्मवाद या दोन ध्रुवांमधील मनुष्य संस्कृतीच्या अवकाशातील सगळे प्रश्नोपप्रश्न शास्त्रीजींनी इथे चिकित्सापूर्वक स्पष्ट केले आहेत. या प्रज्ञावंत मीमांसकाच्या अवघ्या ज्ञानोपासनेचे मुख्य विधान म्हणजे हा लेखसंग्रह होय.
शास्त्रीजींची भाषाशैली सुबोध पण सप्रमाण विचारप्रतिपादन ठामपणे करणारी आहे. त्या शैलीला प्रचंड बौद्धिक व्यासंगाची व आत्मविश्वासाची बैठक आहे. मराठी गद्यातील विचारसौंदर्याचा तो एक नमुना होय.
शास्त्रीजी हे आधुनिक भारताच्या अभूतपूर्व प्रबोधनयुगाचे सर्वोत्कृष्ट अपत्य होतेच होते; पण त्याचबरोबर ते स्वतंत्र नवभारताच्या सांस्कृतिक पुनर्रचनेचे एक द्रष्टे भाष्यकारही होते.
म्हणूनच आज-उद्याच्या प्रत्येक नव्या पिढीने शास्त्रीजींच्या ग्रंथरूप वारशाचे वाचन-मनन केले पाहिजे, कारण त्यांच्या ग्रंथरूप वाग्यज्ञाची प्रस्तुतता कायम टिकणारी आहे.