Skip to main content
x

झाकीर, हुसेन

.झाकीर हुसेन यांचा जन्म मुंबईत झाला. पंजाब घराण्याचे खलिफा उ. अल्लारखा यांचे ते सुपुत्र आणि शिष्य आहेत. पंजाब घराण्याचा पारंपरिक तबला, उ. अल्लारखा यांनी निर्माण केलेला तबला, त्याचबरोबर त्यांची वादन करण्याची कलात्मक शैली, या सगळ्यांची तालीम उ. झाकीर हुसेन यांना बालवयातच आपल्या वडिलांकडून मिळाली. प्रखर बुद्धिमत्ता आणि कठोर रियाझ यांच्या साहाय्याने उ. झाकीर हुसेन वयाच्या बाराव्या वर्षीच आपल्या पिताश्रींचा तबला प्रस्तुत करू लागले.

त्यांना बालपणी तबलावादक उ.अहमदजान थिरकवा यांचा सहवास आणि मार्गदर्शन प्राप्त झाले. या सहवासामुळे उ.झाकीर हुसेन यांना लखनौ - फरूखाबाद घराण्यांच्या भाषाप्रधान तबल्याशीही ओळख झाली. हळूहळू त्यांचे वादनविषयक विचार अधिक सखोल आणि व्यापक झाले.

उ. झाकीर हुसेन यांचे वादन अधिक प्रगल्भ आणि परिपक्व होऊ लागले. तबल्यातील सर्व घराण्यांच्या सौंदर्यतत्त्वांचा त्यांनी अभ्यास केला असून ते वेगवेगळ्या मैफलीतून वेगवेगळ्या घराण्यांच्या बंदिशी आणि निवडक वेगवेगळी सौंदर्यतत्त्वे सादर करीत असतात. उ. झाकीर हुसेन यांची सौंदर्यदृष्टी अत्यंत संवेदनशील आणि तरल असल्यामुळे तबला आणि डग्गा या दोघांमधून मनमोहक आणि कर्णमधुर नादांची निर्मिती कशी करावी, याचा अभ्यास करून त्यांनी स्वतःचे असे एक ‘नाद-निकास’ तंत्र निर्माण केले आहे. या चित्ताकर्षक कर्णमधुर नादांच्या प्रभावाने त्यांनी जागतिक स्तरावर रसिकांची मने जिंकली आहेत; कारण त्यांनी प्रस्तुत केलेले नाद हे कलापूर्णतेने नटलेले असतातच; पण त्याचबरोबर प्रसंगानुरूप ते कधी नाजूक असतात, सशक्त असतात, तर कधी जोशपूर्ण, जोरकस असतात; आणि हीच त्यांच्या वादनाची खासियत आहे.

एकल तबलावादनात किंवा साथसंगतीत लघु- मात्राकालाच्या गणिताचा उपयोग केला असता ते वादन अनोखे असे आकर्षक रूप प्राप्त करते, हे तत्त्व ओळखून त्यांनी आपल्या वडिलांकडून, तसेच दाक्षिणात्य अवनद्ध वाद्यपटू यांच्या संगतीत व अभ्यास करून ती पद्धती आत्मसात केली. त्याचबरोबर लयीवर असामान्य प्रभुत्व असलेल्या पाश्चिमात्य चर्मवाद्यपटू (ड्रमर्स) यांच्याबरोबर वादन करताकरता त्यांच्या वादनातील बिकट लयकारीवर आणि गतिमानतेवरही उ. झाकीर हुसेन यांनी प्रभुत्व प्राप्त केले.

लयकारीवर प्रभुत्व आहे म्हणून त्याचेच प्रदर्शन करीत राहणे हे झाकीर हुसेन यांना मान्य नाही. श्रोतृवर्गाची समज पाहून ते आपला तबला सादर करतात. म्हणूनच प्रत्येक प्रकारच्या श्रोत्याला उ.झाकीर हुसेन यांचा तबला प्रोत्साहित करतो.

उ. झाकीर हुसेन यांचा ‘एकल’ तबला हा सर्वांगसुंदर असतोच आणि पेशकार, कायदा-रेला, गत-तुकडा हे सर्व वादनप्रकार ते समर्थपणे प्रस्तुत करतात. पण ‘उपज अंगाचे’ त्यांचे पेशकार वादन ही त्यांची खासियत होय. 

उ. अल्लारखा यांच्याकडून प्राप्त झालेली साथसंगतीची नवनिर्मित शैली उ. झाकीर हुसेन यांनी आत्मसात तर केलीच; पण त्याचबरोबर ती अधिक विकसित केली. गायन - बासरी सोबतची त्यांची संगत अत्यंत संयमित असते, तर सतार, सरोद आणि संतूर या वाद्यांबरोबर त्यांची साथसंगत कलात्मक लयकारीने नटलेली असते. दाक्षिणात्य पद्धतीच्या तालवाद्य कचेरीच्या कार्यक्रमात त्यांच्याच शैलीला अनुरूप असे त्यांचे वादन असते . या पार्श्वभूमीवर पाश्चात्त्य ‘ड्रम’ वादकांबरोबर ते इतके लीलया सहवादन करीत असतात, की त्यांचा तबला हा पाश्चात्त्य वाद्यवृंदाचे एक नैसर्गिक अंगच बनते. कथक नृत्यसम्राट पं. बिरजू महाराज यांच्याबरोबर वादन करताना हजरजवाबी अशी उत्स्फूर्त वादन कौशल्याची प्रचिती ते श्रोत्यांना देतात. भारतात आणि भारताबाहेर, दरवर्षी त्यांचे सुमारे दीडशे कार्यक्रम होत असतात. विविध प्रकारच्या संगीत प्रकारांमध्ये त्यांच्या पन्नासपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या आहेत. त्यांनी जागतिक स्तरावरील जॉन मॅकलॉलिन, मिकी हार्ट, बेला फ्लेक, आणि एडगर मेयेर यांच्यासह सांगीतिक कलाकृती निर्माण केल्या, त्यांची नावे अशी : १) शक्ती, २) दिगा र्‍हिदम बँड, ३) मेकिंग म्यूझिक, ४) प्लॅनेट ड्रम विथ मिकी हार्ट, ५) तबला बीट सायन्स व ६) संगम विथ चार्ल्स लॉइड अँड एरिक हारलँड. याशिवाय जॉर्ज हॅरिसन, जो हँडरसन, व्हॅन मॉॅरिसन, अ‍ॅरिटो मोरेइरा आणि इतर अनेक जागतिक स्तरावरील श्रेष्ठ कलाकारांबरोबर उ. झाकीर हुसेन यांनी संयुक्त सहवादनाचे अनेक कार्यक्रम जगभर प्रस्तुत केले आहेत.

आपले वडील व गुरू उ. अल्लारखा यांचा संगीत दिग्दर्शनाचा वारसाही उ. झाकीर हुसेन यांनी यशस्विरीत्या पुढे चालविला आहे. त्यांना १९९६ साली अटलांटा येथील ‘समर ऑलिम्पिक’ स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी प्रस्तुत केलेल्या संगीत रचनेचे सहदिग्दर्शन करण्याचा मान मिळाला होता. जागतिक स्तरावर त्यांच्या असामान्य अशा योगदानाबद्दल त्यांना इंडो-अमेरिकन पुरस्कार (१९९०), भारत आणि अमेरिकेच्या संबंधात केलेले सांस्कृतिक योगदान (१९९९), अमेरिकेतील अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘नॅशनल हेरिटेज फेलोशिप’ हा सन्मान (१९९०), भारताच्या साठाव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘जय हिंद’ या राष्ट्रीय गीताचे संगीत दिग्दर्शन करण्यासाठी भारत सरकारतर्फे उ. झाकीर हुसेन यांची निवड (२००७), ‘मॉडर्न ड्रमर अ‍ॅँड ड्रम’ या  जागतिक स्तरावरील नियतकालिकातर्फे पुरस्कार (२००७),  उ. झाकीर हुसेन व मिकी हार्ट यांनी निर्माण केलेल्या ‘प्लॅनेट ड्रम’ या सांगीतिक कलाकृतीला ‘ग्रॅमी अवॉर्ड’(२००९),  तसेच इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

उ. झाकीर हुसेन यांना भारतात ‘पद्मश्री’ (१९८८), ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार (१९९१), ‘पद्मभूषण’ (२००२), ‘कालिदास’ पुरस्कार (२००६) तसेच इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.२०१४ साली त्यांना GIMA पुरस्कारही प्राप्त झाला आहे.

सुधीर माईणकर

झाकीर, हुसेन