Skip to main content
x

झंवर, शामसुंदर गंगाभूषण

         शामसुंदर गंगाभूषण झंवर यांचा जन्म अकोला जिल्ह्यात झाला. त्यांनी १९७२ मध्ये मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातून  पशुवैद्यक पदवी (बी.व्ही.एस्सी. अँड ए.एच.) प्रथम श्रेणीमध्ये आणि १९७४मध्ये याच महाविद्यालयातून पदव्युत्तर पदवी (एम.व्ही.एस्सी.) विशेष प्रावीण्यासह प्राप्त केली. त्यांनी १९९० मध्ये दापोलीतील बा.सा.को.कृ.वि.अंतर्गत मुंबर्ई पशुवैद्यकीय महाविद्यालयातून पीएच.डी. पदवी प्राप्त केली. त्यांनी २००७ मध्ये कोलकाता येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेतून वरिष्ठ व्यवस्थापन कार्यक्रमविषयक अभ्यासक्रम यशस्वी रीतीने पूर्ण केला.

          शेळ्या व मेंढ्यांमध्ये भ्रूण प्रत्यारोपण करणार्‍या काही प्रारंभीच्या पशुवैद्यांमध्ये त्यांची गणना होते. अमेरिकेतील भ्रूण प्रत्यारोपणविषयक आंतरराष्ट्रीय संस्थेने गठित केलेल्या आरोग्य आणि सुरक्षा सल्लागार समितीचे डॉ. झंवर  सदस्य होते.

           डॉ. झंवर यांना कॅनडामधील मॉन्ट्रियल येथे आयोजित केलेल्या २३व्या जागतिक पशुवैद्यकीय मेळाव्यामध्ये व्याख्याते म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाच्या पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाने शेळ्या, मेंढ्या व ससे यांच्या विकासासाठी गठित केलेल्या केंद्रीय सल्लागार समितीचे ते सदस्य होते. केंद्र शासनाच्या नियोजन आयोगाच्या ११ व्या पंचवार्षिक योजनेच्या (२००७ ते २०१२) पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासासाठी गठित केलेल्या कार्यकारी गटाचे ते सदस्य होते. पशुसंवर्धन मेळावे आणि चर्चासत्रास उपस्थित राहण्यासाठी डॉ. झंवर यांनी ऑस्ट्रेलिया, जर्मनी, स्वित्झर्लंड, हॉलंड, फ्रान्स, इटली, अमेरिका, कॅनडा, जपान, नायजेरिया, आयर्लंड, ब्राझील, मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर व न्यूझीलंड या देशांना भेटी दिल्या.

          धुळे येथील रेमण्डच्या मेष पैदास क्षेत्रावरील आणि गोपालनगर (छत्तीसगड) येथील रेमण्डच्या भ्रूणविषयक संशोधन केंद्रावरील भ्रूण प्रत्यारोपण कार्यक्रमातील डॉ. झंवर यांच्या मार्गदर्शनामुळे सुधारित वंशावळीची शेकडो कोकरे आणि वासरे जन्मली आहेत. भारतामध्ये प्रथमच गायींमध्ये दोन व तीन भ्रूणांचे प्रत्यारोपण करून अनुक्रमे जुळे व तिळे निर्माण करणे शक्य असल्याचे सप्रमाण सिद्ध केले. त्यांनी भ्रूणाचे लिंगनिदान आणि गोठीत अवस्थेतील भ्रूणांची साठवण इ. अत्याधुनिक तंत्राचा वापर केला. महाराष्ट्र राज्यातील सहा जिल्ह्यांतील २२ गावांतील शेकडो लाभधारकांच्या मेंढ्यांमध्ये विदेशी व संकरित नरमेंढ्यांद्वारे सुधारणा घडवण्यात डॉ. झंवर यांचा विस्तारविषयक कार्यक्रम कारणीभूत ठरला. रेमण्डच्या केंद्राद्वारे कित्येक सुशिक्षित बेरोजगार युवकांना मेषपालनामध्ये प्रशिक्षण देण्यात आले. या केंद्राला मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाने पदव्युत्तर पदवी परीक्षा व पीएच.डी. पदवी मार्गदर्शन करण्यासाठी संशोधन केंद्र म्हणून मान्यता दिली आहे.

           डॉ. शाम झंवर हे सध्या रेमण्ड लिमिटेड या संस्थेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्य करत आहेत.

- संपादित

झंवर, शामसुंदर गंगाभूषण