Skip to main content
x

काळे, नानासाहेब सोनाजी

         नान्नज हे गाव पहिले पानमळ्याचे, नंतर कांद्याचे व त्यानंतर द्राक्षाचे नान्नज म्हणून प्रसिद्धीला आले. सुरुवातीस या ठिकाणी भोकरी, सिले ७ सेव्हन, पांढरी साहेबी, अनाबेशाही या जातींच्या द्राक्षाचे उत्पादन होत असे.

         नानासाहेब काळे दहावी उत्तीर्ण होते. शेतीचा अवाढव्य पसारा असल्यामुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडून शेतकीकडे वळावे लागते. शेतीमध्ये नवीन काही तरी करून दाखवावे, अशी त्यांची प्रबळ इच्छा होती आणि त्या इच्छेनुसार ते नेहमी प्रयोग करत राहिले. त्यातूनच त्यांनी १९६०मध्ये बिनबियांची ‘थॉमसन’ या जातीची प्रथम लागवड केली आणि येथूनच खऱ्या द्राक्षवाढीला सुरुवात झाली.

         काळे यांनी धाडसी स्वभाव, निरीक्षणाची व प्रयोगाची आवड व कल्पनाशक्तीमुळे थॉमसन सीडलेसचे विक्रमी उत्पादन घेतले. जिल्ह्यात प्रथम १९७४-७५ साली मोठ्या प्रमाणात पपईची लागवड केली आणि ती मोठ्या जिद्दीने, अथक परिश्रमाने यशस्वी करून दाखवली. त्यानंतर हाच प्रयोग त्यांनी कलिंगड लागवडीमध्ये केला व त्यामध्येही मोठे यश प्राप्त केले. यामुळे त्यांना विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहयोग लाभला. त्यातून द्राक्ष पिकाचा विकास होत गेला. त्यांनी १ एकर क्षेत्रावरून द्राक्षाचे क्षेत्र २५ एकरपर्यंत वाढवले. काळे यांना द्राक्ष बागेचे व्यवस्थापन करत असताना थॉमसन सीडलेसमधील एका वेलीवरील, एका काडीवर घडाचे वेगळेपण जाणवले. हा घड इतर घडांपेक्षा वेगळा व त्याचे मणीही लांबट व आकर्षक वाटले. त्यावर बारकाईने लक्ष ठेवून त्या काड्यांपासून रोपे तयार केली व त्यांची लागवड केली. त्या वेलीवरील घड लांब मण्यांमुळे मोठे आकर्षक दिसत होते. त्यावर जी.ए.चे वेगवेगळे प्रयोग केले. त्यांची निरीक्षणे घेतली. या द्राक्षाच्या मण्यांची लांबी सरासरी १॥ इंचापर्यंत होती. ब्रीक्स २२ ते २४, साल पातळ, आकर्षक रंग व घडाचे सरासरी वजन ५० ते ३०० ग्रॅम मिळाले. या वाणाची ५ एकरांमध्ये लागवड केली व त्यावर पीक असताना १९८०मध्ये त्याचा नामकरण शुभारंभ केला व या वाणास ‘सोनाका सीडलेस’ नाव दिले. हे नावदेखील सोलापूर व पिताश्री सोनाजी, गाव नान्नज व आडनाव काळे या अक्षरातून तयार केले. या वाणाची द्राक्षे जेव्हा विक्रीस गेली, त्या वेळी त्याची चव, आकर्षकपणामुळे खूपच लोकप्रिय झाली. त्यांची सोनाका सीडलेस या वाणाचे जनक म्हणून ख्याती झाली.

         याच दरम्यान महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने युरोप दौरा आयोजित केला होता. त्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला व ते युरोप दौऱ्यावर तेथील द्राक्षांचा अभ्यास करण्यासाठी गेले होते. या दौऱ्याच्या वेळी इटलीमध्ये द्राक्ष बागा पाहात असताना तेथील काळी द्राक्षे अत्यंत आकर्षक व मनमोहक वाटल्यामुळे उत्सुकतेने त्यातली १ काडी त्यांनी भारतात आणून स्वत:च्या शेतात लावली व लहान मुलाला सांभाळावे त्या पद्धतीने त्याची जोपासना करून त्याचा एक वेल तयार केला व त्या वेलीपासून आणखी काड्या काढून त्यापासून ५ एकरपर्यंत या वाणाची द्राक्ष लागवड वाढवली. तोपर्यंत या वाणावर वेगवेगळे प्रयोग करून त्यांची निरीक्षणे घेतली व त्याप्रमाणे योग्य ते बदल करून चांगल्या प्रकारे आराखडा आखून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्याचे तंत्र अवलंबले.

         काळे यांनी या द्राक्ष उत्पादनामध्ये केलेल्या कार्यामुळे त्यांना १८ ऑगस्ट १९९० रोजी वसंतराव नाईक प्रतिष्ठानचा पुरस्कार मिळाला. त्यांच्या द्राक्ष उत्पादनाच्या माहितीचा लाभ अनेक द्राक्ष बागायतदारांना मिळून त्यांच्या उत्पादनात भरघोस वाढ झाली. त्यामुळे १९८४मध्ये तत्कालीन राज्यपाल आय.एच. लतीफ यांनी बागेला भेट देऊन द्राक्ष पिकामध्ये केलेल्या कामाबद्दल कौतुक केले. शरद सीडलेसचे माधुर्य आणि आकर्षकता अधिक असल्याने ही द्राक्षे लोकप्रिय झाली. भारताबरोबरच परदेशातही मोठी मागणी होऊ लागली. द्राक्षांचे विक्रमी उत्पादन घेत असताना बर्‍याच वेळा नाउमेद न होता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने कसा वापर करता येईल, याचा विचार करून त्यांनी सर्व क्षेत्रांत ठिबक सिंचनाचा वापर केला. जमिनीतील ओल कायम राहण्यासाठी पाचटाचे बगॅसच्या आच्छादनाबरोबर भुशाचाही वापर करून योग्य प्रमाणात ओल राखता येते, हे सिद्ध करून दाखवले. त्यामुळे कमी पाण्यातही भरपूर उत्पादन घेता येणे शक्य असल्याचे त्यांनी दाखवून दिले. नानासाहेबांनी या द्राक्षवाणाचा प्रसार महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांत केला. त्याचप्रमाणे इतर प्रांतांतही हा वाण लागवडीसाठी उपलब्ध केला. तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री बलराम जाखड यांच्या हरयाणा येथील शेतामध्ये त्यांनी स्वत: जाऊन द्राक्ष लागवड केली.

- संपादित

काळे, नानासाहेब सोनाजी