Skip to main content
x

काळे, पांडुरंग नरहरी

       शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य देणाऱ्या ‘आरक्त डाळिंबा’चे जनक पांडुरंग नरहरी काळे यांचा जन्म पूर्वीच्या हैदराबाद संस्थानामधील बिदर जिल्ह्यातील भालकी या गावात झाला. त्यांचे जन्मगाव तसे सर्वार्थाने मागासलेले, पण मनात शिक्षणाची ओढ असल्यामुळे त्यांनी सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून शिक्षण घेतले. या जिद्दीमुळेच त्यांनी १९५९मध्ये सेंट्रल कॉलेज ऑफ अ‍ॅग्रिकल्चर-पुसा इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली येथून बी.एस्सी. (कृषी) ही पदवी संपादन केली. त्यांनी १९६४मध्ये  पुणे विद्यापीठामधून एम.एस्सी. (कृषी) संपादन केली आणि १९७८मध्ये पुसा इन्स्टिट्यूट येथून उद्यानविद्या या विषयावर पीएच.डी. संपादन केली.

       काळे यांनी १९६२मध्ये कृषी महाविद्यालय, पुणे येथे साहाय्यक प्राध्यापक या पदावर अध्यापनास सुरुवात केली. १९६५ ते १९७१ या काळात ते कृषी महाविद्यालय-कोल्हापूर येथे उद्यानविद्या या विभागात साहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत होते. कोल्हापूर येथे सेवेत असताना तेथील अनेक शेतकर्‍यांना फळझाडांची लागवड, भाजीपाला लागवड, फुलझाडांची लागवड याबाबत त्यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. त्यांनी १९७१मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे प्राध्यापक या पदावर कामकाजास सुरुवात केली आणि तेथेच पदव्युत्तर अध्यापक आणि संशोधक म्हणूनही काम केले. या काळात २५०० एकर माळरानावर अनेक जातींच्या फळझाडांची लागवड करून वाळवंटात नंदनवन कसे उभे करायचे, याचा आदर्श निर्माण केला. डाळिंब फळाची गुणवत्ता वाढवून डाळिंब निर्यातीचे नवे तंत्रज्ञान त्यांनी विकसित केले. या नवीन तंत्रामुळे मोठ्या प्रमाणावर डाळिंबाची निर्यात वाढून परकीय चलनात उल्लेखनीय प्रगती दिसून आली.

       डॉ. काळे यांनी २८ एम.एस्सी. (कृषी) व पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले आहे. त्यांचे संशोधनावर आधारित १५० लेख प्रसिद्ध झाले आहेत व शेतकऱ्यांसाठी फळे व भाजीपाला लागवडीबाबत ७० लेख प्रसिद्ध झाले आहेत. म.फु.कृ.वि.तर्फे त्याच्या ‘केळीची लागवड’ व ‘फळझाडांचा बहर कसा धरावा’ या दोन पुस्तिका प्रकाशित झाल्या. पुण्यातील कॉन्टिनेंटल प्रकाशनाने त्यांची ‘भाजीपाला उत्पादन’, ‘कांदा व लसूण उत्पादन’, ‘कोबीवर्गीय भाज्या’ ही पुस्तके प्रकाशित केली आणि इंडियन सोसायटी ऑफ एज्युकेशन, पुणे यांनी आंबा आणि सीताफळ लागवडीवर पुस्तिका प्रकाशित केल्या. त्यांच्या या अभ्यासपूर्ण लिखाणामुळेच अमेरिकेमधील ‘डेकर पब्लिशर’ या प्रकाशन संस्थेने ‘हँडबुक ऑफ फ्रुट सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी’ या ग्रंथासाठी लिंबू व मोसंबी वर्गीय फळझाडांच्या लागवडीपासून फलधारणेपर्यंतचे त्यांचे लेख प्रसिद्ध केले. त्यांनी आकाशवाणी व दूरचित्रवाणीवर ‘फळबाग तंत्रज्ञान’ या विषयावर अनेक वेळा व्याख्याने दिली आहेत. डॉ. काळे यांना ‘अ‍ॅस्पी’ कंपनीतर्फे कांदा लागवडीवरील संशोधनात्मक लेखासाठी प्रथम पारितोषिक (१९८५), भारतीय अनुसंधान केंद्राच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने भाजीपाला लागवडीचे विकसित तंत्रज्ञान याबद्दल सन्मानचिन्ह (१९९८), अखिल भारतीय केळी संशोधन सत्राचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल विशेष सन्मानचिन्ह (१९९३) आणि वसंतराव नाईक प्रतिष्ठान-पुसद या संस्थेमार्फत कृषी क्षेत्रातील स्पृहणीय व महत्त्वपूर्ण कामगिरीसाठी विशेष सन्मानचिन्ह, असे अनेक सन्मान  प्राप्त झाले आहेत.

       - मिलिंद कृष्णाजी देवल

काळे, पांडुरंग नरहरी