Skip to main content
x

काळे, प्रल्हाद लक्ष्मण

काळे गुरुजी

       प्रल्हाद लक्ष्मण काळे हे काळे गुरुजी म्हणून ओळखले जात. नंदुरबार हे गुरुजींचे जन्मगाव. नंदुरबारला त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. लहानपणापासूनच त्यांना व्यायामाची आवड होती. रोज अर्धा मैल दौड व नंतर तालमीत दंड, बैठका, कुस्ती असा त्यांचा कार्यक्रम असे. गावच्या पंचक्रोशीत ‘विजयी मल्ल’ म्हणून त्यांची प्रसिद्धी होती. व्यायामाच्या पुढील शिक्षणासाठी १९१८ मध्ये ते बडोद्याला माणिकराव राजरत्न ह्यांच्याकडे गेले. तेथे त्यांनी कुस्ती, लाठी, विजोड फरीदगा ह्याबरोबरच मसाज व अस्थिसंधान कलेचे शिक्षण घेतले.

     नंतर मुंबईतील अंधेरीच्या साधकाश्रमाने व्यायामाचे शिक्षक म्हणून गुरुजींना बोलावून घेतले. तेव्हापासून मुंबईतील राष्ट्रीय शाळा, प्रशाला, महाविद्यालये ह्यातील विद्यार्थी गुरुजींकडे मार्गदर्शनासाठी येत. बडोद्याप्रमाणे मुंबईत भारतीय पद्धतीचा व्यायाम शिकविणारी स्वतंत्र व्यायामशाळा असली पाहिजे असा गुरुजींचा विचार होता आणि तो प्रत्यक्षातही आला.

     दादर येथील घरधनी पोपटलाल शहा यांनी त्यांच्या मालकीची एक मोकळी जागा सांघिक व्यायामासाठी व एक खोली साधने ठेवण्यासाठी विनामूल्य दिली. काळे गुरुजींनी प्रयत्न करून पैसे जमविले, त्यातून दोन मोठे आरसे, आवश्यक साधने व एक तंबू खरेदी केला. २३ ऑगस्ट १९२५ या दिवशी, गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर  विनायक महाराज मसुरकर ह्यांच्या हस्ते व्यायाम शाळेचे ‘श्री समर्थ व्यायाम मंदिर’ असे नामकरण झाले. मनाने, शरीराने आणि बुद्धीने बलवंत अशा पिढ्या घडविण्याचे काम सुरू झाले.

      लोकांमध्ये व्यायामाची आवड निर्माण करून त्यांना दीर्घायुषी, बलवान, धाडसी बनवावे आणि चिकाटी, काटकपणा व शिस्तीच्या सवयी निर्माण कराव्यात ह्या ध्येयाने संस्थेचे कार्य चालू झाले; पण संस्थेचे कार्यक्षेत्र केवळ व्यायामापुरते मर्यादित नव्हते तर त्यांना समाजसेवा करून जनजागृती घडवावयाची होती.

      १९२५ च्या दसऱ्याला गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी कवायती केल्या, सांघिक व वैयक्तिक व्यायामाची प्रात्यक्षिके सादर केली. लाठीही स्वसंरक्षणासाठी असते हे गुरुजींनी त्या दिवशी सप्रयोग दाखविले.

     त्याच वर्षी शिवजयंतीच्या उत्सवात किल्ले रायगडावर जाऊन विद्यार्थ्यांच्या पथकाकडून व्यायाम व क्रीडा ह्यांची प्रात्यक्षिके करवून घेतली. नि:शस्त्र माणूस हा सशस्त्र माणसावर मात करू शकतो, हे गुरुजींनी स्वत: फरिदग्याच्या कार्यक्रमातून दाखवून दिले. गुरुजींचे संघटनाकौशल्य अप्रतिम होते.

     १९३८ मध्ये मुंबईतील सर्व शाळांतील अडीच हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सैनिकी शिस्तीतील सांघिक कवायतीच्या प्रात्यक्षिकाचे संपूर्ण संयोजन गुरुजींनी केले होते. गुरुजींच्या अशा कार्यक्रमांना सर्व वृत्तपत्रांतून मोठी प्रसिद्धी मिळायची. महाराष्ट्र शारीरिक शिक्षण परिषद, मुंबई व्यायाम परिषद ह्यांची नियमावली तयार करण्यात गुरुजींचा फार मोठा सहभाग होता.

     मुंबईत शेठ मंगलदास वर्मा ह्यांच्यावर त्यांनी उपचार केले होते. कृतज्ञता म्हणून वर्मांनी शिवाजी पार्क येथील जागेवर, अठ्ठावीस हजार रुपये खर्चून व्यायामशाळेसाठी वास्तू उभारून दिली. २५ एप्रिल १९४९ ह्या दिवशी मुंबईचे मुख्यमंत्री ना. बाळासाहेब खेर ह्यांच्या हस्ते ह्या इमारतीचे उद्घाटन झाले.

     या संस्थेत नंतर सी.पी. एड., एस. टी. सी. प्रशिक्षणाचे वर्ग सुरू केले. या संस्थेतून प्रशिक्षण घेतलेले गुरुजींचे शेकडो विद्यार्थी महाराष्ट्रातील विविध शाळांमधून व्यायाम शिक्षक म्हणून काम करीत आहेत. गुरुजींचे व्रत पुढे चालवीत आहेत. मुंबईतील दादर येथील गोखले रोडवर अनेक उदार दात्यांनी दिलेल्या देणग्यांमधून १९६३ मध्ये सुरू झालेली ‘गुरुवर्य प्र. ल. काळे व्यायामशाळा’ सुद्धा हेच कार्य करीत आहे.

     -  वि. ग. जोशी

काळे, प्रल्हाद लक्ष्मण