Skip to main content
x

कामत, गजानन रामचंद्र

        मुंबईजवळील पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्यातील अलिबागजवळील चरी या गावात गजानन रामचंद्र कामत यांचा जन्म झाला. घरचा शेतीचा व्यवसाय असल्यामुळे चित्रपट, नाटक अशी कलेची कोणतीही पार्श्‍वभूमी त्यांना नव्हती. गजानन दोन वर्षांचे असतानाच आई सीताबाई यांचे निधन झाले. त्यामुळे वडील रामचंद्र यांच्यावरच मुलांना सांभाळण्याची जबाबदारी पडली. गजानन यांच्या वडिलांनी दुसरे लग्न केल्यावर सावत्र आईने आपल्या दोन मुलांबरोबर त्यांचाही सांभाळ केला. गजानन कामत यांनी इयत्ता सातवीपर्यंतचे शिक्षण अलिबागच्या शाळेत घेतले आणि ते पुढे शिकण्यासाठी मुबंईत दाखल झाले. मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी रुईया महाविद्यालयात प्रवेश घेतला. रुईयामध्ये त्यांना न.र. फाटक, सोनोपंत दांडेकर या महनीय प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. मं.वि. राजाध्यक्ष, श्री.पु. भागवत, राम पटवर्धन यांच्यासारख्या साहित्यिक मित्रांच्या संगतीत गजानन कामत यांची साहित्य प्रतिभा बहरू लागली. त्या काळात मौज, सत्यकथा ही नियतकालिके प्रसिद्ध होती. श्री.पु. भागवतांनी त्यांना या नियतकालिकांचे सहसंपादक (१९४५) केले. नीळकंठ खाडिलकर यांच्या नवाकाळमध्येही ते काही काळ होते. त्यातच एकदा ग.दि. माडगूळकरांनी ग.रा. कामत यांना मराठी चित्रपटासाठी एखादे कथाबीज सुचवा म्हणून सांगितले. त्यातूनच ‘पेडगावचे शहाणे’चा जन्म झाला. ‘पेडगावचे शहाणे’ची कथा, पटकथा ग.रा. कामत यांची पहिलीच कलाकृती. त्यानंतर ‘कन्यादान’, ‘घरचं झालं थोडं’, ‘लाखाची गोष्ट’ इत्यादी चित्रपटांनंतर त्यांनी मराठीतील ‘शापित’ हा ट्रायका फिल्मचा चित्रपट शेवटचा केला. ‘लाखाची गोष्ट’च्या काळात रेखा या चित्रपट अभिनेत्रीशी त्यांनी १९५३ साली विवाह केला.

     १९५३ ते १९६६ या काळात कामत यांनी मराठी चित्रपटांसाठी कथा, पटकथा, संवाद लिहिले. त्यासाठी त्यांचा मुक्काम त्यांनी मुंबईहून पुण्यात हलवला. १९६६ नंतर कामत यांनी मराठीसाठी आपली लेखणी काही काळ बंद केली आणि हिंदी चित्रपटांसाठी सुरू केली. त्या काळात मुंबईत हिंदी चित्रपटसृष्टीदेखील जोरात होती. दर्जेदार, आशयघन, समस्याप्रधान चित्रपटांची निर्मिती येथील सर्जनशील निर्माते, दिग्दर्शक यांच्याकडून होत होती. ग.रा. कामत यांना हे वातावरण खुणावत होतेच. राज खोसला या त्या काळातील दर्जेदार चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या निर्माता, दिग्दर्शकाचे लक्ष कामतांनी वेधून घेतले. राज खोसला यांनी ‘अनिता’ या गाजलेल्या चित्रपटाची कथा, पटकथा कामतांकडून लिहून घेतली. ‘अनिता’च्या यशानंतर कामत यांनी खोसला यांचा विश्‍वास संपादन केला.‘अनिता’चे खरे आव्हान ग.रा. कामतांसाठी होते. कारण कामत मराठी चित्रपट करत होते आणि हिंदी भाषा त्यांना नवखी नसली, तरी हिंदीचा बाज आणि लहेजा आत्मसात करणेही महत्त्वाचे होते. त्यावर तोडगा म्हणून कामत मराठीतून पटकथा लिहीत आणि त्याचा तजुर्मा हिंदीमध्ये होत असे. ‘अनिता’ सर्वच दृष्टीने लोकप्रिय ठरला आणि ग.रा. कामत या नवख्या पटकथाकारांकडे हिंदी चित्रपटसृष्टीचे लक्ष वेधले गेले. ‘बंबई का बाबू’, ‘दो चोर’, ‘मेरा गाँव मेरा देश’, ‘कच्चे धागे’, ‘काला पानी’, ‘पुकार’, ‘इम्तेहान’, ‘मै तुलसी तेरे आँगन की’, ‘बसेरा’ अशा एकाहून एक सरस अशा पन्नासेक चित्रपटांच्या कथा, पटकथा आणि काही वेळा संवादलेखन आणि दिग्दर्शन साहाय्यही केले आहे. यातील वर उल्लेखिलेल्या चित्रपटांनी रजत व सुवर्ण जयंती साजर्‍या केलेल्या आहेत.

     कथा, पटकथाकार म्हणून ग.रा. कामत यांना चार वेळा फिल्मफेअर पुरस्काराने त्याचप्रमाणे राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

- संदीप राऊत

कामत, गजानन रामचंद्र