Skip to main content
x

कामत, माधव नारायण

         माधव नारायण कामत यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील उभा दांडा या गावी झाला. त्यांच्या आजोळी भरपूर बागायती शेती असल्याने शेतीकामाची आवड निर्माण झाली होती व म्हणून त्यांनी पुणे येथे १९१९मध्ये कृषी महाविद्यालयातून बी.एजी.पदवी संपादन केली. पुढे याच महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत कामत यांची साहाय्यक कवकशास्त्रज्ञ (मायकॉलॉजिस्ट) म्हणून नेमणूक झाली. त्या वेळी त्यांच्यावर म्हैसूर भागात सुपारीवर आलेल्या कोलेरोगाचे निर्मूलन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांनी या विशिष्ट रोगाबद्दल १९२०-१९२२ या काळात बहुमोल माहिती मिळवून रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बोर्डो मिश्रणाच्या बुरशीनाशक फवारणीचा उपयोग केला. या मोहिमेनंतर त्यांची बढती कृषी महाविद्यालयात व्याख्याता व नंतर उपप्राध्यापक म्हणून झाली. त्यांनी शिक्षणाबरोबर संशोधनाचे काम हाती घेऊन १९२३ ते १९२७ या दरम्यान लिंबावरील डिंक्या रोग, द्राक्षावरील भुरी रोग तसेच ज्वारी आणि बाजरीवरील झिपऱ्या रोगावर रोगप्रतिबंधक उपाय योजण्यासाठी निरनिराळ्या ठिकाणी दौरे आयोजित करून पीक उत्पादनवाढीच्या मोहिमेला चालना दिली. १९२७मध्ये बटाटा व लिंबूवर्गीय पिकांवर येणाऱ्या रोगाबद्दल व त्याच्या उपायासंबंधी त्यांचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला.

         कामत यांनी अध्यापनाच्या कामाबरोबर कृषी महाविद्यालयातर्फे आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत प्राध्यापक प्रतिनिधी म्हणून फार मोठी कामगिरी बजावली व संस्थेला क्रीडा-कला क्षेत्रात मानाचे स्थान मिळवून दिले. त्यांनी उच्चशिक्षण घेण्याकरता सर्व अडचणींवर मात करून मोठ्या जिद्दीने अमेरिकेला जाण्याचे ठरवले. १९३१-३२ या काळात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. स्टॅकमन उ.सी.यांच्या मार्गदर्शनाखाली मिनीसोटा विद्यापीठात वनस्पती-विकृतिशास्त्रातील पदवी (एम.एस.) मिळवली. त्यांनी त्यावेळी केलेल्या मक्यावरील तांबेरा रोगाचे संशोधन मोलाचे ठरले. अमेरिकेतील अभ्यासक्रमानंतर त्यांनी इओआ विसकॉन्सीन, कॉर्नेल,वॉशिंग्टन डी.सी.वगैरे विद्यापीठांना भेटी देऊन संशोधनाबद्दल अद्ययावत माहिती मिळवली. स्वदेशी परत येताना ब्रिटनमधील 'क्यू' प्रयोगशाळेला आणि वनस्पती-विकृतिशास्त्रातील जगप्रसिद्ध कॉमनवेल्थ मॉयकालॉजिकल संस्थेला भेट देऊन तेथे काही काळ कामसुद्धा केले.

         कामत यांनी भारतात आल्यानंतर मुंबई सरकारच्या कृषी खात्यात काम करताना आंबा,विड्याची पाने, धने, मटार वगैरे पिकांवर पडणारा भुरी रोग; केळीवरील मर (फ्युजेरिअम विल्ट) रोगाचा बंदोबस्त; मुंबई प्रांतात आढळणार्‍या निरनिराळ्या रोगकारक बुरशींच्या जाती याबद्दल संशोधन व अभ्यास आणि प्रसिद्धीचे काम केले. तसेच दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला इटली राष्ट्राकडून रोगयुक्त बटाटा बेण्याची आवक थांबल्यामुळे कामत यांच्यावर रोगमुक्त बटाटा बेणे तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांनी ३ वर्षांच्या कालावधीत अनेक प्रयोग करून रोगमुक्त बटाटा बेणे (नंबरी) तयार केले व ते गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र  व इतरत्र अतिशय  मोठ्या प्रमाणात देण्यात आले. युद्ध प्रकल्पास मदत म्हणून त्यांच्या या कार्याचा नेहमी उल्लेख करण्यात येतो.

         कामत १९५३मध्ये सेवानिवृत्त झाले. कामत यांनी १९५४ नंतर प्राध्यापक म्हणून पुणे विद्यापीठात वनस्पती-रोगविज्ञान व कवकशास्त्राच्या अध्यापनाचे काम सुमारे १२ वर्षे केले. तसेच त्यांची १९४५-४६मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र असोसिएशन फॉर दी कल्टिव्हेशन ऑफ सायन्स (एम.ए.सी.एस.) या संस्थेत डॉ. शं.पु.आघारकर यांच्या नेतृत्वाखाली वनस्पती-रोगविज्ञान व कवकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. त्यांनी ८-१० वर्षांच्या काळात वनस्पती रोगांवरील निरनिराळ्या समस्यांवर संशोधन करून एकूण ३१९ शोधनिबंध लिहिले. तसेच कामत यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण २१ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी व एकूण ९ विद्यार्थ्यांनी एम.एस्सी. पदवी यशस्वीरीत्या संपादन केली. त्यांनी निवृत्तीनंतरच्या काळात कवकशास्त्रावर ५ इंग्रजी पाठ्यपुस्तके व पिकांचे रोग व त्यावरील उपाय असे एक मराठी पुस्तक लिहिले आहे. ३५ वर्षांपेक्षा जास्त काळ सरकारी नोकरी, अध्यापन आणि संशोधन करून सेवानिवृत्तीनंतरसुद्धा फक्त संशोधन कार्यालाच वाहून घेणारे ते एकमेव शास्त्रज्ञ असून यांनी वनस्पती -रोगविज्ञानशास्त्रात मौलिक भर घालून आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवली.

- डॉ. श्रीपाद यशवंत दफ्तरदार

कामत, माधव नारायण