Skip to main content
x

कामुलकर, जयश्री तुकाराम

        ‘खलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया’, ‘हासत वसंत ये’, ‘मनी राधिका चतुर बोलेया गाण्यातील आवाजाने मंत्रमुग्ध झालेले रसिक तिच्या सौंदर्यानेही मुग्ध झाले, ती गायिका-अभिनेत्री म्हणजे जयश्री! ज्यांना जयश्री शांताराम म्हणून चित्रपटसृष्टी ओळखते, त्या आपल्या लौकिक जीवनात जयश्री तुकाराम कामुलकर म्हणून ओळखल्या जात असत. त्यांचा जन्म मुंबईतील गिरगावच्या परिसरात झाला. परंतु त्यांचं मूळ गाव गोव्यातील कामुर्ली हे होतं. वडिलांच्या अकाली झालेल्या निधनानंतरचं, जयश्री यांचं बालपण आपल्या मूळ गावी, कामुर्ली इथे गेलं. तिथे त्या वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत राहिल्या. जयश्री यांच्या आवाजातील माधुर्य त्यांच्या काकांच्या लक्षात आल्यावर ते लहानग्या जयश्री यांना घेऊन परत मुंबईला आले. त्यानंतर उस्ताद गमनखाँ यांच्याकडे जयश्री यांचं गाण्याचे रीतसर शिक्षण सुरू झालं.

गाण्यात पारंगत असणार्‍या चौदा वर्ष वयाच्या जयश्री यांना आपसूकच नाटकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली, पण गुजराती रंगभूमीवर. देशीसमाज नाटक’ (१९३५) या नाटकात काम करत असतानाच संगीतकार के. दत्ता आणि गीतकार मो.ग. रांगणेकर यांच्याशी झालेल्या परिचयातूनच यंग इंडिया कंपनीने जयश्री यांच्या आवाजातील गाणी ध्वनिमुद्रित केली आणि जयश्री प्रसिद्धीच्या झोतात आल्या. रूप आणि आवाज यांच्या जोरावर त्यांना चंद्रराव मोरे’ (१९३८) या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली, तेव्हा त्या मा. कृष्णराव यांच्याकडे गाण्याचा रियाज करत होत्या. जनरल फिल्मच्या चंद्रराव मोरेया ऐतिहासिक चित्रपटातील अभिनयाच्या यथार्थतेमुळे जयश्री यांना नंदकुमारया चित्रपटातील भूमिका मिळाली. तर माझी लाडकीया सामाजिक बोधप्रधान चित्रपटातील मुख्य भूमिकेमुळे त्यांची लोकप्रियता वाढली.

प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच ब्रँड नेम म्हणून ओळखल्या जाणार्‍या तत्कालीन नावाजलेल्या प्रभात फिल्म कंपनीत जयश्री यांचा प्रवेश झाला. तिथे आल्यावर कलात्मक दृष्टी असलेल्या व या दृष्टीचा यथोचित वापर करणार्‍या व्ही. शांताराम यांच्या दिग्दर्शनाखाली जयश्री यांनी शेजारीया चित्रपटात काम करण्याचं ठरवलं. ग्रामीण बाजाच्या या चित्रपटात त्यांनी साकारलेली तरुणी त्यांच्या अभिनयामुळे विशेष गाजली. प्रभातमध्ये आल्यावर त्यांचे व व्ही. शांताराम यांचे स्नेहबंध जुळून आले आणि याची परिणती अखेर विवाहात झाली. २२ ऑक्टोबर १९४२ रोजी जयश्री आणि व्ही. शांताराम विवाहबद्ध झाले.

व्ही. शांताराम यांनी राजकमल स्टुडिओची स्थापना केल्यावर जयश्री याही अर्थातच राजकमलमध्ये गेल्या. तिथे व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या शकुंतला’, ‘डॉ. कोटणीस की अमर कहाणी’, ‘दहेज’, ‘परछाई’, ‘सुबह का ताराआदी चित्रपटांमध्ये जयश्री यांनी अभिनय केला, पण गाण्यांना मात्र स्वत:चाच आवाज दिला. या चित्रपटांबरोबरीनेच त्या मेहंदी’, ‘दीदी’, ‘नया संसार’, ‘दर्शन’, ‘मेला’, ‘हैदर अली’, ‘अपना परायाअशा अनेक हिंदी चित्रपटांमध्येही नायिका म्हणून वावरल्या.

जयश्री यांना राजश्री, तेजश्री आणि किरण अशी तीन मुले असून किरण शांताराम राजकमल स्टुडिओ चालवत आहेत. चित्रपटसृष्टीतून बाहेर पडल्यावर आपल्या संसारात रमलेल्या जयश्री यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].