Skip to main content
x

कांबळे, बेबी

बेबीताई यांचा जन्म पुरंदर तालुक्यातील वीरगाव नावाच्या खेड्यातील काकडे कुटुंबात झाला. युरोपिअन साहेबांचे बटलर असलेले बेबीताईंचे आजोबा दरमहा दहा रुपये पाठवीत. त्या काळात एवढ्या रकमेत त्यांचे घर खाऊन-पिऊन सुखी होते. बेबीताईंचे वडील पंढरीनाथ हे ठेकेदार असल्याने नेहमी बाहेरगावी असत. ते नावाप्रमाणे मायाळू असून त्यांना फक्त माणसाचे जीवन सुखी करण्याची आस होती. ते नेहमी जगाचे चांगले करीत राहिले. त्यांना धनापेक्षा माणसे प्रिय होती. परिणामी त्यांचे आपल्या पत्नीशी कधी पटले नाही. लेखिकेचे बालपण आजोळी गेले. त्यांच्या आत्मचरित्रात महार शब्द जिथे-तिथे आला आहे. त्याविषयी त्या म्हणतात, “महार या शब्दाला आजची सुधारलेली मंडळी लाजत आहेत. पण यात लाजण्यासारखे आहे तरी काय? उलट हा शब्द आपली मान उंचावतो. कारण आजही हे राष्ट्र आमच्या नावावरच चाललेले आहे. मला हा शब्द प्रिय असून माझ्या नसानसांतून सत्य संघर्षाची जाणीव करून देणारा आहे.” डॉ. आंबेडकरांविषयी त्या कृतज्ञतेने भरभरून लिहिताना म्हणतात, “भीमामुळे आम्ही आज सोन्याच्या लंकेत नांदत आहोत.”

पश्चिम महाराष्ट्रातल्या एका खेडेगावातल्या महार समाजाचे चित्र हा पुस्तकाचा खरा गाभा आहे. दलित स्त्रीचे मराठीतले पहिले आत्मचरित्र म्हणून बेबीताईंच्या पुस्तकाला ऐतिहासिक महत्त्व आहे. समाजशास्त्रज्ञाचा पिंड असलेल्या लेखिकेला लहानपणापासून समाजजीवनाचे निरीक्षण बारकाईने करण्याचा नाद होता. त्यांनी या पुस्तकात महार स्त्री-जीवनाचे चित्र, पाच-सहा वर्षांच्या मुलींची लग्ने, सासरी होणारा त्यांचा छळ, वयात आलेल्या सून-मुलगा यांच्यात दुरावा राहावा म्हणून सासूबाई करीत असलेले अनन्वित प्रकार, पळून गेलेल्या सुनेला परत आणून तिच्या पायात खोडा घालणे, काही वेळा तिचे नाक कापण्याचा क्रूरपणा यांसारख्या गोष्टींचे वर्णन बेबीताईंनी तपशीलवार केले आहे. या वर्णनात आत्मीयतेसोबत तटस्थताही आहे.

आंबेडकरांच्या चळवळीने ‘भीमाचं वारं’ झोपडी-झोपडीत शिरले. त्यामुळे ‘आपल्या पोराबाळांना शिकवल्याखेरीज या नरकातून आपण बाहेर पडणार नाही’ याची प्रखर जाणीव या समाजाला होऊ लागली. पंढरीनाथांनी आपल्या कन्येला फलटणच्या शाळेत घातले. बेबी कांबळे स्वतः शिकल्या, विवाहानंतर त्यांनी आपल्या मुलांनाही शिक्षण दिले. बेबी कांबळे यांचे ‘जिणं आमुचं’ हे आत्मचरित्र वास्तवावर आधारित व प्रभावी आहे. त्यांच्या या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अनुदान लाभले आहे.

- वि. ग. जोशी

 

 

कांबळे, बेबी