Skip to main content
x

कांबळी, महादेव जगन्नाथ

पार्वतीकुमार

        आचार्य पार्वतीकुमारांचे मूळ नाव जगन्नाथ महादेव कांबळी. त्याचे मूळ गाव मालवण होय. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई होते. कापड गिरणीमध्ये काम करण्यासाठी त्यांचे वडील मुंबईतील परळ येथे येऊन स्थायिक झाले. येथेच पार्वतीकुमारांचा जन्म झाला आणि येथेच त्यांचे बालपण गेले. त्यांना नृत्याची उपजत आवड स्वस्थ बसू देईना. शाळा सोडून ते नृत्यगुरूंच्या शोधात वणवण फिरले. कथक, कथकली, भरतनाट्यम्, मणिपुरी इ. पारंपरिक शैलींच्या पुनरागमनाचा तो काळ होता. कांबळी मास्तरांनी सारीच तंत्रे आत्मसात केली व त्या काळास अनुरूप असे ‘पार्वतीकुमार’ हे टोपण नाव स्वीकारले. प्रसिद्ध नर्तक उदयशंकर व त्यांचे सहकारी शांतिवर्धन यांच्या कामाचा पार्वतीकुमार यांच्यावर सर्वाधिक पगडा होता. पार्वतीकुमारांनी १९४७ ते १९६५ च्या दोन दशकांत आचार्य इंडियन नॅशनल थिएटर या संस्थेच्या विद्यमाने जवळजवळ वीस नृत्यनाटिका रचल्या व सादर केल्या. त्यांतील ‘ ऑफ कल्चर’, ‘देख तेरी बम्बई’, ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’, तसेच खास छोट्या प्रेक्षकांसाठी दिग्दर्शित केलेले ‘पंचतंत्र’, ‘बिल्ली मौसी की फजीहत’, ‘अपना हाथ जगन्नाथ’ आणि ‘दुर्गा झाली गौरी’ ही नृत्यनाट्ये खूपच गाजली. त्यांनी काही हिंदी व तेलुगू चित्रपटांसाठीदेखील नृत्यदिग्दर्शन केले. परंतु त्यांच्या अंतरात्म्याचा ओढा शास्त्रीय नृत्याकडे होता व त्यास अनुसरून त्यांनी भरतनाट्यमवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले. दरम्यानच्या काळात त्यांच्या शिष्या सुमती लाजमी यांच्याशी त्यांनी विवाह केला. लाजमी यांनी संगीत-नृत्यातील स्वतःच्या प्राविण्याने मास्तरांना योग्य ती साथ दिली.
       भरतनाट्यम् मधील पारंपरिक शिक्षणासाठी पार्वतीकुमार यांनी बडोद्याचेे चंद्रशेखर पिल्लै यांना गुरू मानले. त्या काळात परंपरेतील गुरू कुटुंबाबाहेरील शिष्यास ज्ञान देण्यास तितकेसे उत्सुक नसत. परंतु मास्तरांनी एकलव्याच्या निष्ठेने त्यांच्याकडून अनेक पारंपरिक रचना मिळविल्या. पुढे तंजावरहून मुंबईस येऊन स्थायिक झालेल्या कुप्पय्या पिल्लै व त्यांचे पुत्र महालिंगम पिल्लै यांच्याकडूनही त्यांनी भरतनाट्यम् चे पारंपरिक शिक्षण घेतलेे. चेन्नई येथील कपालीश्वर मंदिराशी निगडित देवदासी परंपरेतील श्रीमती गौरी अम्मा या अभिनयासाठी सुप्रसिद्ध होत्या, ज्यांच्याकडून डॉ. रुक्मिणीदेवी अरुंडेल यादेखील पद्म शिकल्या होत्या, त्यांच्याकडून अभिनय शिकावयास मिळावा अशी मास्तरांची खूप इच्छा होती; पण त्या पुरुषांना शिकवत नसत. तेव्हा सौ. सुमतीबाईंमार्फत मास्तर त्यांच्याकडून अनेक क्षेत्रज्ञ पदे शिकले व त्यांच्या शिष्यांना त्याचा लाभ मिळाला.
        तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालयाने १९६० च्या सुमारास प्रसिद्ध केलेले ‘कोर्व्याच्या साहित्याचे जिन्नस’ हे पुस्तक मास्तरांच्या पाहण्यात आले. त्यातील भरतनाट्यम् सदृश कर्नाटक शैलीतील रचना, घाट व त्यासाठी वापरलेले मराठी काव्य पाहून मास्तर अचंबित झाले. त्यांच्यामधील संशोधक तत्काळ जागा झाला व या ग्रंथाचे कर्ते, रचनाकार सर्फोजीराजे भोसले आणि पर्यायाने तंजावरचे मराठी राजे यांच्या इतिहासाचा मागोवा घेण्यास त्यांनी सुरुवात केली.
      या काळात भरतनाट्यम् अधिकाधिक लोकप्रिय होत असताना मराठी भाषेतून त्यातील रचना रंगमंचावर आल्याने महाराष्ट्रात शास्त्रोक्त नृत्यशैली पुन:प्रस्थापित होण्यास हातभार लागणार होता. त्यामुळे मास्तर जोमाने या कामास लागले. मुंबई आकाशवाणीतील मराठी जाणणारे कर्नाटक संगीतज्ञ जनार्दनपंत तांजोरकर यांच्याकडून त्यांनी या ग्रंथातील काही निवडक रचना संगीतबद्ध करून घेतल्या व डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांनी १९६६ साली मुंबई येथील राज्यस्तरीय नृत्यमहोत्सवात त्याचे प्रथम सादरीकरण केले.
महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष, सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे या कार्यक्रमास उपस्थित होते. या अनुपम प्रयोगास त्यांनी तत्काळ गौरविले व मास्तरांना या विषयावरील पुढील संशोधनासाठी मंडळातर्फे अनुदान दिले गेले. त्यामुळे उत्साहित होऊन मास्तर स्वतः तंजावर येथे गेले व सर्फोजीराजांच्या अनेक रचना त्यांनी सरस्वती महालातील हस्तलिखितांतून निवडून आणल्या व त्यास संगीतनृत्याचा साज चढविला. महाराष्ट्रात शास्त्रीय नृत्याने मूळ धरण्याच्या दृष्टीने आचार्य पार्वतीकुमार यांचे हे फार मोठे योगदान आहे. ‘तंजावर नृत्य प्रबंध’ हा त्यांचा या विषयावरील ग्रंथ महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रसिद्ध झाला आहे.
         आचार्य पार्वतीकुमार यांचे दुसरे महत्त्वाचे योगदान म्हणजे त्यांनी परंपरागत शिक्षणात शास्त्राधार अतिशय शिस्तबद्धपणे पुन:प्रस्थापित केला. आज प्रत्येक नृत्यशाळेतून ‘अभिनयदर्पण’ शिकवले जाते, हस्तमुद्रांचे जुन्या संस्कृत ग्रंथात दिलेले विनियोग शिकवले जातात, याचे पूर्ण श्रेय मास्तरांकडे जाते. आपल्या सर्वच शिष्यांना ते पूर्ण अभिनयदर्पण शिकवीत असत. अलीकडच्या काळात त्यांनी त्यांच्या नवीन शिष्यांकडून हा ग्रंथ प्रात्यक्षिक रूपात नाचण्याचा अभिनव प्रयोगही केला होता. शास्त्र आणि परंपरा यांचा अतूट संबंध यामुळे स्पष्टपणे पुढे आला आहे, हे महत्त्वपूर्ण आहे.
       महाराष्ट्रात आज परंपरेने चालत आलेली, याच मातीतून उपजलेली स्वतःची अशी शास्त्रीय नृत्यपरंपरा नाही. पण अर्वाचीन काळात ते बीज पेरून त्यास खतपाणी घालून रुजवण्याचे काम करणारे जे शेलके मराठी कलावंत आहेत, त्यांमध्ये आचार्य पार्वतीकुमार ‘मास्तर’ किंवा ‘मास्टरजी’ हे नाव अग्रक्रमांकाने घ्यावे लागेल. यांना स्वयंभू नर्तक म्हणणे उचित ठरावे. ते जेवढे उत्तम गुरू होते, तेवढेच उत्तम नर्तकही होते. ते स्वतःच्या प्रज्ञेने अधिक शिकले. त्यांच्यामध्ये स्वतंत्र विचार करण्याची ताकद होती आणि त्याच गोष्टी त्यांनी शिष्यांपर्यंतही पोहोचविल्या.
        आचार्य पार्वतीकुमार शिष्यांना शिकविताना अडवू (भरतनाट्यम् चे
  प्राथमिक धडे) स्वतः उभे राहून करून दाखवीत. त्यांच्या सर्व हालचाली रेखायुक्त, संतुलित व सौष्ठवपूर्ण असत. अभिनय करताना प्रथम डोळ्यांतून सर्वच भावछटा ते उत्तम दाखवीत आणि विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरही तोच भाव उमटावा म्हणून ते अक्षरशः हजारो उदाहरणे देत. पुराणकथांचे व व्यक्तिरेखांचे वास्तवाशी नाते जोडीत.
       त्यांच्या शिष्यवर्गापैकी काही शिष्यांचा उल्लेख करावा लागेल. डॉ. सुचेता भिडे-चापेकर, संध्या पुरेचा, पारुल शास्त्री, जयश्री आणि वेणुगोपाल पिल्ले इत्यादी. फाय फाउण्डेशन, मुंबई सूरसिंगार संसद, साहित्य संघ मंदिर इत्यादी मान्यवर संस्थांनी त्यांच्या अमूल्य कार्याचा गौरव केला आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने, तसेच राष्ट्रीय संगीत नाटक अकादमीनेही त्यांना उच्च पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.

- डॉ. सुचेता भिडे - चापेकर

कांबळी, महादेव जगन्नाथ