कापडिया, सरोश होमी
सरोश होमी कापडिया यांचा जन्म मुंबईत एका सामान्य परिस्थितीतील पारशी कुटुंबात झाला. त्यांचे वडील संरक्षण खात्यात कारकून होते, तर आई गृहिणी होती. त्यांचे बहुतेक सर्व शिक्षण मुंबईमध्ये झाले. त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या बी.ए. (ऑनर्स) आणि एलएल.बी. या पदव्या अनुक्रमे १९६७ व १९६९मध्ये मिळविल्या. सुरुवातीला त्यांनी काही किरकोळ नोकऱ्या केल्या. त्यानंतर मुंबईच्या वकिलांच्या कार्यालयात कारकून म्हणून काम केले.
त्यानंतर त्यांना गग्रट अँड कंपनी या प्रसिद्ध फर्ममध्ये नोकरी मिळाली. यातील अनुभवानंतर अॅड.फिरोझ दमनिया या ख्यातकीर्त व तडफदार कामगारविषयक सल्लागार वकिलांच्या हाताखाली कापडिया काम करू लागले. परंतु त्यांची स्वतंत्र वकिली करण्याची उमेद त्यांना स्वस्थ बसू देईना. अखेर १९७४मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली सुरू केली. अल्पावधीतच त्यांनी एक अभ्यासू वकील म्हणून नावलौकिक मिळविला. सुमारे सतरा वर्षे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखा आणि अपील शाखा या दोन्हींमध्ये सर्व प्रकारांचे दावे लढवले. त्यामुळे त्यांच्या कायदेविषयक ज्ञानाचा आदर होऊ लागला.
आपल्या वकिलीच्या काळात ते आयकर विभाग, मुंबई महानगरपालिका, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्या, अशा वेगवेगळ्या अशिलांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयातही काम पाहत असत. ८ऑक्टोबर१९९१ रोजी कापडिया यांची मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. २३मार्च१९९३ रोजी ते उच्च न्यायालयाचे कायम न्यायाधीश झाले. १९९९ पर्यंत त्यांच्यासमोर विविध विषयांवरचे आणि विविध कायद्यांशी (विशेषत: बँकिंग, कामगार, औद्योगिक संबंध, कंपनी कायदा इत्यादींशी) संबंधित असलेले अनेक गुंतागुंतीचे खटले आले. ते त्यांनी यशस्वीपणे हाताळले. ऑक्टोबर १९९९मध्ये त्यांची नियुक्ती १९९२-९३मधील हर्षद मेहता प्रकरणातून उद्भवलेले खटले चालविण्यासाठी स्थापन झालेल्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून झाली. ते काम त्यांनी सुमारे चार वर्षे पाहिले.
५ ऑगस्ट २००३ रोजी त्यांची बदली उत्तरांचल (आता उत्तराखंड) उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून झाली. १८ डिसेंबर २००३ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १२ मे २०१० रोजी भारताचे सरन्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. सरन्यायाधीशपदावरील त्यांचा कार्यकाळ २८ सप्टेंबर २०१२ पर्यंत होता . कायद्याव्यतिरिक्त त्यांना अर्थशास्त्र, पदार्थविज्ञान, हिंदू व बौद्ध तत्त्वज्ञान, अशा विविध विषयांत रस होता .