कापगते, रामचंद्र किसन
रामचंद्र किसन कापगते यांचा जन्म भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील खंडाळा गावी झाला. त्यांनी वाणिज्य शाखेत प्रथम वर्षापर्यंतच शिक्षण घेतले. वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांना पुढचे शिक्षण घेता आले नाही.
त्यांच्यावर कौटुंबिक जबाबदारी आल्यामुळे त्यांनी शेतीत जास्त लक्ष घातले. त्यांनी डॉ.पं.दे.वि.च्या संशोधित भात जातीची लागवड आपल्या शेतात केली. त्यांनी तालुका व जिल्हा पातळीवर भातपीक स्पर्धेत भाग घेतला. तसेच अखिल भारतीय पातळीवर भातपीक स्पर्धेत भाग घेऊन प्रथम व द्वितीय क्रमांकाची बक्षिसेही मिळवली. शेतीला जोडधंद्याची आवश्यकता असते, हे ओळखून आणि शेणखताशिवाय शेती करणे फायदेशीर नाही; म्हणून त्यांनी दुधाचा जोडधंदाही सुरू केला. पुढे त्यांनी कुक्कुटपालन कार्यक्रमही हाती घेतला. आपल्या शेतीत काही भाग फळबाग व भाजीपाला या पिकांसाठीही ठेवला आणि शेतीमध्ये भरपूर उत्पादन करून चांगला नफा कमावला. कापगते यांनी भातशेतीला जास्त महत्त्व दिले. त्यांनी आपल्या शेतामध्ये भातपीक घेण्यासाठी सिंचनाची सोय केली. डॉ.पं.कृ.विद्यापीठाअंतर्गत शोधलेल्या भाताच्या नवीन जातींची लागवड त्यांनी आपल्या शेतामध्ये करण्याचा प्रयत्न केला. त्यातील साकोली-६, सिंदेवाही-७५, साकोली-८ या भाताच्या ३ उल्लेखनीय जाती आहेत. तसेच त्यांनी मकरंद व खमंग या भाताच्या सुधारित जाती लावण्याचा प्रयत्नही केला.
कापगते यांनी गांडूळ व हिरोळी ही खते आपल्या शेतीत तयार केली व शेताची सुपीकता वाढवली. वरील सर्व विकसित तंत्रज्ञानामुळे त्यांची शेती खंडाळा गावामध्ये आदर्श म्हणून प्रसिद्धीला आली. महाराष्ट्र शासनाने १९८०-८१ चा ‘शेतीनिष्ठ’ पुरस्कार आणि २००३मध्ये राज्यपालांच्या हस्ते ‘कृषीभूषण’ ही पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. कापगते यांनी आपल्या शेतीवर प्रात्यक्षिके व चर्चासत्रे आयोजित केली. हिरिरीने कृषी योजना राबवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करून १९८५ ते १९९५ या काळात त्यांची नागपूर येथील आकाशवाणी केंद्राच्या कृषी सल्लागार समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी खंडाळा या लहानशा खेडेगावी शेतकऱ्यांची एक नभोवाणी शेतकी शाळा सुरू केली. कृषीविज्ञान प्रचार व प्रसाराचे कार्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी सतत चालू ठेवले. ही संस्था शेतकऱ्यांच्या विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरली आहे. कापगते यांनी डॉ.पं.दे.कृ.वि.विज्ञान केंद्राशी सतत संपर्क ठेवला व या केंद्राच्या साहाय्याने शेतीविकासाचे कार्य सतत करून शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन केले.