Skip to main content
x

कापगते, यादव महागाजी

   यादव महागाजी कापगते यांचा जन्म भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यातील रेंगेपार (कोहळी) येथे शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण केवळ सातवीपर्यंत झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी परंपरेने चालत आलेल्या शेती व्यवसायातच लक्ष घातले. त्यांच्याकडे एकूण १० एकर शेतजमीन होती. त्यापैकी ५ एकर जमिनीत त्यांनी आंब्याच्या झाडांची लागवड केली. आंब्यांच्या झाडांमधील जागेत ते लसूण, कांदा, आले, टोमॅटो, वांगी, भेंडी यांसारखी आंतरपिके घेत व उर्वरित ५ एकर जमिनीमध्ये भात, गहू, हरभरा व तूर यांचे हंगामी पीक काढत. ही पिके घेण्यासाठी कापगते यांनी अमृतपाणी व गराडी अर्काचे मिश्रण या नवीन खतांचा वापर केला. अमृतपाणी तयार करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे. गाईचे ताजे शेण १० किलो, गोमूत्र २० लीटर, पीठ २ किलो व गूळ १ किलो या प्रमाणात मिसळून मोठ्या भांड्यामध्ये हे मिश्रण १५ दिवस ठेवावे. १५ दिवसांनंतर या मिश्रणात १०० लीटर पाणी ओतावे. हे अमृतपाणी पिकाला दिले असता उपयुक्त जिवाणूंची वाढ होऊन उत्पादन वाढते.

गराडी अर्काची प्रक्रिया पुढीलप्रमाणे : २० लीटर गोमूत्र घ्यावे. त्यामध्ये १० किलो गराडीचा पाला घालावा. हे मिश्रण तापवून १५ दिवस मडक्यात ठेवावे. १५ दिवसांनंतर पाल्याचा अर्क गाळून घ्यावा व त्यामध्ये १०० लीटर पाणी घालावे. तयार झालेले मिश्रण कीटकनाशक म्हणून शेतात फवारता येते. या फवारणीमुळे किडीवर नियंत्रण ठेवता येते. कापगते सिमेंटच्या निर्धूर चुलींमध्ये इंधन म्हणून धानाचा भुगा वापरत. धानाच्या भुग्याची जळणानंतर मिळणारी राख शेतातील गादीवाफ्यावर ते पसरत व नंतर पेरणी करत. या प्रक्रियेत तयार झालेली रोपे पुढे लावणीच्या वेळी सहजपणे उपटता येतात व रोपलावणीसाठी त्रास होत नाही, हेही त्यांनी अन्य शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणले.

कापगते यांनी जमिनीचा समतोल राखण्यासाठी सेंद्रिय खत’, ‘शेतीबरोबरच कुक्कुटपालन, शेळीपालन व रेशीम उद्योग’, ‘अधिक उत्पादनासाठी जिवाणू खत’, ‘सेंद्रिय शेती व कृषी मार्गदर्शिका’, ‘फळ प्रक्रिया व मशरूम उद्योगया पाच पुस्तकांचे लेखन केले.

कापगते यांनी शेतीच्या बांधावर सागवान, निलगिरी व बांबूची लागवड करून शेतीला कुंपण घालून शेतीचे रक्षण केले व त्याचबरोबरीने वृक्ष लागवडीचे महत्त्वही स्वतःच्या उदाहरणाने इतर शेतकर्‍यांना पटवून दिले. त्यांनी गांडूळखत निर्मिती, वृक्ष लागवड व महात्मा फुले जल अभियान यांसारख्या योजनाही राबवल्या. तसेच कृषीविषयक नवीन तंत्रज्ञानाचे वर्ग व महिला मेळावेही सातत्याने आयोजित केले. कृषी विषयाची आवड जनमानसात रुजावी, या उद्देशाने त्यांनी कृषी वाचनालयही स्थापन केले. गावातील दुग्ध व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने त्यांनी दुग्ध सहकारी संस्थेचीही स्थापना केली.

कापगते यांनी पर्यावरणीय समस्या लक्षात घेऊन गोबर गॅसवरील दिवे, सौर ऊर्जेचे पथदिवे व निर्धूर चुली यांच्या वापराविषयीची जाणीवपूर्वक जनजागृती केली. त्यांनी गवळाऊ वळू गावात आणून देशी गायींचे प्रजनन करण्याचा कार्यक्रमही हाती घेतला. त्यांनी गावाचे हित ध्यानात घेऊन अनेक लोककल्याणकारी योजनांची उत्कृष्ट अंमलबजावणी केली. परिणामी गावाला आदर्श गावपुरस्कार मिळाला. यादव कापगते यांच्या या प्रयोगशीलतेसाठी  १९९१मध्ये महाराष्ट्र शासनाचा शेतीनिष्ठपुरस्कार , पर्यावरणाचा समतोल राखल्याबद्दल १९९६ साली  वनश्रीपुरस्कार व नवीन तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल अनोखा विश्‍वास संस्थेतर्फे २००६ साली  डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषिरत्नपुरस्कार  यांसारख्या पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत.

- डॉ. चंद्रकांत श्यामराव संगीतराव

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].