Skip to main content
x

केडगावकर, नारायण महाराज

        पुणे जिल्ह्यातील, दौंड तालुक्यातील केडगाव बेट दत्त देवस्थानाची निर्मिती ज्या सिद्धयोगी सत्पुुरुषाच्या प्रेरणेतून झाली, त्या सद्गुरू नारायण महाराज केडगावकर यांचा जन्म कर्नाटक राज्यातील, विजापूर जिल्ह्यातील सिंदगी येथे झाला. त्यांचे वडील भीमराव संती हे न्याय खात्यात नोकरी करत होते. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई. त्या नरगुंदच्या दरेकर घराण्यातल्या एक धर्मपरायण साधक होत्या. कर्नाटकात होऊन गेलेले प्रसिद्ध दत्तभक्त स्वामी भीमाशंकर हे या संतीघराण्यातील एक थोर सत्पुुरुष होते.

नारायण महाराज अवघ्या दोन वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे अकाली निधन झाले व ते पाच वर्षांचे असताना त्यांच्या आईचेही निधन झाले. काकांनी त्यांना आजोळी, आजीकडे, नरगुंद येथे नेऊन सोडले. आजीला अन्य कोणी वारस नव्हता, त्यामुळे या नातवास दत्तक घेण्याचा तिचा विचार होता; पण काळाच्या उदरात वेगळेच लिहिलेले होते. नारायण महाराज बालसाधक होते. त्यांना साधना-भक्तीची उपजत आवड होती. ते नरगुंदच्या श्री व्यंकटेश मंदिरात जाऊन बसत. तेथील पूजन, भजन, प्रवचन, कीर्तन हीच त्यांची स्वाभाविक आवड होती. त्यांची साधना पाहून लोक त्यांना बालयोगीमानत होते

बालनारायण महाराजांवर घराशेजारी राहणाऱ्या श्रीधर भटजी घाटे यांचे विशेष प्रेम होते. त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नाच्या वऱ्हाडात छोट्या नारायणला धारवाडला नेले व लग्नमंडपातच नारायणाची धर्ममुंज लावण्याचे पुण्यकर्म केले. या व्रतबंधामुळे धारवाडमधील प्रसिद्ध धर्मपंडित कृष्णशास्त्री उप्पिनबेट्टीगिरी यांचा अनुग्रह लाभला. गायत्री मंत्राच्या प्राप्तीने नारायणाची मूळची साधना तेजस्वीपणे प्रकट झाली. मुंजीच्या दिवशी सुरू केलेले प्रात:-सायं संध्येचे, सूर्योपासनेचे व्रत महाराजांनी समाधीपर्यंत अव्याहतपणे, कटाक्षाने व निष्ठेने जपले. ज्या दिवशी संध्या होत नसे (आजारीपणात), तेव्हा नारायण महाराज अन्नग्रहण करीत नसत. या नित्य सूर्योपासनेचे महाराजांना मोठे पाठबळ होते.

उपनयन होताच नारायण महाराजांना खरेच नयन लाभले व एक नवी दृष्टी, नवा जन्म मिळाला. या काळातच त्यांना गुरुचरित्रप्राप्त होते व भगवान दत्त हेच त्यांचे जीवन होेते. केवळ नऊ वर्षांच्या बालकाचे तेज, साधना व नित्यनेमाचा व्रतस्थपणा पाहून सर्व जण थक्क  होत. कोणी संतुष्ट होऊन काही दिले, तर त्याचा विनियोग करून नारायण महाराज श्री सत्यनारायण महापूजाकरीत. दत्तभक्ती व सत्यनारायण पूजा यांनी त्यांचे जीवन व्याप्त झालेले होते.

महाराजांना बालवयात शुद्ध तुपाची विशेष आवड होती. आजीने तूप वाढले तरी महाराज पुन्हा पुन्हा तूप मागत. त्यावर आजी चिडून रागाच्या भरात नको ते बोलून गेली. महाराज ताडकन ताटावरून उठले व कायमचा गृहत्याग करून निघून गेले. त्यांनी व्यंकटेशाच्या मंदिरात रात्र काढली. आता विश्व हेच माझे घर व व्यंकटेशा, तूच माझा पालनकर्ता,’ अशी व्यंकटेशाला प्रार्थना करून त्यांनी गावाचा निरोप घेतला. सौंदत्ती, हुबळी असा प्रवास करीत ते पुण्यास आले. पुढे बोपगाव येथे काही दिवस राहून नारायण महाराज आर्वीला गेले

त्र्यंबकराव अत्र्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांना झालेली पिशाच्च बाधा नारायण महाराजांना पाहताच दूर झाली. महाराज लक्ष्मीबाईंना आईम्हणून हाक मारत उराउरी भेटले. स्वप्नदृष्टान्त होताच महाराजांनी आर्वीहून गाणगापुरी जाऊन अनुष्ठान केले. त्यांना दत्तदेवतेचा  साक्षात्कार झाला. जेथून आला तेथे परत जा,’ असा आदेश मिळाल्यामुळे नारायण महाराज आर्वीला परत आले. आर्वी ते सुपे या रस्त्यावर बढाणे गावचे शिवार, ज्याला बेटम्हणतात, ते महाराजांना साधनेसाठी सुयोग्य स्थान वाटले. १९०६ साली महाराज या गावी आले. त्यांचे तेज पाहून त्यांचे दत्तावतार म्हणून संपूर्ण गावाने स्वागत केले. पुण्याचे कलेक्टर ब्रँडन, डेक्कन कॉलेजचे प्रोफेसर वुडहाउस असे अनेक थोर, मोठे लोक नारायण महाराजांकडे आकर्षित झाले. १९१० साली बेट येथील जागा कलेक्टरद्वारा महाराजांना ताब्यात मिळाली व पुढे हे बेट दत्तभक्तांचे, साधकांचे तीर्थक्षेत्र झाले. तेथील दत्तमंदिर व सारा परिसर दत्तभक्तिपीठ म्हणूनच जगभरातील दत्तभक्तांचे श्रद्धास्थान झालेले आहे.

१९३३ साली नारायण महाराजांनी येथे ११०८ सत्यनारायण महापूजा सोहळा साजरा केला. त्यानंतर १९३६ साली दर एक तासाला १०८ याप्रमाणे ७ दिवसांचा सत्यनारायण महापूजा सप्ताहसाजरा केला. देवभूमी, दत्तभूमी, तपोभूमी म्हणून केडगाव बेटचे नाव सर्वत्र झाले. हजारो भाविकांची ये-जा सुरू झाली. या भाविकांमध्ये डी.व्ही. पलुसकर, बालगंधर्व, योगी अरविंद घोषांचे योगगुरू लेले असे अनेक मान्यवर होते. या भागात महाराज येण्यापूर्वी ख्रिस्ती धर्मप्रचारक लोकांना फसवून बाटवत होते. नारायण महाराज आले व बाटवाबाटवी बंद झाली. गोवधबंदी व्हावी अशी त्यांची इच्छा होती व त्या लढ्यास त्यांचा पाठिंबा होता. महाराजांनी या ठिकाणी निर्माण केलेली गोशाळा आदर्श आहे. महाराज अत्यंत वैभवात, राजासारखे राहत. रेशमी वस्त्रे, जरीची टोपी परिधान करीत; पण त्यांची वृत्ती कमलदलासारखी, पूर्णपणे अलिप्त व विरक्त होती.

परमार्थासाठी संसार सोडून हिमालयात जाण्याची गरज नाही. उपासना करा. उपासनेने सर्व काही साध्य होईल. ती निष्ठेने करा,’ असा महाराज सर्वांना उपदेश करीत. त्यांनी ना काही ग्रंथलेखन केले, ना प्रवचन-कीर्तन केले. त्यांचा निष्ठाभाव व दृढधर्माचार हीच त्यांची शिकवण होय. १९४५ साली नारायण महाराज यांची भक्तांनी एकसष्टी साजरी केली. त्यानंतर आपले जीवितकार्य संपत आले याची जाणीव होऊन महाराजांनी केडगाव दत्तस्थानाचा कायमचा निरोप घेतला व ते बंगलोरला (बंगळुरू) गेले. तेथील एक भक्त पापण्णांकडे त्यांचा मुक्काम होता. ३ सप्टेंबर १९४५ रोजी त्यांनी बंगलोरच्या मल्लिकार्जुन ग्रामदेवतेची १११ सोन्याची कमळे अर्पण करून पूजा केली,अन्नदान केलेे आणि बसल्या जागी नारायण महाराजांना इच्छामरण प्राप्त झालेे. केडगाव बेट दत्त संस्थान ट्रस्ट करण्यात आला असून या ट्रस्टद्वारे नारायण महाराजांचे उपासना कार्य पुढे चालू आहे.

विद्याधर ताठे

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].