Skip to main content
x

केळकर, गिरीजाबाई महादेव

     स्त्री-जीवनातील समस्या, तिची दुःखे मांडणार्‍या पहिल्या गद्य लेखिकांपैकी एक म्हणून महत्त्वाच्या ठरलेल्या गिरीजाबाई केळकर यांचा जन्म मुंबईला झाला. त्यांचे माहेरचे नाव द्रौपदी बर्वे होते. त्यांचे वडील बर्वे यांची नोकरी सौराष्ट्रात असल्याने द्रौपदीचे बालपण व शिक्षण गुजरातमध्ये झाले, परंतु न. चिं. केळकर यांचे धाकटे बंधू महादेवराव केळकरांशी द्रौपदीचा विवाह १९०१ साली झाला. त्या  गिरीजा महादेव केळकर झाल्या व महाराष्ट्रात आल्या. विवाहानंतर त्या मराठी भाषा शिकल्या व मराठीत त्यांनी  प्राविण्य संपादन केले. केळकरांच्या घरच्यांनी  गिरीजाबाईंच्या लेखनाला प्रोत्साहन दिल्यामुळे त्या लिहू लागल्या. त्यांनी विपुल व विविध लेखन करून चांगली मान्यता मिळवलीच, शिवाय उत्तम वक्त्या म्हणूनही लौकिक संपादन केला.

     त्यांनी १९३१ मध्ये लिहिलेल्या ‘संसार सोपान’ ह्या पुस्तकाच्या प्रास्ताविक प्रकरणाचा आरंभ ‘गृहिणी गृहाची शोभा। गृहिणी सुखाचा गाभा। गृहिणी आनंदाचा ठेवा। ऐशी गृहिणी लाभे तो भाग्यवंत देवा॥’ या हृद्य काव्यपंक्तींनी केला आहे. त्यांच्या कथा-नाटकांतले अनुभवाचे विश्व रोजच्या जीवनातले व कौटुंबिक आणि घरगुती स्वरूपाचे आहे. नव्या-जुन्याचा संगम माणसाला पुढे नेतो, अशी त्यांची धारणा होती. त्याचबरोबर सुगृहिणी व सुगरण बनविण्याकडे त्यांचा कल दिसून येतो. शरीरसंवर्धन व पोषण अन्नावर अवलंबून असते, असे प्रतिपादन करून त्या म्हणतात, ‘ज्या सॅनिटेशनच्या नावाने तुम्ही इतके ओरडता, त्या सॅनिटेशनच्या तत्त्वावर रचलेली आमची हिंदू राहणी आहे.’ संसारी स्त्रियांना मार्गदर्शक व बोधपर असे विपुल स्फुट लेखनही गिरीजाबाईंनी केले आहे. ‘नाही निर्मळ जीवन काय करील साबण?’ असे त्या मार्मिकपणे विचारतात.

     जुन्यातले चांगले ते जोपासण्याकडे  गिरीजाबाईंची वृत्ती दिसते. त्यांची एकंदर वृत्ती सात्त्विक आहे, हे त्यांच्या लिखाणातून जाणवते. त्यांच्या लेखनगुणांत उत्तरोत्तर वाढ झाली व तत्कालीन संस्कारशील मध्यमवर्गीयांचे प्रातिनिधिक ठरू शकेल, असे लेखन त्यांनी केले. ‘मनोरंजन’, ‘ज्ञानप्रकाश’, ‘खानदेश वैभव’ इत्यादी नियतकालिकांतून त्यांचे लेख प्रसिद्ध झाले. ‘पुस्तकी शीक नि व्यवहाराची भीक’ (१९१४), ‘पुरी हौस फिटली’ (१९१६) या कादंबर्‍या; ‘अंगठीचा प्रभाव’ (१९२७) ही दीर्घ सामाजिक कथा; ‘स्वभावचित्रे’, भाग १ (१९२३), भाग २ (१९३४), ‘केवळ विश्रांतीसाठी’ (१९२६) कथासंग्रह; ‘पुरुषाचे बंड’ (१९१३), ‘आयेषा’ (१९२१), ‘राजकुंवर’ (शिरकाणाचा सूड) (१९४१), ‘हीच मुलीची आई’ (१९३२), ‘मंदोदरी’ (१९५७) ही नाटके त्यांनी लिहिली. त्यांच्या काही पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या, यावरून त्यांच्या लिखाणाची लोकप्रियता ध्यानी येते. ‘गृहिणी भूषण’ (१९१२), ‘पुष्पहार’ (१९२१), ‘स्त्रियांचा स्वर्ग’ (१९२१) ही त्यांची आणखी काही पुस्तके. त्यांचे ‘द्रौपदीची थाळी’ (१९५९) हे आत्मवृत्त असून स्त्री-शिक्षणाचे महत्त्व सांगणारे आणि पतिपरायण संसारी स्त्रीचे साधेसुधे जिव्हाळ्याने भरलेले हे आत्मनिवेदन आहे.

     उल्लेखनीय बाब म्हणजे १९२८ साली मुंबईत भरलेल्या नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद  गिरीजाबाईंना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता.

- वि. ग. जोशी

केळकर, गिरीजाबाई महादेव