Skip to main content
x

केळकर, गोपाळ रामचंद्र

    गोपाळ रामचंद्र केळकर यांचे शिक्षण घरच्या गरिबीमुळे इंग्रजी तिसरीपर्यंतच झाले होते. त्यांना रेल्वेत स्टेशन मास्तर म्हणून नोकरी मिळाली. नागपुरात असताना त्यांना जलोदर होऊन ते फार त्रस्त झाले. वैद्य व डॉक्टरांची औषधे घेतली; परंतु पोटात सतत होणाऱ्या वेदनांमध्ये उतार पडेना. त्यांना अशक्तपणाही जाणवू लागला. जीवनाचा कंटाळा येऊन गोपाळरावांनी निर्वाणीची घोषणा केली, ‘‘जो कोणी या जगाचा ईश्वर असेल त्याने हा माझा वायू जर आठ दिवसांच्या आत नाहीसा केला, तर एका भगवंतावाचून पुन्हा कोणाची चाकरी करणार नाही.’’ गोपाळच्या आर्त प्रार्थनेला प्रतिसाद मिळाला.

     आठ दिवसांत गुण आला. आता गोपाळबुवांना प्रतिज्ञापूर्तीची चिंता बोचू लागली. एक पैसा गाठी नसताना ते अक्कलकोटला पोहोचले. गोपाळ स्वामी समर्थांकडे आले ते ऐहिक इच्छापूर्तीसाठी नव्हे, परमार्थप्राप्ती व उपासनेसाठी. गोपाळबुवांनी गुरुपदेश घेण्याचा संकल्प करून चार महिने संपले. गुरुबोधाच्या आकांक्षेने ते अक्कलकोटला भिक्षा मागून निर्वाह करीत. बाकी सदा स्वामी दर्शनाचे सुख अनुभवीत. ते देशमुखांच्या वाड्यात निद्रिस्त असताना स्वप्नात स्वामी समर्थ आले, पोटावर हात फिरवून म्हणाले, ‘‘तुझा रोग आम्ही नाहीसा करतो.’’ बुवांना जाग येताच ते लघवीला गेले. जलोदर पूर्ण नाहीसा झाला.

     पंधरा दिवसांनी रात्री पुन्हा स्वामी समर्थांनी दृष्टान्त दिला. स्वामी समर्थ गावी होते. बुवांनी पहाटे जाऊन त्यांचे पाय धरले व ‘दीनावर अनुग्रह करावा’, अशी विनवणी केली. स्वामींनी कृपा करून बुवांचे जीवन कृतार्थ केले. शारीरिक व्याधी व भवबाधा दूर झाली. गुरुबोधानंतरही बुवा काही काळ अक्कलकोटलाच स्वामींच्या सेवेत होते. स्वामी समर्थ म्हणजे गोपाळबुवांचे परब्रह्मच. श्रीस्वामींनी पती-पत्नीची भेट घडविली व बुवांना आदेश दिला, की ‘पत्नीला बरोबर घेऊन चिपळूणच्या बाहेर मार्कंडी या स्थानाजवळ ब्रह्मचारीबुवांनी पादुका स्थापन केल्या आहेत, त्यांची पूजा करीत तेथे राहावे’.

     गोपाळबुवा स्वामी समर्थांनी दिलेली झोळी घेऊन आठवड्यात एकदाच पाच घरी भिक्षा मागत व तेवढ्यावरच निर्वाह करीत. कधी उपासही पडत. इ.स. १८७८ मध्ये स्वामी समर्थांनी समाधी घेतली. ते वृत्त ऐकून गोपाळबुवांनी नैराश्य व दु:ख यांमुळे प्रायोपवेशन केले. तिसऱ्याच दिवशी स्वामींनी दर्शन देऊन सांगितले, ‘मी अमर आहे, मला ज्या-ज्या वेळी बोलवाल, धावा कराल, त्या-त्या वेळी मी नित्य पाठीशी राहीन.’’

    गोपाळबुवांचे दु:ख संपून त्यांना जाणीव झाली, की श्री स्वामी सदैव या जगात, मठात आहेत. बुवा नवी स्फूर्ती घेऊन कामाला लागले. त्यांनी श्री स्वामींच्या पादुकांची पूजा भक्तिभावाने केली. नंतर लोकांनी मठ बांधून दिला. मठापासून चार कि.मी. अंतरावरील डोंगरावर विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन बुवा तुकारामांची गाथा, नाथांचे भागवत, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव इ. धार्मिक ग्रंथांची पारायणे करीत. सायंकाळी मठात आरतीसाठी परत येत. हा क्रम २५-३० वर्षे चालला. वृद्धापकाळी डोंगर चढवेना, तेव्हा ते पहाटे तीनला उठून मानसपूजा, नामस्मरण, ध्यानधारणा करीत. बुवांनी श्रींच्या चमत्कारांची संपूर्ण बखर मोडी लिपीत लिहिली. त्यांनी ‘अभंग ज्ञानेश्वरी’, ‘करुणास्तोत्र’, ‘साधनाविवेक सारामृत’, ‘संध्येचा अर्थ’ वगैरे पुष्कळ पुस्तके लिहिली. या गावचे रहिवासी श्री. रामभाऊ वहाळकर यांनी ग्रंथ छापण्यासाठी हस्तलिखिते मागितल्यावर ती छापल्यामुळे मनात साधुत्वाचा अहंकार होईल या भीतीने गोपाळबुवांनी सर्व हस्तलिखिते जाळून टाकली. लोकांना मुखोद्गत असलेले केवळ तीन ग्रंथ छापले गेले. पुढे बुवा समाधी घेऊन परमानंदी लीन झाले.

- वि.ग. जोशी

केळकर, गोपाळ रामचंद्र