केळकर, पुरुषोत्तम काशीनाथ
तंत्रविज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य विद्वान शास्त्रज्ञ आणि भारतामध्ये तंत्रविज्ञान क्षेत्रात अद्ययावत शिक्षण देणाऱ्या संस्थांची मुहूर्तमेढ रोवणारे कर्तबगार तंत्रज्ञ म्हणून पुरुषोत्तम काशीनाथ केळकर परिचित आहेत.
डॉ. पुरुषोत्तम काशीनाथ केळकर यांचा जन्म धारवाड येथे झाला. त्यांचे वडील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. सुरुवातीचे शिक्षण धारवाडला पार पडल्यावर १९३० साली त्यांनी मुंबईच्या ‘रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ (इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स) येथे भौतिकी विषयात बी. एस्सी. पदवी प्राप्त केली. त्यानंतर विद्युत अभियांत्रिकीत उच्चशिक्षण घेण्यासाठी ते बंगळुरूच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थेत दाखल झाले. अभियांत्रिकी आणि तांत्रिक क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण आणि संशोधन करणाऱ्या मोजक्या संस्थांमध्ये ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ ही अग्रगण्य होती. ह्या संस्थेतील अभ्यासक्रम उत्तमरितीने पार पाडून अधिक संशोधनासाठी त्यांनी इंग्लंडमधील लिव्हरपूल विद्यापीठाकडे प्रयाण केले. १९०६ साली त्यांना पीएच.डी. ही पदवी मिळाली.
विद्युत अभियांत्रिकीमध्ये डॉक्टरेट मिळविली असूनही शिक्षण व संशोधनात रस असल्यामुळे, भारतात परतल्यावर आर्थिक सुबत्ता देणाऱ्या उद्योगधंद्याकडे न वळता, डॉ. केळकर बंगळुरूला ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ संस्थेत व्याख्याता म्हणून रुजू झाले. या ठिकाणी नोबेल पारितोषिक विजेते सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ, सर चंद्रशेखर व्यंकट रमण हे संचालक होते. डॉ. होमी भाभा हे इंग्लंडहून सुटीमध्ये भारतात आले होते. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यामुळे त्यांना इंग्लंडला जाता येईना, म्हणून त्यांनी बंगलोरच्या भारतीय विज्ञान संस्थेत संशोधन चालू ठेवले. याच वेळी डॉ. विक्रम साराभाई हे त्याच संस्थेत भौतिकशास्रात संशोधन करत होते. विज्ञान क्षेत्रात पुढे नेतृत्व गाजविणाऱ्या या शास्त्रज्ञांचा सहवास डॉ.केळकरांना लाभला हा एक दुर्मीळ योग होता.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पं. नेहरूंनी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी अनेक योजना आखल्या. या योजनांच्या अंतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये संशोधनाला चालना देण्यासाठी सरकारने ‘वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन विभाग’ (कौन्सिल ऑफ सायंटिफिक अॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च-सी.एस.आय.आर) स्थापन केला. डॉ. शांतिस्वरूप भटनागर या महान शास्त्रज्ञावर या विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांनी भारतामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अद्ययावत संशोधन करणाऱ्याप्रयोगशाळांचे जाळे निर्माण केले. तंत्रज्ञानाच्या शिक्षण व संशोधन क्षेत्रात ‘भारतीय तंत्रविज्ञान संस्था’ (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी - आय.आय.टी.) उभारण्याची महान कामगिरी डॉ. पु. का. केळकर यांच्यावर सोपविण्यात आली व मुंबई आणि कानपूर येथे नमुनेदार संस्था स्थापन करून त्यांनी ती पार पाडली.
१९४३ साली डॉ. केळकर मुंबईच्या व्ही.जे.टी.आय. या तंत्रशिक्षण संस्थेत विद्युत अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख म्हणून रुजू झाले. या संस्थेची वाढ घडवून आणण्याच्या दिशेने त्यांनी यशस्वी पावले उचलली. त्यांनी देशातील पहिली इंपल्स टेस्टिंग उपकरण प्रणाली उभारली. त्यांनी मुंबईच्या परिसरातील उद्योगधंद्यांशी संस्थेचे संबंध दृढ करण्याचे यशस्वी प्रयत्न केले. मुंबई विद्यापीठाशी संलग्न अभियांत्रिकी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाची आखणी व अंमलबजावणी करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.
राष्ट्रीय पातळीवर उच्च दर्जाच्या अत्याधुनिक तंत्रशिक्षण व संशोधनाला वाहिलेली एक संस्था स्थापन करण्याचे सरकारने ठरविले. या कल्पनेप्रमाणे मुंबर्ईमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-आय.आय.टी. उभारण्याचे सरकारने ठरविले. या कामी युनेस्कोमार्फत सोव्हिएट युनियनची मदत उपलब्ध होणार होती. १९५५ साली भारत व युनेस्कोच्या संयुक्त शिष्टमंडळाने सोव्हिएट युनियनला दीर्घ भेट दिली. डॉ. केळकर त्या शिष्टमंडळाचे सदस्य होते. १९५६ साली मुंबईच्या तंत्रविज्ञान संस्थेचे योजना अधिकारी म्हणून केळकरांची नेमणूक झाली व संस्थेचा आराखडा तयार करून तिची उभारणी करण्याचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले. मुंबईमध्ये पवई तलावाच्या काठी, रम्य परिसरामधील जागेची निवड करण्यात आली.
संस्थेची प्राथमिक आखणी, अध्यापकवर्गाची निवड इत्यादी पायाभरणीची कामे करून १९५८ साली प्रवेश देण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण प्रवेश परीक्षा घेऊन अत्यंत हुशार विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्याची परंपरा या पहिल्या तुकडीपासूनच सुरू झाली. पहिल्या वर्षी डॉ. केळकरांना संस्थेचे उपसंचालक पद देण्यात आले. परंतु पुढील वर्षी एका बाहेरच्या व्यक्तीला संचालक पद दिले गेले. त्यामुळे नाराज होऊन डॉ. केळकर संस्थेतून बाहेर पडले. परंतु, मुंबईची संस्था उभारण्यात त्यांनी केलेल्या कष्टांचे फळ त्यांना लवकरच मिळाले.
मुंबईप्रमाणेच कानपूर येथेही आय.आय.टी. स्थापन करण्याचे ठरले. या कामात अमेरिकन आंतरराष्ट्रीय विकास योजनेमार्फत मदत मिळणार होती आणि नऊ अमेरिकन विद्यापीठांचे एक मंडळ या कामी भारताशी सहकार्य करणार होते. डिसेंबर १९५९ मध्ये डॉ. केळकरांची कानपूर आय.आय.टी.चे संस्थापक-संचालक म्हणून नेमणूक झाली. डॉ. केळकरांनी मुंबईप्रमाणे याही ठिकाणी अगदी कोऱ्या पाटीवर सुरुवात करून संस्थेची वर्षभरातच उभारणी केली व पहिल्या तुकडीचे वर्ग सुरू केले.
त्यांनी अमेरिकेतील नामवंत विद्यापीठांना भेटी दिल्या व प्राध्यापकांची देवाणघेवाण घडवून आणली. थोड्याच काळात देशातील प्रथम दर्जाच्या शिक्षण व संशोधन संस्थांमध्ये कानपूर आय. आय. टी.ने वरचे स्थान मिळविले. कानपूर येथील डॉ. केळकरांची कारकीर्द १९७० सालापर्यंत चालली.
मुंबईप्रमाणे कानपूर येथील संस्था ही निवासी संस्था असल्यामुळे संस्थेचे विद्यार्थी, प्राध्यापक व इतर कर्मचारी यांच्यासाठी आवास संकुलाची उभारणी करावयाची होती. हे कामही डॉ. केळकरांनीच पूर्ण केले. नामवंत वास्तुशिल्पी श्री. अच्युत कानविंदे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेल्या या वास्तुसंकुलाच्या तपशिलातही डॉ. केळकरांनी लक्ष घातले व एक वैशिष्ट्यपूर्ण वास्तुरचना असलेले परिपूर्ण शैक्षणिक संकुल उभारले. हे संकुल आधुनिक भारतातील उत्कृष्ट वास्तूंमध्ये गणले जाते.
१९७० साली डॉ. केळकर यांना मुंबई आय. आय. टी.चे संचालक पद देण्यात आले. त्यांनीच स्थापन केलेली संस्था आता चांगली नावारूपाला आली होती. डॉ.केळकरांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सुधारणा घडवून आणल्या. येथे असताना सोव्हिएट विज्ञान अकादमीच्या निमंत्रणावरून त्यांनी सोव्हिएट युनियनला भेट दिली. अकादमीतर्फे सायबेरियातील नवसिबिर्स्क येथे खास विज्ञान शहर उभारले गेले होते. ते पाहून डॉ. केळकर फार प्रभावित झाले होते.
मूळचे सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व, विविध विषयांवरील वाचन, देशात व परदेशात घेतलेले अत्युच्च शिक्षण, तसेच शिक्षण व संशोधन ह्या क्षेत्रांची जन्मजात आवड असल्यामुळे त्यांनी प्रशिक्षण-संशोधन संस्था स्थापन करण्याची नवीन जबाबदारी आनंदाने स्वीकारली आणि उच्च दर्जाची शिक्षण-संशोधन संस्था कशी असावी, ह्याची त्यांची कल्पना साकार केली. मुंबई व कानपूर येथील संस्था उभारताना त्यांना सोव्हिएट व अमेरिकन समाजव्यवस्था व त्या देशांतील शिक्षणसंस्थांचे जवळून निरीक्षण करण्याची संधी लाभली. त्यातून भारतीय संदर्भात योग्य ते स्वीकारण्याचा व अयोग्य ते बाजूला ठेवण्याचा संतुलित दृष्टिकोन स्वीकारून त्यांनी शिक्षणसंस्थांचा आदर्श निर्माण केला. त्यांनी निर्माण केलेल्या मार्गावरूनच भारतात इतरही ठिकाणी तंत्रविज्ञान संस्था स्थापन केल्या गेल्या.
अभियांत्रिकीत प्रगती करण्यासाठी आधुनिक काळात विज्ञानाचा पाया मजबूत हवा, त्याचबरोबर सामाजिक विज्ञान आणि मानसशास्त्र या विषयांची यथोचित जाणीव हवी, अशा व्यापक भूमिकेतून त्यांनी भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील केवळ अभ्यासक्रमच नव्हे, तर इतरही सोयीसुविधांची आखणी केली. त्यासाठी लागणारी शैक्षणिक व व्यवस्थापकीय लवचीकता, तसेच साधनसामग्री गोळा करण्याचे कौशल्यही दाखविले. गणित, भौतिकी, रसायन, समाजशास्त्र, विज्ञानाचे तत्त्वज्ञान इत्यादी विषयांचे भारतीय तंत्रविज्ञान संस्थांतील विभाग आज अनेक विद्यापीठांतील या विषयांच्या विभागांपेक्षा अधिक कार्यक्षमतेने व सर्जनशीलतेने कार्य करताना आढळतात, हे त्यांच्या व्यापक दृष्टीचे फलित आहे. विज्ञान व तंत्रज्ञान याच समाजात रुजून वाढले पाहिजे. ते नुसते आयात केल्यास आपण तंत्रवैज्ञानिक गुलामगिरीस बळी पडू, असा सावधगिरीचा इशाराही त्यांनी दिला होता. या दृष्टीने समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणाऱ्या संस्थांच्या कार्यामध्ये ते रस घेत असत. मराठी विज्ञान परिषदेच्या कार्याबद्दल त्यांना आस्था होती. १९७० साली मराठी विज्ञान परिषदेच्या नागपूर येथे भरलेल्या पाचव्या अधिवेशनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.