केळकर, विजय लक्ष्मण
विजय लक्ष्मण केळकर यांचा जन्म विदर्भातील खामगाव येथे झाला. मुळचे औंध येथील केळकर यांचे शालेय शिक्षण पुणे येथे झाले. पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण घेतले व १९६३ मध्ये त्यांनी यांत्रिकी व विद्युत याविषयात बी.ई. ही पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी १९६६ साली अमेरिकेच्या मिनेसोटा विद्यापीठातून एम.एस.केले. त्यांनी १९७० साली अमेरिकेतील बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठामधून अर्थशास्त्र या विषयात प्रबंध सादर करून पीएच.डी. मिळविली. आपल्या पुढील आयुष्यात त्यांनी एकूण कार्यकाळात आर्थिक क्षेत्रातच सेवा बजावली. त्यात शेअर बाजार, वित्त आयोग अशा अनेक संस्थांचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्यांनी बहुतेक संस्थांत किंवा सरकारी खात्यात उच्च पदावर कामे केली आहेत.
१९७०मध्ये केळकर हैदराबादच्या ‘अॅडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज ऑफ इंडिया’ मध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथे असतानाच त्यांना नेपाळचे राष्ट्रीय आर्थिक नियोजन करण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर नेपाळी एअरवेज कॉर्पोरेशनचे दीर्घकालीन नियोजन त्यांनी केले. १९७७ मध्ये डॉ.केळकर हे केंद्र सरकारच्या व्यापार खात्याचे आर्थिक सल्लागार झाले. या पदावर ते १९८१ पर्यंत कार्यरत होते.
पुढच्याच वर्षी त्यांनी केंद्र सरकारच्याच पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयात आर्थिक धोरण व नियोजन विषयक सल्लागार म्हणून सेवा बजावली. १९८५ साली राजीव गांधी पंतप्रधान असताना डॉ.केळकर यांची पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे सचिव म्हणून नेमणूक झाली. एक वर्ष त्यांनी हे पद अत्यंत कार्यक्षमपणे सांभाळले. हे पद सांभाळत असतानाच १९८७ मध्ये त्यांना औद्योगिक खर्च व किंमत विभागाचे अध्यक्षपद तसेच भारत सरकारच्या अर्थसचिव पदावरून कार्य करण्याची संधी लाभली.
केळकर तेराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष झाले. भारतात आर्थिक सुधारणा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर लगेच त्यांना ‘युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलमेंट’ या जिनिव्हास्थित आंतरराष्ट्रीय संस्थेच्या व्यापार विभागात संचालक व समन्वयक म्हणून कार्य करण्याची संधी मिळाली. १९९४ पर्यंत त्यांनी या पदावर उत्कृष्ट कार्य केले.
त्यानंतर १९९४मध्ये भारतात येऊन त्यांनी केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू खात्यातील सचिवपद स्वीकारले. तीन वर्षे हे पद सांभाळल्यानंतर पुढे त्यांनी विविध खात्यांत अध्यक्षपदावरूनच काम केले. त्यामध्ये केंद्रीय जकात (टॅरिफ) आयोग, औद्योगिक विकास वित्त महामंडळ (आयडीएफसी, प्रायव्हेट इक्विटी, मुंबई), वित्त आयोग, भारतीय विकास प्रतिष्ठान, राष्ट्रीय शेअर बाजार या सर्व संस्थांचे अध्यक्षपद भूषविले. मधल्या काही वर्षात त्यांनी भारत सरकारचे अर्थ सचिव (१९९८-९९) म्हणून तसेच जागतिक नाणेनिधीच्या भारत, श्रीलंका, बांगला देश व भूतान विभागासाठी कार्यकारी संचालक म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले.
२००२-२००४ या काळात त्यांनी भारत सरकारच्या वित्त खात्याचे सल्लागार म्हणूनही काम पाहिले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील उच्च पदांवर काम करण्यासाठी त्यांना विविध सरकार व विदेशी संस्थांनी आमंत्रित केले. त्यांच्या कार्याचा, वेग व आवाकाच मोठा होता. नेमणूक मिळेल तिथे डॉ.केळकर यांनी देशाची सेवा केली. यामुळेच २०११मध्ये भारत सरकारने त्यांन पद्मविभूषण हा सन्मान प्रदान त्यांचा गौरव केला.